जयेंद्र साळगावकर

करोनाकाळात सर्व धर्मीयांच्या उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या. पण त्यातून सर्वानी मार्ग काढले. उत्सवाची परंपरा, भगवंताची श्रद्धा खंडित न करता साधेपणाने, त्यातील जल्लोष बाजूला ठेवून प्रत्येकाने आपली श्रद्धा जोपासली. आता तीच वेळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर आली आहे..

करोना प्रादुर्भावामुळे समाजामध्ये भीतीचे, भयाचे वातावरण आहे. आजूबाजूला सतत ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे लोक घाबरतात. ज्यांच्या कुटुंबापर्यंत करोना पोहोचला आहे, ती कुटुंबे त्याहीपेक्षा जास्त घाबरलेली आहेत. भयभीत अशी स्थिती दुर्दैवाने निर्माण झाली आहे. करोनाने एकूण समाजव्यवस्था आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्टय़ा उद्ध्वस्त केली आहेच, पण मानसिकता आणि मानवी भावपटलावरही त्याचे ओरखडे उठले आहेत. हे भय, चिंता या साऱ्यातून समाजाला मानसिकदृष्टय़ा बाहेर काढणे हेसुद्धा एक आव्हान आहे. एकीकडे न दिसणाऱ्या विषाणूच्या विरोधात लढाई लढायची आहे, तर दुसरीकडे या भयगंडातून, नैराश्यातून थिजलेल्या समाजव्यवस्थेच्या चक्रालाही गतिमान करण्याचे आव्हान आहे. या सगळ्या लढाईमध्ये विज्ञान, वैज्ञानिक साधने, औषधे हे जसे उपयोगी ठरत आहेत, ठरणार आहेत; त्यासोबतच धार्मिक परंपरा, विधी, सण-उत्सव आणि त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा हीसुद्धा समाजाला नैराश्यातून बाहेर काढू शकते, भयमुक्त करू शकते. म्हणून उत्सवप्रिय समाजाला नियमांचे पालन करून हळूहळू त्या दिशेने घेऊन जाणे गरजेचे आहे. काही अंशी हे काम आपण करीत आहोत आणि म्हणूनच अखंड परंपरा असणारी वैष्णवांची वारी जरी या वर्षी होऊ शकली नाही, तरी वारकरी परंपरेला खंड न पडू देता संतांच्या पादुका पंढरपुरात गेल्या. शिस्तबद्ध पद्धतीने विठ्ठलाचा आषाढीचा सोहळा संपन्न झाला. यातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा ही वारकरी समाजाला चेतना देणारीच ठरेल, तशी ऊर्जा निर्माण करणे ही आता गणेशोत्सव मंडळांचीसुद्धा जबाबदारी होऊन बसली आहे.

या विषयावर विवेचन करण्याचे कारण हेच की, गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. मुंबई, पुणे ही दोन शहरे तर सार्वजनिक गणेशोत्सव काळात गजबजून जाणारी आहेत. जगाचे आकर्षण ठरावे असे उत्सव या दोन शहरांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत साजरे होऊ लागले आहेत. कोकण हा प्रांत गणेशोत्सवासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. मुळात गणपती या दैवतावर अनेकांची नितांत श्रद्धा आहे. विद्येचे दैवत, सुखकर्ता-दु:खहर्ता अशा भावनेने, श्रद्धेने, आस्थेने लाखो लोक गणपतीची पूजा करतात. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश वंदनेशिवाय, गणेश पूजेशिवाय होत नाही. गणपतीचे असे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे. किंबहुना हीच बाब ओळखून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी घराघरांत होणारा गणेशोत्सव हा सार्वजनिकरीत्या साजरा करायला सुरुवात केली. गणेशोत्सवातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा लोकमान्य टिळकांनी ओळखली आणि ही गणेशभक्तीची शक्ती देशहितासाठी वापरली जावी म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.

सकारात्मक ते पुढे न्यायचे

सार्वजनिक गणेशोत्सवाची ही परंपरा गेल्या शंभर वर्षांत बदलत गेली हे मान्य करावे लागेल. काही ठिकाणी त्याला बाजारीकरणाचे स्वरूप आले, हेही मान्य करावे लागेल. पण काळ बदलतो, परिस्थिती बदलते, साधने बदलतात, तसेच स्वाभाविकपणे सण-उत्सवांमधील बदल हे अपरिहार्य आहेत. काही बदल सकारात्मक असतात, काही बदल नकारात्मक असतात. जे नकारात्मक आहे ते मागे टाकायचे; सकारात्मक आहे ते घेऊन पुढे जायचे. असे केल्याशिवाय प्रगती साधता येत नाही. गणेशोत्सवामध्ये ज्या गोष्टी न कराव्याशा आहेत, त्या गोष्टींना समाजातील गणेशभक्तांचाही विरोध आहे. त्या वाईट गोष्टी बाजूला सारून अनेक गणेशोत्सव मंडळांनी आदर्शवत काम उभे केले आहे, हेसुद्धा नाकारून चालणार नाही.

श्रद्धेला मोल नाही आणि श्रद्धा कुठल्या तराजूत मोजताही येत नाही. प्रत्येकाच्या घरी गणपती असला, तरीसुद्धा त्याच घरातील व्यक्तीची श्रद्धा एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपती बाप्पावर असते. मग तासन्तास रांगा लावून ही व्यक्ती पाऊस, ऊन, तहानभूक बाजूला सारून बाप्पाचे दर्शन घेते. त्यातून श्रद्धा जोपासत राहते. यातून त्या व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन बळावतो आणि त्यासोबत परंपराही जोपासली जाते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमध्ये पुसटशी रेषा आहे. अंधश्रद्धेचा पुरस्कार पुरोगामी महाराष्ट्रात कोणीच करू शकत नाही. पण सार्वजनिकरीत्या सुरू असलेला गणेशोत्सव ही एक परंपरा झाली आहे. या काळात महाराष्ट्रातील घरोघरी जसा आनंदाचा सोहळा सुरू होतो, तसाच गल्लीबोळांत सुरू झालेल्या गणेशोत्सव मंडळांमध्येही आनंद सोहळा असतो. ही परंपरा राखताना रक्तदान, श्रमदान, आरोग्य शिबीर, ग्रंथालय अशा विविध सामाजिक उपक्रमांतून गणेशोत्सव मंडळे आपले सामाजिक भान जोपासत आहेत.

मंडळांचा पुढाकार

लोकमान्य टिळकांची यंदा स्मृतिशताब्दी आहे. दुर्दैवाने याच वर्षी गणेशोत्सवावर करोनाचे सावट आहे. हे सावट एकटय़ा गणेशोत्सवावर नाही, तर गेल्या तीन महिन्यांच्या कालखंडात सर्व धर्मीयांच्या उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या. पण त्यातून सर्वानी मार्ग काढले. उत्सवाची परंपरा, भगवंताची श्रद्धा खंडित न करता साधेपणाने विधिवत पूजा करून, त्यातील जल्लोष बाजूला ठेवून प्रत्येकाने आपली श्रद्धा जोपासली. आता तीच वेळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाबतीत आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व गणेशोत्सव मंडळांची याबाबत बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, शासनाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्यासह गणेशोत्सव समन्वय समिती तसेच अखिल महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि काही गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. विषयावर सांगोपांग चर्चा करून मूर्ती जास्तीत जास्त चार फुटांची असावी यावर जवळपास एकमत झाले. तसा निर्णय नंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीरही केला. काही मंडळांनी तर त्यापूर्वी आपला निर्णय घोषित केला. त्यांनी उत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याचे सांगत मूर्तीची उंची कमी करून, सामाजिक उपक्रमांना सुरुवात आणि कोणत्याही प्रकारे उत्सवाची परंपरा खंडित न करता यंदा गणेशोत्सव साजरा करणार, असे जाहीर केले. यामध्ये चिंचपोकळीचा चिंतामणी असो किंवा ‘मुंबईचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा गणेश गल्लीचा गणेशोत्सव असो; यांनी एक आदर्श घालून दिला. सर्व नियम पाळून, सामाजिक उपक्रम राबवून या मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका घेतली. त्यासाठी त्यांचे कौतुकच.

करोना प्रादुर्भाव रोखायचा असेल तर गर्दी टाळावी लागेल, अंतरभान पाळावे लागेल, मुखपट्टय़ा वापराव्या लागतील, तसेच सरकारकडून करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करणेही अपरिहार्य आहे. पण या सूचनांनी व नियमांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. हे नियम बनवत असताना सरकारने गणेशोत्सव समन्वय समिती आणि अखिल महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघ म्हणून आम्हालाही विचारात घेतले आहे. आम्ही त्याबाबतच्या काही सूचना तसेच काही कल्पना सरकारला देतो आहोत आणि त्यातून मध्यम मार्ग काढून गणेशोत्सव साजरा होईल व करोनाशी आपला लढा तीव्र होईल, अशा स्वरूपाचे एक चित्र तयार होत आहे.

स्थानमाहात्म्याचा विसर

असे असताना मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाने ‘या वर्षी गणेशोत्सव साजरा करणारच नाही, त्याऐवजी ‘आरोग्योत्सव’ साजरा करू’ अशी भूमिका जाहीर केली. वास्तविक आरोग्योत्सव साजरा करणे ही आजघडीची गरज आहे, त्याबद्दल ‘लालबागचा राजा’ मंडळाचे कौतुकच करायला हवे. पण याचा अर्थ गणेशोत्सव बंदच केला पाहिजे असा होत नाही. त्या मंडळाने वर्षांनुवर्षे लालबागच्या छोटय़ाशा गल्लीमध्ये बसवण्यात येणाऱ्या गणपतीचे स्थानमाहात्म्य लोकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे घरी गणपती असतानासुद्धा अनेक भाविक ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात, त्याला नवस करतात. त्या गणपतीवर अनेकांची श्रद्धा आहे. या गणेशाची मूर्ती किती फूट असावी हा श्रद्धेचा विषय नाही किंवा गणेशभक्तांची भक्ती ही लालबागच्या गणेशाच्या मूर्तीच्या उंचीवर ठरलेली नाही. तर त्या गणपती बाप्पाच्या स्थानमाहात्म्यावर ठरलेली आहे. जर स्थानमाहात्म्य असेल तर मग या वर्षी ते का पाळले जाणार नाही, हा प्रश्न आहे.

जेव्हा समाजामध्ये नैराश्य, भय, चिंता असते, तेव्हा श्रद्धाळू माणसाच्या मनात गणेशोत्सव मंडळांनी श्रद्धेचे सकारात्मक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. तसे वातावरण निर्माण केले तर कदाचित समाज यातून लवकर बाहेर पडेल. ऑनलाइन दर्शनाची सेवा उपलब्ध करून दिली आणि जर बाप्पाचे ऑनलाइन दर्शन घेऊन, त्याच्याशी संवाद साधून आपल्या मनातील नैराश्य, भय, चिंता दूर होणार असेल, मनाला उभारी मिळणार असेल, तर मग ‘लालबागचा राजा’ मंडळ मूर्तीची प्रतिष्ठापना न करता केवळ ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचा निर्णय का घेते आहे?

‘ऑनलाइन दर्शना’ची सुविधा

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक ठिकाणी सुरू केला, त्यापाठी सामाजिक भानही होते. सामाजिक उपक्रमांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. आज सामाजिक उपक्रम सुरू ठेवणार आणि गणेशोत्सव ही परंपरा खंडित करणार, हे कसे? प्रथा-परंपरेनुसार आणि पुराण सांगते त्याप्रमाणे, ज्या ठिकाणी गणपतीची पूजा वर्षांनुवर्षे केली जाते, ती पूजा अशी एकाएकी बंद करता येत नाही. मूर्तीची उंची हा पुराणाचा, धर्मशास्त्राचा विषय नाही. तो अलीकडच्या काळातील उत्सवप्रियतेतून आलेला मुद्दा आहे. त्यामुळे कमी उंचीची मूर्ती बसवून ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने गणेशभक्त नाराज होणार नाहीत. याचे कारण वर्षभर त्यांना बाप्पाच्या आगमनाची, त्याच्या दर्शनाची आस असते. हा विलक्षण आनंद, सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा देणारा क्षण अनुभवण्यास गणेशभक्त उत्सुक असतात. त्यातून एक प्रकारचे मानसिक समाधान त्यांना मिळते.

सद्य: करोना संकटात समाजाला जेवढी वैद्यकीय मदतीची गरज आहे, तेवढीच मानसिक स्थिरताही हवी आहे. हे ध्यानात घेता, प्रश्न पडतो की – ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळ बाप्पाची आणि गणेशभक्तांची वर्षभरासाठी ताटातूट का करते आहे? या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. अनंत अडचणी असतानाही संतांच्या पादुका भगवंताच्या दर्शनाला पंढरपुरात जातात. संत आणि भगवंत यांची भेट होते. मग गणेशभक्त आणि ‘लालबागचा राजा’ यांची भेट साकारण्याऐवजी मंडळ ती नाकारणारे का होत आहे? ८५ वर्षांची तिथली परंपरा का खंडित करायची? विधिवत पूजा करून साधेपणाने बाप्पाचे आगमन होऊ शकते, दर्शन होऊ शकते आणि यातून एक नवा आदर्श निर्माण होऊ शकतो. करोनाला घाबरून चालणार नाही, त्याच्याशी संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठीचे बळ बाप्पा आपल्याला देईल. म्हणून त्याचे आगमन, पूजा रद्द करणे योग्य नाही.

jayendragr8@gmail.com