News Flash

रंगधानी : स्वत्वाकडून समष्टीकडे

अंजू दोडियासारखं स्वतच्या अंतरंगात जाणं असेल किंवा अन्नू मॅथ्यूसारखं स्मृतिकोषांतून स्वतकडे पाहणं असेल

अंजू दोडिया यांचे ‘विटनेस’ हे चित्र व बाजूला त्याच चित्रातील एक अंश..

अंजू दोडिया, हेमा उपाध्याय, पुष्पमाला, अन्नू मॅथ्यू.. अशा अनेक जणींनी कलाकृतीत ‘स्व’-प्रतिमेचा वापर केला, तो केवळ आत्मचित्र म्हणून नव्हे. त्यांच्या या कलाकृती समाजाबद्दलही काही बोलतात..

गेली अनेक शतकं कलाकारांचा स्वतचं व्यक्तिचित्र किंवा सेल्फ पोट्र्रेट काढण्याकडे ओढा दिसतो. अभिव्यक्ती, खोलवरच्या भावना दर्शविण्यासाठी किंवा आजूबाजूच्या घडामोडींना मांडण्यासाठी कलाकार हे माध्यम वापरताना दिसतात. यात गमतीचा भाग असा असतो की, यात कलाकारच निर्माती असते आणि कलाकृतीचा विषयदेखील. स्व-प्रतिमा वापरताना कलाकार या दुहेरी भूमिकेत शिरतात. या दोन्ही डगरींवर पाय ठेवत चित्र काढण्याची कसरत ठरते पण मुख्यत: कलाकारांना एक प्रकारचं मुक्त अवकाश मिळतं. यात सामाजिक सांस्कृतिक संदर्भ, लिंगभाव, अस्मिता अशा अनेक गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. पण त्याहीपेक्षा अशा प्रकारच्या चित्रांतून होणारी स्वत्वाची जाणीव ही चित्रकलेच्या इतिहासाला नवं वळण देणारी ठरली. पाश्चात्त्य कलाजगतात आणि नंतर भारतात आधुनिक कलाविष्कार सुरू झाल्यावर बराच काळ स्त्रियांचं चित्रण हे एक सौंदर्यवस्तू यापुरतं मर्यादित राहिलं. त्यातून एक ठरावीक प्रकारची प्रतिमा तयार होत गेली. त्या प्रतिमेला छेद दिला तो अमृता शेरगिलसारख्या चित्रकारांनी. आधुनिक स्त्री असणं आणि चित्रकार असणं या दोन्हीची जाणीव स्पष्टपणे त्यांच्या चित्रात उमटलेली दिसते. स्त्रीची प्रतिमा रंगवताना त्या काळात आपसूक येणारा नाजूकपणा आणि मोहकता टाळत त्यांनी भव्यतेवर भर दिला. ठसठशीत स्वरूपात स्वतला कॅनव्हासवर आणलं. यातूनच त्यांचं आत्मत्व चित्रातून साकारत गेलं. चित्र काढणारी आणि काढून घेणारी अशा दोघींच्या जाणिवा त्यात उतरत गेल्या.

स्वत:च्या मनातले विचार, भावना मांडताना, आतलं-खोलवरचं असं काही तरी बाहेर आणताना स्वत:च्या चित्रणातून ते कलाकार करताना दिसतात. अंजू दोडिया यांचं चित्रावकाश हे बहुतेक वेळा त्यांच्या स्वत:च्या प्रतिमेभोवती गुंफलेलं दिसतं. पण ते आत्मरतीकडे जाणारं ठरत नाही की आत्मतत्त्व हेच जगाच्या आकलनाचं अंतिम तत्त्व आहे, असंही मानत नाही. उलट ‘पॅनिक रूम’ आणि ‘विटनेस’ यासारख्या चित्रांतून त्यांच्या अतिशय व्यक्तिगत, आतल्या जगात प्रेक्षकांना शिरता येतं. त्यांचे जवळिकीचे, हळवे आणि अंतर्मुख करणारे क्षण अनुभवता येतात. पण हे सगळं करताना व्यक्तिगत भावनांना वैश्विक रूप दिलं जातं. एखाद्या एकटं असल्याच्या क्षणी मनात काय गुंतागुंतीचे विचार येतात, काय चित्र-विचित्र कल्पना आकार घेतात किंवा कोणती दिवास्वप्नं पाहिली जातात, ते या चित्रातून समोर येतं. त्यात वेदना, विषण्णता, त्रास आहेत पण क्वचित त्याकडे थट्टेने, विनोदाने पाहणारेदेखील आहे. टोकाच्या तीव्र भावना, त्यातून येणारा लहरीपणा आणि जगण्यातली अ‍ॅब्सर्डपणाची जाणीव आपल्या अस्तित्वाचा ताबा घेते, ते क्षण यात टिपलेले दिसतात. हे करताना ती स्व-प्रतिमा ही काल्पनिक बनत जाते. निरनिराळ्या पात्रांच्या भूमिकेत त्यांचा ‘स्व’ शिरतो. त्यात कधी कठोरपणा, तर कधी एकांतात मिळणारा आनंद जाणवतो.

याउलट, आपलं अनुभवविश्व आणि भवताल यांची सांगड घालताना व्यक्त होण्यासाठी ही स्व-प्रतिमा मदतीला येते. हेमा उपाध्याय यांच्या बऱ्याच कलाकृतींतून अवाढव्य पसरलेल्या महानगरीय पटलावर उमटणारी त्यांची स्व-प्रतिमा साकार झाली. मुंबईमध्ये त्या स्वत: स्थलांतरित असल्यामुळे वैयक्तिक अनुभूती आणि त्या महानगरात आजूबाजूला सतत दृश्यास पडणारे मानवी विस्थापनाचे अनुभव त्यांचा कलाव्यवहार अधिक समृद्ध करीत राहिले. यातूनच स्त्री म्हणून जाणवणारे प्रश्न आणि विविध अवकाशात वावरताना येणारे प्रत्यय हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे संदर्भ बनले. त्यामुळेच वैयक्तिक ओळख, स्मृत्याकुलता, विस्थानन  आणि लिंगभाव हे सारे मुद्दे त्यांच्या कलाव्यवहाराचा भाग बनत गेले. हे अनुभव मांडताना स्व-प्रतिमेचे अस्तित्व त्यांच्या कलाकृतींमध्ये ठळक होत गेलं. ‘किलिंग साइट’ या कलाकृतीत हेच अनुभव अतिशय तरलपणे आपल्या समोर येतात. यात वरच्या बाजूला मुंबईतील कच्ची पक्की घरं, वस्त्या, काही उंच इमारती उलटय़ा लटकताना दिसतात. या वास्तू खालच्या नक्षीकाम केलेल्या मोंटाजवर छपरासारख्या आडोसा धरतात. खालीच्या नक्षीकाम केलेल्या भागात काळ्या-निळ्या रंगांच्या डवरलेल्या फुला-पानांच्या आकारात मधूनच हेमाची छायाचित्रीय प्रतिमा दिसत राहते. एकीकडे हे निळे-काळे आकार शहरावर दाटून आलेल्या ढगांसारखे भासतात तर दुसरीकडे ते मुंबई शहराबद्दल असलेल्या स्वप्न आणि आकांक्षाही दर्शवतात. वरवर पाहता आलंकरणात्मक वाटणारी ही चित्रे आपल्याला शहरी विकासामुळे उद्भवणारी सामाजिक-आर्थिक असमानता, त्याचे कलाकार म्हणून हेमाच्या भावविश्वावर होणारे परिणाम यांची जाणीव करून देते. त्यांची चित्रे ही बहुतकरून आत्मचरित्रात्मक आहेत. मिश्र माध्यमातून काम करताना त्या स्वतची प्रतिमा, बहुतेक वेळा छायाचित्राच्या रूपात, त्यात समाविष्ट करीत. याचं एक कारण म्हणजे ते त्यांचं स्वतचं कथन होतं, आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडीतून आकार घेत जाणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं ते कथन होतं. आणि हे करताना त्या कायमच नवे मार्ग शोधत राहिल्या. कथनाचे, आकृतिबंधाचे नवे आकार-उकार यांच्याशी संवेदनशीलपणे झगडत आणि खेळत राहिल्या.

बऱ्याचदा, अनेक ‘ओळखी’ एका वेळी बाळगत असताना स्व-प्रतिमेतून त्याकडे पाहणं कलाकारांना आवश्यक वाटतं. त्यात आठवणी, अनुभव, अनेक सांस्कृतिक-सामाजिक पदर एकत्र येतात आणि अधिक गुंतागुंतीचा ‘स्व’ त्यातून उभा करतात. ‘अ‍ॅन इंडियन फ्रॉम इंडिया’ ही अन्नू मॅथ्यू यांची छायाचित्रमालिका. वसाहतवादाच्या अनुभवातून १९व्या शतकात तयार झालेल्या ‘इतर’पणाच्या संकल्पनेला हात घालत ही मालिका आकाराला आली. ही मालिका जागतिकीकरणाच्या काळात जगभर विखुरलेल्या लोकांच्या भेगाळलेल्या अस्मितांचा शोध घेते. अमेरिकेच्या रहिवासी असूनदेखील दक्षिण आशियातून स्थलांतरित झालेल्या असल्यामुळे रोजचे येणारे अनुभव रोचक होते. यात रोजच्या व्यवहारात ‘तू मूळची कुठली आहेस?’ या अतिशय साध्या वाटणाऱ्या पण अवघड अशा प्रश्नाला त्यांना सामोरं जावं लागत असे. एक तर आपली मुळं कुठंच रोवलेली नाहीत, अशी भावना त्यातून निर्माण होत राहते आणि त्याच्या जोडीला वांशिक भेदाला तोंड द्यावं लागतं. त्यातच ‘मी इंडियन आहे’ हे सांगितल्यावर त्यांना अमेरिकेतले इंडियन किंवा रेड इंडियन समाजातले समजलं जायचं. या व्यक्तिगत अनुभवामुळे त्यांनी अमेरिकेच्या संदर्भात ‘इंडियन’ अशी ओळख, त्याला असलेलं कनिष्ठ स्थान, वसाहतवादाच्या काळात त्यांचं केलेलं चित्रण याचा विचार सुरू केला. एडवर्ड कर्टसि या छायाचित्रकाराने २०व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेतल्या या मूळ रहिवासी समूहांची छायाचित्रं काढली. त्यात या अस्तंगत होत जाणाऱ्या समूहांचे पेहेराव, रीतीरिवाज, जगण्याच्या पद्धती यांचं दस्तावेजीकरण केलं. पण ते एका वर्चस्ववादी मनोवृत्तीतून. त्याचे समान धागे भारताच्या संदर्भात दिसतात. आपल्याकडे वॉटसनसारख्या छायाचित्रकारांनी इथल्या समूहांचं चित्रण केलेलं दिसतं. अन्नू या सगळ्या प्रकाराकडे उपहासात्मक दृष्टीनं बघतात. तशाच पद्धतीचे कपडे घालून, रंगरंगोटी करून, हत्यारं घेऊन, दागिने घालून त्या कॅमेऱ्यासमोर बसतात. साचेबंद पद्धतीनं काढलेल्या आदिवासींच्या या छायाचित्रांची त्या नक्कल करतात. मूळ छायाचित्राबरोबरच या आत्ताच्या त्यांच्या स्वतच्या छायाचित्राची मांडणी करतात. तिथल्या मूळ रहिवासी असलेल्या अमेरिकन इंडियन्सना वसाहतवाद्यांच्या कॅमेऱ्याने ‘एग्झॉटिक’ का मानलं, असा सवालही विचारतात. तसंच, अस्सल काय, बनावट काय किंवा ‘स्व’ कुठला आणि ‘इतर’ कुठला अशा मुद्दय़ांना त्या यातून हात घालतात.

अंजू दोडियासारखं स्वतच्या अंतरंगात जाणं असेल किंवा अन्नू मॅथ्यूसारखं स्मृतिकोषांतून स्वतकडे पाहणं असेल. परफॉर्मन्सची छायाचित्रमालिका तयार करणाऱ्या पुष्पमाला असतील किंवा स्वत:चं शरीर वापरून ‘बर्ड’सारखा परफॉर्मन्स करणाऱ्या सोनिया खुराणा. या कलाकार आपल्या स्वत:च्या शरीराचा, चेहऱ्याचा किंवा स्व-प्रतिमेचा वापर अतिशय खुबीने आपल्या अभिव्यक्तीत करताना दिसतात. पण त्या अर्थपूर्ण ठरतात कारण या प्रक्रियेत ‘स्वत’ला ओलांडून समष्टीचा विचार करण्याकडे हे कलाकार वळतात.

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत. ई-मेल :

नूपुर देसाई noopur.casp@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2017 1:42 am

Web Title: artists artwork talks about society social issues
Next Stories
1 भूक, कुपोषण : मूक आणीबाणी!
2 मानवाधिकार वि. सशस्त्र गट
3 स्वच्छतेच्या अंतरातील अस्वच्छता!
Just Now!
X