मोक्षाच्या परमोच्च बिंदूला पोहोचण्यासाठी कठोर सत्त्वपरीक्षांना सामोरे जावे लागते. मोह, माया आणि आसक्तीचे क्षण खुणावू लागतात. अशा प्रसंगी मनाचा तोल डळमळू न देता असीम त्यागाचा क्षण कवटाळणाऱ्यास मोक्षप्राप्ती होते, असे कुणा बाबांनी एका सत्संग सोहळ्यात भक्तसमुदायास सांगितले, आणि त्यागातून मिळणाऱ्या मोक्षप्राप्तीच्या स्वानुभवासाठी भक्तगणांनी आपले खिसे बाबांच्या बाजूला असलेल्या दानपेटीत त्यागबुद्धीने रिते केले. आता एका असीम आत्मानंदाच्या अनोख्या अनुभूतीने भक्तगणांची मने भारावून गेली होती. मग बाबा बोलू लागले, ‘त्याग हा मोक्षमार्गातील अखेरचा टप्पा असतो आणि भक्तगणहो, तुम्ही त्या टप्प्याच्या जवळपास पोहोचला आहात.. परमोच्च त्यागाची संधी आता तुमची प्रतीक्षा करत आहे!..’ धनाने भरलेल्या दानपेटीकडे समाधानाने एक निरिच्छ कटाक्ष टाकत बाबा बोलले आणि पुन्हा एकदा पेटीसमोर भक्तगणांची रांग लागली.. अंगावरचे दागदागिनेही बाबांसमोरच्या तबकात ओतले जाऊ लागले आणि सत्संग संपला.. समोरची सारी संपत्ती एका फाटक्या कपडय़ात गुंडाळून बाबांनी मठ गाठला आणि विरक्तीच्या भावनेने भारावलेले भक्तगण पायी परतू लागले.. आता सारे भक्त त्यागातून मिळालेल्या फळांचा कठोर गोडवा चाखत होते. कुणाच्याही हाती काहीच राहिले नव्हते. त्यागातून मिळणारा आनंद हा सुखाच्या राशीत लोळताना मिळणाऱ्या आनंदाहून कितीतरी अधिक असतो. मध्य प्रदेशात जेमतेम चार-सहा महिन्यांपूर्वी मिळालेल्या राज्यमंत्रिपदाचा त्याग करून पुन्हा नर्मदामयाच्या सेवेसाठी सज्ज होण्याचा अन्य साधुसंतांचा दबाव झेलताना महामंडलेश्वर महंत नामदेव त्यागी – म्हणजे, कॉम्प्युटरबाबा- यांना असेच काहीसे होत असावे का?.. धर्मसंस्थापनासाठी, नर्मदामयाचे पावित्र्य जपण्यासाठी आणि माता नर्मदेच्या उदरातून होणाऱ्या वालुकोत्खननापासून मातेला वाचविण्यासाठी नर्मदा परिक्रमा काढण्याचा इरादा बाबांनी बोलून दाखविताच त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा शिवराज सरकारने देऊ केला तेव्हा, अध्यात्ममार्गाने मोक्षप्राप्तीची साधना करणाऱ्या महामंडलेश्वर त्यागीबाबांना मोहाचा हा क्षण कदाचित आवरता आला नसावा. आता आपल्याला अधिक अधिकाराने नर्मदामयाची सेवा करता येईल, असे सांगत त्यांनी राज्यमंत्रिपदाचा मुकुट शिरावर चढविला खरा, पण संन्याशाच्या शिरावर सत्तेचा मुकुट चढताच माया आणि मत्सराच्या पाशातून मुक्त होण्यासाठी कठोर साधना करणाऱ्या अन्य अनेक मोक्षमार्गीचा मत्सराग्नी प्रज्वलित होऊन त्यागीबाबाच्या कामगिरीवर साऱ्या नजरा लागल्या. राज्यमंत्रिपद मिळूनही बाबांनी नर्मदामयाच्या सेवेसाठी काय केले अशी सवालवजा कुजबुजही महंतांच्या मठांमध्ये होऊ लागल्याची चर्चा आहे. गेल्या दोन दिवसांत या सवालाने साकार रूप धारण केले आणि कॉम्प्युटरबाबांना आपल्या शिरावरचा सत्तेचा मुकुट उतरविणे भाग पडले. अशा कृतीला परमोच्च त्यागाचा मुलामा चढविला की संतत्वाची प्रतिमा अधिक तेजाने झगमगू लागते. गेल्या चार-सहा महिन्यांत नर्मदामयाच्या सेवेसाठी काय केले या मत्सरी सवालाची हवा काढून घ्यायची असेल, तर सत्तापदाचा त्याग ही कृती बिनतोड ठरते. धर्मरक्षणासाठी शिवराज सरकारने काहीच केले नाही, गोरक्षा मंत्रालय स्थापून धर्माचरणास धक्का दिला आणि मंत्रिपद असूनही आपणास माता नर्मदेच्या सेवेची साधी संधीदेखील दिली नाही असे सांगत या त्यागीबाबांनी अखेर आपली राजवस्त्रे उतरवून ठेवली आहेत. महामंडलेश्वर कॉम्प्युटरबाबांच्या अल्पकालीन सत्तानुभवाने त्यांच्या त्यागी वृत्तीला नवी झळाळी चढली आहे. निवडणूक लढवून धर्मसंस्थापनार्थ काम करण्याच्या बाबांच्या इराद्याचे काय होणार याकडे आता मठामठांचे लक्ष लागले आहे.