वसई : मान्सूनच्या कालावधीमध्ये धबधब्याच्या ठिकाणी होत असलेल्या दुर्घटना रोखण्यासाठी वसई पूर्वेच्या तुंगारेश्वर अभयारण्यात येत असलेल्या धबधबे, छोटे ओढे याठिकाणी वन विभागाने पर्यटकांना बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा वनविभागाने दिला आहे.

पावसाळा सुरू होताच आपसूकच पर्यटकांनी पावले पर्यटनस्थळी वळतात. वसई तालुक्याचा परिसर निसर्गरम्य असा परिसर असून या भागात समुद्र किनारे, छोटेमोठे धबधबे आहेत. वसई पूर्वेच्या भागात ही तुंगारेश्वर अभयारण्य आहे.

याच ठिकाणी निसर्गरम्य पर्वतांच्या कुशीत असलेल्या श्रीतुंगारेश्‍वर महादेव मंदिराला महाराष्ट्र शासनाने सन २००० साली  ‘क’ वर्गीय पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक भक्त  शंकर महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. तर मोठ्या संख्येने पर्यटक ही या भागाला भेट देत असतात. विशेषतः पावसाळ्यात अभयारण्याच्या ठिकाणी विविध ठिकाणी नैसर्गिक धबधबे कोसळत असतात. तर नदी, नाले ही प्रवाहित होतात.

पावसाळ्यात निसर्गरम्य भागात पाण्याचा आनंद लुटण्यासाठी विविध ठिकाणचे पर्यटक येत असतात. मात्र काही अतिहौशी पर्यटक मद्यपान करून पाण्याच्या प्रवाहात जाणे, धोकादायक ठिकाणी उभे राहून सेल्फी काढणे, स्टंट बाजी करणे, उंच ठिकाणाहून पाण्यात उडी मारणे,  तर काहींना ठिकाणांची माहिती नसताना ही पाण्यात उतरतात त्यामुळे पाण्याच्या डोहात बुडण्याच्या घटना, तर काही जण अडकून पडतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा घडणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी वनविभागाने तुंगारेश्वर अभयारण्य क्षेत्रातील धबधबे, नाले व इत्यादी ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. कोणीही वनकायद्याचा भंग केल्यास त्याविरुध्द भारतीय वन अधिनियम-१९२७ व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील कलमान्वये, कार्यवाही करण्यात येईल असा इशारा ही वनविभागाने दिला आहे.