विरार : मागील काही दिवसापासून शहरातील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने झपाटय़ाने कमी होत आहे. करोना दुसऱ्या  लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असताना अजूनही पालिकेने मात्र शहरातील र्निबध शिथिल केले नसल्याने व्यापारीवर्गात मोठी नाराजी निर्माण होत आहे. आजूबाजूच्या इतर महानगर पालिकेने स्थानिक स्थरावर निणर्य घेवून शहरातील दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. पण वसईकरांना मात्र अजूनही पालिकेने नियमांत बांधून ठेवेले असल्याने र्निबध शिथिलतेसाठी नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नुकताच राज्य शासनाने राज्यभर लागू केलेले र्निबध करोना दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असताना राज्यभर करोना र्निबध शिथिल करत नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला. मुंबई, ठाणे, पालघर सह इतर ११ जिल्ह्यत मात्र स्थानिक प्रशासनांना आढावा घेवून निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानुसार मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर महापालिकेने निर्णय घेत सर्व आस्थापनांना रात्री १० वाजेपर्यंत मुभा दिली आहे. पण वसई विरार महापालिकेने या संदर्भात अजूनही कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे व्यापारी तसेच नागरिकांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच आपले व्यवहार करावे लागत आहेत. मागील वर्षभरापासून सातत्याने टाळेबंदीच्या र्निबधामुळे अनेक उद्योगधंदे आर्थिक झळा सोसत बंद झाले आहेत. तर अनेक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे व्यापारी वर्गावरचे आर्थिक संकट अधिक अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. पालिकेने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने बुधवारी वसई विरार मधील हॉटेल व्यवसायिकांनी महामार्गावर आंदोलन करत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. यावेळी या संघटनेचे अध्यक्ष नागराज शेट्टी यांनी सांगितले की,  टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थिती ढासळल्याने विरार मधील एका हॉटेल व्यावसाईकाने आत्महत्त्या केली. अशी परिस्थिती अनेकांवर येवू शकते. यामुळे स्थानिक प्रशासनाने  व्यवसायिकांना व्यापाऱ्याच्या वेळ वाढवून देण्याची मागणी केली. तर विरार मधील टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या विक्षिता एन्टरप्राईजच्या मालक आम्रपाली वावळे यांनी सांगितले की, सायंकाळी चार पर्यंत कुणी ग्राहक फिरकत नाही. लोक कामावर जात असल्याने ७ नंतरच त्यांना वेळ मिळते. तर शनिवार रविवार सुद्धा र्निबध लागू असल्याने व्यापार बुडत चालला आहे. त्यांनी कर्ज काढून हा व्यवसाय सुरु केला आहे. पण सध्या ग्राहक नसल्याने त्यांना कर्ज फेडणे श्यक होत नाही. थोडय़ा बहोत फरकाने सर्वच ठिकाणी व्यापारीवर्ग मेटाकुटीला आला आहे.

अजूनही आयुक्तांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणत्याही सूचना आल्या नाहीत. यामुळे जे र्निबध लागू आहेत त्याचे नागरिकांनी पालन करावे. नवी नियमावली जाहीर झाल्यास त्याबाबत नागरिकांना कळविले जाईल.

गणेश पाटील, जनसंपर्क अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका

शासनाच्या दिलेल्या आदेशानुसार ११ जिल्ह्यच्या यादीत पालघर जिल्हा येत असल्याने अजूनही र्निबध शिथिल करण्याचा कोणतेही निर्णय घेतले नाहीत, परिस्थितीचा आढावा घेवून याबाबत निणर्य घेतले जातील.

माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर