School Teacher Fighting Video: शाळेला शिक्षणाचे मंदिर म्हटले जाते. शाळेच्या परिसरात मुलांना ज्ञानासोबतच मूल्येही शिकवली जातात. जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्त आणि संस्कारांचे धडे देतात, त्यांनीच जर फाईट करायला सुरुवात केली, तर काय गोंधळ उडेल? सध्या असंच काहीसं भन्नाट प्रकरण एका शाळेत घडलंय. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशातील खरगोनमधील एकलव्य आदर्श आवासीय विद्यालय येथे मुख्याध्यापक आणि ग्रंथालयात काम करणाऱ्या महिला शिक्षिका यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची एक घटना घडली. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका शाळेतील दिसत आहे. संपूर्ण व्हिडीओ शाळेत असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केलेला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या प्राध्यापिका व महिला ग्रंथपाल यांच्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरू आहे. एका शाळेत मुख्याध्यापिका व ग्रंथपाल यांच्यात वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. शाळेच्या आवारातच दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या शिक्षिका अक्षरशः WWE फायटर्ससारख्या भिडत असल्याचे दिसतेय. भांडणाचं नेमकं कारण काय ते अद्याप समोर आलेलं नाही.

या दोघींमधील एक महिला ही शाळेची मुख्याध्यापिका आहे आणि दुसरी ग्रंथपाल असल्याची माहिती आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघी एकमेकांना मारताना, एकमेकांचे केस ओढताना दिसत आहेत. दोन्ही शिक्षिका एकमेकींच्या झिंज्या उपटताना दिसत आहेत. त्यापैकी एका महिलेनं दुसरीचा मोबाईल फोन फोडला. हा वाद इतका पेटलाय की, दोघीही एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात करतात. या घटनेच्या वेळी इतर अनेक शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, जिल्हाधिकारी भव्य मित्तल यांनी दोघांनाही तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. महिला मुख्याध्यापिका प्रवीण दहिया व शिक्षिका (ग्रंथपाल) मधुराणी यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. त्यांच्या या हिंसक वर्तणुकीने शिक्षणाच्या मंदिराची प्रतिष्ठा नष्ट झाली आहे.

या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका व महिला ग्रंथपाल यांनी वेगवेगळ्या वेळी मैनगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोघीही एकमेकांशी वाद घालताना आणि मोबाईल फोनवर एकमेकांचे रेकॉर्डिंग करताना दिसत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

मुख्याध्यापिकेने महिला ग्रंथपालाला थप्पड मारल्याची आणि तिचा मोबाईल फोडल्याची घटनादेखील व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. त्याच वेळी ग्रंथपालाने मुख्याध्यापिकेवर विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके वाटल्याचा आरोप केला आहे. तथापि, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यांच्या या हाणामारीची बरीच चर्चा होत आहे.