भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील जवळीक वाढत असल्याने आगामी निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच मनेसे नेते बाळा नांदगावकर यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांची रविवारी भेट घेतली. त्यामुळे शहरात आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप-मनसे युतीचे समीकरण जुळेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, नांदगावकर यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ही भेट राजकीय नव्हती. गप्पांचा फड, जुन्या आठवणीआणि जुने किस्से दोन तासांच्या भेटीत रंगले, असे भाजप आणि मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

राज्यातील राजकीय स्थित्यंतरानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भारतीय जनता पक्षाबरोबरची जवळीक वाढली आहे. भाजप-शिंदे गट आणि मनसे यांची युती आगामी महापालिका निवडणुकीत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अलीकडे सातत्याने भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या बाळा नांदगावकर यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतल्याने पुणे महापालिकेत युती होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी पुण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. स्थापनेनंतरच्या महापालिका निवडणुकीत शहरात मनसेला मोठे यश मिळाले होते. पुण्यातील मनसेची ताकद वाढविण्यासाठी भाजपची मदत घेतली जाऊ शकते, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.दरम्यान, ही भेट राजकीय नव्हती, असा दावा या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. बाळा नांदगांवकर यांनीही समाजमाध्यमातून त्याबाबत टिपणी केली आहे. राजकारण केवळ निवडणुकीपुरते असते. राजकारणात विरोधक असतात. शूत्र नाहीत. अनेकदा इतर पक्षातील अनेकांशी आपली नाळ जुळते आणि ती कायम रहाते. बापट आणि मी वीस वर्षे सदनात एकत्र होतो. आमचा स्नेह वेगळा आहे, असे नांदगावकर यांनी म्हटले आहे.