वसई: पावसाळ्यात वीज समस्या निर्माण होऊ नये यासाठी महावितरणने पावसाळी पूर्व कामांची सुरवात केली आहे. यामध्ये विद्युत प्रवाहात अडथळा निर्माण होईल अशा सर्व यंत्रसामग्री, विद्युत वाहक तारा , वृक्ष छाटणी यासह इतर कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे.
वसई विरार मध्ये दरवर्षी पावसाळ्यात विजेच्या संदर्भातील अनेक समस्या उद्भवत असतात. या समस्यांमुळे वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे शहारातील नागरिकांना याचा फटका बसत असतो मात्र हा फटका बसू नये यासाठी या पावसाळा सुरु होण्याआधीच ठीक ठिकाणी कामांची सुरवात करण्यात आली आहे. निवासी ठिकाणी, औद्योगिक क्षेत्र,
याशिवाय प्रत्येक विभागानुसार पाहणी करून कोणत्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्यानुसार दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करण्यात येत आहे.
रोहित्र, जनित्र, डीपी बॉक्स, विद्युत वाहिन्या, विद्युत पोल अशा सर्व गोष्टींची पाहणी करून सर्व काही सुरळीत आहे का नाही याची तपासणी करून ज्या ठिकाणी गरज आहे त्याठिकाणी दुरुस्ती व नवीन उपकरणे बसविण्यात येत आहेत असे महावितरणने सांगितले आहे.७ हजार ५५ किलोमीटर इतक्या वाहिन्यांची पाहणी करण्यात येत आहे.
२ हजार ४६५ ठिकाणी डिटीसी केबल, १२०० ठिकाणी झंपर बदली करणे, रोहित्रात ऑइल टाकणे, रोहित्राच्या सभोवतालची स्वच्छता, वाहिन्यांवर वृक्षांच्या फांद्या आल्या आहेत त्यांची छाटणी केली जात आहे. तसेच ३५० ठिकाणी विद्युत खांब धोकादायक आहेत त्यांचे सर्वेक्षण केले ते सुद्धा बदलण्याचे काम सुरू असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पावसाळ्या पूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असेही महावितरणने सांगितले आहे. वादळीवाऱ्यात विद्युत यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल वादळी वाऱ्यात व पावसाळ्यात विद्युत वितरणमध्ये अनेकदा तांत्रिक बिघाड होत असतो. हा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी मोनोपोल इनकमरची मात्रा दिली जात आहे. अनेक ठिकाणी मोनोपोल टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः हे मोनोपोल खारभूमीच्या ठिकाणी टाकले जाणार आहेत.