18 August 2019

News Flash

कठोर कायदे हवेत

नवे ज्ञान व दृष्टी मिळते

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘आमचं ऐकताय ना?’ या सदरातील १० मार्च रोजी प्रसिद्ध झालेला डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांचा ‘असेही असते मुलांचे (भयावह) जग? हा लेख वाचला. आपण जगातील वास्तवापासून किती लांब आहोत याची जाणीव करून देणारा आणि असेही काही घडत असते याचा विचार करायला लावणारा हा लेख होता. आई आणि बाबांची एक नवीन व्याख्या तयार होऊ पाहात आहे किंवा झालीच आहे. रस्त्यावरचे तर सर्वाना दिसते पण चार भिंतीआत नक्की काय घडते हे कोणाला समजत नाही, तर पीडित व्यक्तीच्या मनाची काय अवस्था असेल याचा विचार मनात आला तरी मन सुन्न होऊन जाते. समाजातील अशा काही संकुचित विचारांच्या आणि अशी दुष्कृत्ये करणाऱ्या लोकांवर समाजाचाच धाक राहिला नाही. अशा प्रकरणावर लवकरात लवकर उपाय शोधायला हवा. त्यासाठी कायद्याची अंमलबजावणी तसेच कठोर कायदेही तयार करायला हवेत.

विजय कुंभार

 

तल्लख हातोटी

हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या मराठी कादंबऱ्या वाचणे सामान्य जनांस शक्य होत नाही. शिवाय नवपिढी या कादंबऱ्यांबद्दल अनभिज्ञ असेल. प्रभा गणोरकर यांच्या समीक्षासम विवेचनातून वाचकांना साहित्य व समाज यांचे एकाच वेळी दर्शन घडते. त्यांनी वाचकांसमोर अल्लड, थट्टेखोर दुर्गी, निश्चयी कालिंदी, सरधोपट वागणारी इंदू, आदर्शपत्नी सरला, निरागस सुरंगा या विविध पात्रांमार्फत स्त्रीत्वाचे रूपबंध समोर आणले. वरील स्त्रियांची रूपे व त्यांनी भोगलेली दु:खे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही समाजात आढळतात. म्हणून अनेकींचे सक्षमीकरण, सबलीकरण बाकी आहे, असे म्हणता येईल.

परमन प्रवेशाचे सामर्थ्य असलेल्या संवेदनशील लेखकांच्या कादंबरी समीक्षेद्वारे प्रभा गणोरकर स्त्री रूपबंधात्मक नावाच्या नवसमीक्षा पद्धतीचा निर्माण करतील, असे खात्रीपूर्वक वाटते.

प्रीतेश भावे

 

पटण्याजोगे विचार

उत्पल व.बा. यांनी ‘परंपरा आणि नवता’ या सदरात ३ मार्च रोजी लिहिलेला ‘श्रद्धेची चुकलेली वाट’ या लेखात बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद योग्यप्रकारे, गरजेनुसार असे मार्मिक मांडणी केलेली आहे त्याची परिमाणे या लेखात दिली आहेत. माणसाला हळवं करणाऱ्या गोष्टीत ‘श्रद्धा’ अग्रस्थानी आहे या विषयी प्रत्येकाचे वेगळे मत आणि विचारशक्ती आहे ते कळते आणि त्यासोबत बुद्धीच्या दोन रूपांचे विवेचन पटण्याजोगे आहे.

किशोर गिरासे, धांदरणे, धुळे 

 

नवे ज्ञान व दृष्टी मिळते

‘समृद्ध करणारे अनुभव’ हा १० मार्च रोजी ‘श्रेयस आणि प्रेयस’ या सदरात प्रसिद्ध झालेला गणेश देवींचा लेख वाचला. गणेश देवींचे कार्य नेहमीच प्रेरणादायी आहे. त्यांचे दक्षिणायन काम अजून लोकांना नीट उमजले नाही ही शोकांतिका आहे. ‘निसर्ग संवेदना’मध्ये ‘कीटक संशोधनाचा पाया’ हा उष:प्रभा पागे यांचा अभ्यासपूर्ण लेख वाचला. चित्रकर्ती अशा तऱ्हेचे संशोधन करते हे एक उपयोजित चित्रकार म्हणून मला खूप प्रेरणादायी वाटते. अरुंधती वर्तक या मला माहीत असलेल्या भारतीय चित्रकर्तीदेखील निसर्ग व झाडे, फुले इत्यादींचे निरीक्षण संशोधन करीत सुंदर चित्र काढतात व जगात त्यांची कला मान्यताप्राप्त असून त्यास वैज्ञानिक मूल्य आहे. सौंदर्य व विज्ञानाचा असा उत्तम मिलाफ नवे ज्ञान व दृष्टी देत असते.

रंजन जोशी, ठाणे

 

पालकत्वाची चाचणी असावी

अनुराधा सहस्रबुद्धे यांचे ‘आमचं ऐकताय ना?’ हे सदर वाचनीय आहे. २४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘आरसा’ या लेखात एकूणच तंत्रज्ञान हाती मिळाल्याने आईवडिलांचे लहान मुलांकडे लक्षच नसते. एक तर ते मोबाइल, टी.व्ही, संगणक यावर सतत असतात अथवा या गोष्टी मुलांच्या हाती देऊन आपण मोकळे होतात. माझं असं एक निरीक्षण आहे की दहापैकी पाच पालक मुलांशी संवाद सोडाच, पण सुरक्षेबाबतही निष्काळजी व बेफिकीर असतात. तीनचार वर्षांच्या बाळाचा हात सोडून भर रस्त्यावर मोबाइल चॅट, बडबड, वाटेत कोणाशी गप्पा करत असतात. उत्सव, यात्रा, मॉल, बाजार, गर्दी याची तर तरुण आयांना भारीच हौस. त्यात हिंडताना इतकी बेफिकिरी असते की मुलांचे काय होत असेल याचा विचार करवत नाही. मला अनेकदा असं वाटतं की वय, आर्थिक क्षमता, हे विवाह व अपत्यासाठी कसोटय़ाच पुरेशा नाहीत. विवाह कायद्यात योग्य बदल करून वाहनचालक परवानाप्रमाणे पालकत्वाची एक चाचणी असली पाहिजे. त्यात उत्तीर्ण असेल तरच विवाह. त्यासाठी छोटासा अभ्यासक्रमही असावा. हे प्रायोगिक ऐच्छिक म्हणून सुरू करावे; मग निदान जाणीव तरी होईल.

अभिजित महाले, वेंगुर्ले

 

वृद्धांच्या समस्यांचे आव्हान

‘वृद्धाश्रमाची स्थापना आणि निवड’ हा १७ मार्च रोजी प्रसिद्ध झालेला डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा लेख वाचला. मीदेखील बऱ्याच वृद्धाश्रमांना केवळ निरीक्षणार्थ भेटी दिल्या. एकंदरीत ‘जावे त्यांच्या वंशा’ अशी वृद्ध आणि वृद्धाश्रम चालकांची स्थिती आहे असे जाणवते. शहरातील, अल्प उत्पन्न असणारे, किंवा निराधार वृद्ध आपली शहरातील जागा भाडय़ाने देऊन, त्यांचे उर्वरित म्हातारपण निश्चिंतपणे येथे घालवू शकतात. हा एक न दिसणारा पैलूदेखील वृद्धाश्रमांच्या बाबतीत लक्षात घेण्यासारखा आहे. सर्व मानवी जीवनच बाजार स्वाहा झाल्याने, आबालवृद्धांच्या समस्या संवेदनशीलपणे हाताळणे मोठे आव्हानच ठरते आहे.

मोहन गद्रे, मुंबई.

 

नजर बदलणे जरुरीचे

१० मार्चच्या पुरवणीतील ‘तिच्या नजरेतून तो’ या सदरातील रुचिरा सावंत यांचा ‘निरभ्र नजरेने तुला पाहताना’ हा लेख वाचला आणि अतिशय भावला. खरंच.. सर्व पुरुषांना एकाच तागडीत घालून मोजणं चुकीचंच आहे. समाजात कुठल्याही व्यवसायात, मग तो डॉक्टर असो, टॅक्सीवाला किंवा घरगडी.. फक्त ५ ते १० टक्के वाईट असतात आणि त्यामुळे सर्वाचे नाव बदनाम करतात. आपली नजर बदलणे जरुरीचे आहे.. सरसकट सगळे कधीच वाईट नसतात, जगात चांगुलपणा जास्त आहे.

मृदुला बडवे

First Published on March 31, 2018 1:16 am

Web Title: loksatta reader response on chaturang articles 6