झटपट सजावट

‘पाहुणे येती घरा तोचि दिवाळी दसरा’ ही आपली संस्कृती. त्यामुळेच घरी पाहुणे येणार म्हटले की साऱ्यांचीच लगबग उडते.

गौरी प्रधान 
‘पाहुणे येती घरा तोचि दिवाळी दसरा’ ही आपली संस्कृती. त्यामुळेच घरी पाहुणे येणार म्हटले की साऱ्यांचीच लगबग उडते. मग पाहुणा  किती वेळासाठी येणार आहे त्यावर त्याची सरबराई कशी करावी याचे बेत ठरतात. त्यातून पाहुणा खूपच हवाहवासा असेल आणि मुक्कामालाच यायचा असेल मग तर त्याच्यासाठी काय करावे आणि किती करावे असे होऊन जाते. त्याला कुठे बसवायचे, त्याने कुठे झोपायचे, खाण्यासाठी काय काय बेत करायचे अशी एक ना अनेक प्रकारची तयारी सुरू होते.

महाराष्ट्रातील तर घराघरांत वर्षांतून एकदा हा सोहळाच रंगतो. अर्थात, सगळ्यांचा लाडका पाहुणा गणपती बाप्पा येणार असतो ना! मग कोणाकडे तो किती दिवस मुक्कामाला आहे त्यावर त्याच्या पाहुणचाराची पद्धत ठरते. बाप्पासाठी सगळ्यात महत्त्वाची काय तर त्याची गेस्ट रूम, म्हणजे त्याचे मखर हो. जोवर तो घरात आहे तोवर त्याला तिथेच तर बसायचे असते ना! म्हणूनच त्याच्या गेस्ट मची विशेष व्यवस्था करावी लागते. मखराची अंतर्गत व्यवस्था आणि बा सजावट अशा दोन्ही स्तरांवर त्याकडे लक्ष द्यावे लागते.

सर्वप्रथम मखराचे आकारमान यात महत्त्वाचे. श्रींची मूर्ती सहज आत बसवता येईल आणि काढता येईल असा सुटसुटीतपणा मखरात हवा. यासाठी मखर निवडताना मूर्तीच्या आजूबाजूने किमान सहा सहा इंच जागा सुटेल असे मखर पाहावे. मखराचा समोरचा भाग हा रुंद असावा, म्हणजे मूर्ती आत-बाहेर करणे तर सोपे होईलच, पण त्याचसोबत मखराला एक प्रशस्तपणादेखील येईल.

आता प्रत्यक्ष सजावटीचा विचार करू. सजावट करताना शक्यतो ती पर्यावरणपूरक असावी किंवा पुनर्वापर करता येण्याजोगी. ताज्या फुलांची सजावट तर कधीही मनमोहकच. सजावटीसाठी फुले निवडताना टिकाऊ फुले निवडावीत म्हणजे चार-पाच दिवस ती सजावट टिकून राहते. जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड आणि इतरही फुलांच्या दुकानांत मिळणारी फुले सजावटीसाठी वापरता येतात. याचबरोबर फुलवाल्यांकडे किंवा ऑनलाइन सुकवलेली शोभेची फुलेदेखील मिळतात- जी टिकाऊ आणि सुंदर दोन्ही असतात. आणखी एक पर्याय म्हणजे खोटय़ा फुलांचा. हल्ली बाजारात अगदी खरी भासतील अशी खोटी फुलेदेखील मिळतात. यांचा फायदा म्हणजे उत्सवानंतर ही काढून ठेवून आपण पुन्हा वापरू शकतो.

गेल्या काही वर्षांत थर्माकोलवर बंदी आल्याने बऱ्यापैकी पर्यावरणाचा ऱ्हास थांबला असला तरी कलाकारांच्या कलेवर मात्र मर्यादा पडल्या आहेत. थर्माकोल इतके अष्टपैलू नसले तरी थर्माकोलला पर्याय म्हणून माउंट बोर्डचा वापर करूनदेखील सजावट केली जाऊ शकते. सजावटीचा आणखी एक सुंदर पर्याय म्हणजे, लायटिंग. सजावट कसलीही असो, योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे केलेल्या लायटिंगमुळे सजावटीला तेज येते.

या सगळ्या सजावटी सोबतच सुरक्षा हा मुद्दादेखील ध्यानात ठेवायला हवा. बाप्पाची पूजा म्हणजे आरती आली. दिवे, उदबत्ती, धूप सारेच हजर. म्हणून सजावट करताना दिवे आरती मखराच्या बाहेर सुरक्षित अंतरावर ठेवता येईल अशा पद्धतीने मखराची रचना असावी. लायटिंग करतानाही वायर लपवण्याच्या नादात त्या वेडय़ावाकडय़ा कुठेतरी घुसवू नयेत. लाइटचा जास्त वापर करायचा असल्यास, शक्यतो इलेक्ट्रिशियनला बोलावूनच त्याच्याकडून लायटिंगचे काम करवून घेतलेले बरे. हल्ली सेलवर चालणाऱ्या दीप माळादेखील मिळतात- ज्यांचा वापर करून आपण सुरक्षित लायटिंग करू शकतो. वर्षांतून एकदा येणाऱ्या या अति महत्त्वाच्या पाहुण्याचे स्वागत करताना अशा प्रकारे सुरक्षा आणि कल्पकतेची आपण सांगड घातली तर आपला पाहुणा नक्की आपल्यावर प्रसन्न होईल!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Instant decoration diwali ganeshotsav festivals ssh

ताज्या बातम्या