शिवकन्या शशी

शांततेच्या पोटी पोकळ घोषणा नसतात, तर दमदार प्रगती आणि सौख्य असते, हे आपल्या दीर्घ कारकीर्दीत जगाला दाखवून देणारे ओमान या अरब राष्ट्राचे सुलतान काबूस बिन सइद यांची राजवट १८ नोव्हेंबर रोजी पन्नासाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने सुलतान सइद यांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा..

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?

शाळेत ‘माझे पूर्वज’ या विषयावर निबंध लिहिताना बारावीच्या एका मुलीने लिहिले होते, ‘माझे आजोबा एका गॅरेजमध्ये कार दुरुस्तीचे काम करत. एकदा सुलतानांची कार रस्त्यात बंद पडली. आजोबांनी ते पाहिले. धावत त्यांच्या सिक्युरिटी गार्डपाशी गेले. कार दुरुस्त करून दिली. कार दुरुस्त होईपर्यंत सुलतान तिथेच थांबले. निघताना त्यांनी आजोबांना शंभर रियाल दिले आणि ‘स्वत:चे गॅरेज सुरू कर,’ असे सांगितले. प्रत्यक्ष सुलतानाने दिलेले शंभर रियाल म्हणजे आजोबांना दुआच वाटला. अगदी गरीब घरातून आलेल्या माझ्या आजोबांनी त्या शंभर रियालमध्ये स्वत:चे गॅरेज सुरू केले आणि आज मस्कतमध्ये आमचे मोठे गॅरेज आणि गाडय़ांचे शोरूमसुद्धा आहे. आमचा राजा आमच्या बरोबर आहे. आमेन.’

स्वत:च्या राज्यकर्त्यांबद्दल इतक्या आपुलकीने, अभिमानाने लिहिणारी आणि त्याला प्रत्यक्ष पाहणारी ओमानची ही तिसरी पिढी आहे. इतक्या वर्षांच्या वास्तव्यात, आपल्या सुलतानाबद्दल खासगीतसुद्धा फक्त प्रेमादरानेच बोलणारी त्यांची प्रजा आणि परदेशी लोक पाहिले. आपल्या राजाविषयीचा आदर मी समजू शकते, पण त्याच्याविषयीची इतकी आत्मीयता पाहते, तेव्हा सदैव लोकशाही पाहिलेल्या भारतीय मनाला सुरुवातीला जरा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

आधुनिक काळात, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि ब्रुनेईच्या राजानंतर इतका प्रदीर्घ काळ एकछत्री राज्य करणारा राज्यकर्ता म्हणजे ओमानचे सुलतान- काबूस बिन सइद! (हो, ओमान नावाचा एक अरब देश आहे, आणि मस्कत ही त्याची राजधानी आहे.)  उद्या, १८ नोव्हेंबरपासून त्यांच्या राज्यरोहणाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे.

१८ नोव्हेंबर १९४० मध्ये जन्मलेल्या या राजाने आपले प्राथमिक शिक्षण राजवाडय़ातच खासगी शिक्षकांकडून घेतले. नंतर काही काळ आपल्या पुण्यातील ‘नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी’मध्ये लष्करी प्रशिक्षण घेऊन, इंग्लंडमध्ये पुढील शिक्षण घेतले. अशा उच्चविद्याविभूषित तरुणाने स्वदेशी परतताच आपल्या मध्ययुगीन, पुराणमतवादी विचारांच्या वडिलांचा पराभव करून १९७० साली सत्ता ताब्यात घेतली. लगोलग अंतर्गत बंडाळ्या मोडल्या आणि सध्याच्या संयुक्त अरब अमिरातच्या दक्षिणेपासून खाली येमेनच्या उत्तरेपर्यंत ‘सल्तनत ऑफ ओमान’ हे एकसंध राष्ट्र निर्माण केले. तेव्हापासून ओमानच्या आधुनिकीकरणास सुरुवात झाली. २३ जुल हा सत्तांतराचा दिवस ‘प्रबोधन दिवस’ म्हणूनही साजरा केला जातो.

राज्यकारभार हाती घेतला, तेव्हा क्रूड ऑइलपासून मिळणारे उत्पन्न हाच मोठा आधार होता. त्यावर सुलतानाने मोठय़ा द्रष्टेपणाने विविध धोरणे आखून त्यांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. देश म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नव्हे, तर त्यात राहणारे लोक; आणि त्यांचे हित म्हणजे राष्ट्रहित, ही जाणती बुद्धी असणाऱ्या राजाने वाहतूक, ऊर्जा, आरोग्य, सुरक्षा, अन्नधान्य, व्यापार अशा अनेक क्षेत्रांत गुंतवणूक करायला सुरुवात केली. परंतु सगळ्यात महत्त्वाचे पाऊल उचलले ते शिक्षणाच्या बाबतीत. देशात ठिकठिकाणी शाळांची उभारणी करतानाच, मुलींच्या शिक्षणासाठी सुरुवातीपासूनच आग्रही भूमिका घेतली. केवळ मर्यादित धर्मशिक्षण घेऊन उंबरठय़ाआड बंदिस्त झालेल्या मुस्लीम स्त्रीजीवनाला मुक्त जगाची वाट दाखवणाऱ्या या सुलतानाने, त्यांच्यासाठी विविध सुविधा पुरवल्या, अगदी परदेशातील विद्यापीठांच्या शिष्यवृत्त्याही सुरू केल्या. याची गोड फळे आज इथे दिसतात. इतर मुस्लीम देशांतील स्त्रियांच्या मानाने ओमानी स्त्रियांचा सार्वजनिक आणि सेवा क्षेत्रातील स्वतंत्र, सशक्त वावर फार आशादायक आहे. शेजारचा सौदीसारखा देश स्त्रियांना आत्ता कुठे वाहनचालनाची परवानगी देतोय, पण ओमानमधल्या स्त्रियांना शिक्षण मूलभूत हक्क म्हणून देणारा, शुरा कौन्सिलची निवडणूक लढण्याचा आणि मतदानाचा अधिकार देणारा हा राजा स्त्रीदाक्षिण्याचा नवा आयाम अरब जगताला मिळवून देतो.

शिया किंवा सुन्नी यांपकी कोणत्याही कट्टर गटात सामील न होता, ओमानच्या पूर्वापार चालत आलेल्या इबादी या सहिष्णू पंथाचे पालन करणाऱ्या सुलतानाने अरब आणि एकूणच जागतिक राजकारणात अलिप्ततेचे धोरण स्वीकारले आहे. सत्ता हस्तगत करताना इराण, ब्रिटन आणि अमेरिकेने जी मदत केली, त्याचे स्मरण म्हणून त्यांच्याशी कायम मत्रीपूर्ण संबंध ठेवले. परंतु त्याचबरोबर इतर देशांत अमेरिकेने जशा कुरापती काढल्या, तशा आपल्या देशात तो काही करणार नाही, याची दक्षताही घेतली. इतर अरब देश, अमेरिका, युरोपीय राष्ट्रे आणि पूर्वेकडील देशांबरोबर कायम शांततेचे संबंध ठेवण्याची तारेवरची कसरत सतत अर्धशतकभर लीलया पार पाडणे, ही गोष्ट त्यांच्यातील संयत विचार आणि राजकीय शहाणपणाची साक्ष देते.

इस्राएल-पॅलेस्टाइन संघर्ष हा अरब अस्मितेचा लढा आहे. तरीही ओमानने अनौपचारिकरीत्या त्यांच्यात वेळोवेळी शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्न केले आहेत. खाऱ्या पाण्याचे नि:क्षारीकरण करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सुलतानाने ‘मिड्ल-ईस्ट डिसॅलिनेशन रिसर्च सेंटर’ची स्थापना केली. याबाबतीतले इस्राएलचे तंत्रकौशल्य लक्षात घेऊन, त्यांनाही यात सामील करून घेतले. अस्मितेच्या पलीकडे जाऊन मानवहित पाहू शकणाऱ्या या राजाने अलिप्ततावादाचे धोरण कायम ठेवले आणि एकूण अगब जगतातील कोणताही वाद शांततेच्या मार्गाने सोडवण्याच्या अनेक शक्यता निर्माण केल्या. सध्याच्या येमेनच्या (म्हणजेच इराण आणि सौदी – म्हणजेच अप्रत्यक्षपणे अमेरिकेच्या) संघर्षांत सौदीचा कितीही दबाव आला, तरी ओमान आपल्या शांतताप्रिय, अलिप्ततावादी धोरणावर बोट ठेवून हातात शस्त्र घेण्यास नकार देतो. त्यात ओमानचे अरबी समुद्रातील सामरिक ठिकाण इतके मोक्याचे आहे, की या नकाराचा ठणकत का होईना स्वीकार होतो. आपल्या भौगोलिक स्थानाचा राजकीय पटलावर इतका सकारात्मक वापर करणारा असा शांततेचा योद्धा जगातल्या अधिकाधिक देशांना लाभो. एकदा कुणाच्या बाजूने वा विरोधात शस्त्र घेतले की आपण कळसूत्री बाहुले होतो, त्यापेक्षा ‘चार युक्तीच्या गोष्टी सांगण्यासाठी’ आणि तह, समेट घडवून आणण्यासाठी आपली मजलिस कायम उघडी ठेवणाऱ्या या सुलतानाला शांततेचे नोबेल प्रदान करावे, अशी मागणी गेल्या पाच वर्षांत देशातल्या आणि जगातल्या वेगवेगळ्या भागांतून होत आहे. शांततेच्या या मरुद्यानाला कधी तो पुरस्कार मिळाला, तर नोबेलही समाधानी होतील.

या सगळ्यात, मुस्लीम राष्ट्र म्हणजे दहशतवादाला खतपाणी घालणारे राष्ट्र ही प्रतिमा सरसकट तयार होते. परंतु ओमान हा एकमेव मुस्लीम देश याला अपवाद आहे. सुलतानाने अशा बाबतीत सीमांवर कडेकोट बंदोबस्त तर ठेवलाच; परंतु आपली तरुण पिढी यात ओढली जाणार नाही, यावरही कटाक्ष ठेवला. त्यासाठी शिक्षण, रोजगार, इतर धर्मीयांशी-बाहेरच्या प्रगत जगताशी संपर्क अशा अनेक दीर्घकालीन उपाययोजना केल्या. दहशतवादाविरुद्धचे कायदे आणि अंमलबजावणी आणखी कठोर केली. ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर त्याच्या ज्या डायऱ्या सापडल्या, त्यात त्याने नोंद केली आहे की, आपल्या संघटनेच्या बांधणीसाठी त्याला ओमानसारखे मोक्याचे ठिकाण हवे होते; परंतु अनेक प्रयत्न करूनही त्याला ना या भूमीवर पाय ठेवता आला, ना कुठला ओमानी नागरिक गळास लागला! जिथे लादेनच्या आक्रमक जिहादला बहुतेक अरब आणि अरबेतर मुस्लीम देशांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पािठबा दिला, तिथे ओमान हे असे एकमेव मुस्लीम राष्ट्र आहे, ज्याने त्याला आसपासही फिरकू दिले नाही. याचे श्रेय जसे राजाच्या सजगतेला जाते, तसेच ते इस्लाममधील इबादी पंथाच्या सहिष्णुतेच्या शिकवणुकीलाही जाते. बाकी अरब देशांत जिथे शिया आणि सुन्नी यांच्या मशिदी वेगवेगळ्या आहेत, तिथे ओमानमध्ये मात्र शिया, सुन्नी, इबादी आणि बाकी पंथातील लोक एकाच मशिदीत नमाज पढतात. पंथांच्या टोकदार अस्मिता इथल्या मशिदींमध्ये नेमस्त होऊन जातात. तसेच इतर धर्मीयांबद्दल बऱ्यापकी सहिष्णुता आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इथले सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे शिवमंदिर! त्याचे इथल्या िहदू समाजाने जतन करून जीर्णोद्धारही केला आहे. तसेच त्यामानाने नव्याने बांधलेले श्रीकृष्ण मंदिरही! सोबतच ख्रिश्चनांसाठी चच्रेसही आहेत. ज्याला-त्याला आपापले सणवार साजरे करण्याची, रिवाज पाळण्याची मोकळीक आहे. इस्लाममध्ये दारू निषिद्ध आहे, पण परवान्याद्वारे ज्याला हवी, ती तो विकत घेऊ शकतो. पोर्क इस्लाममध्ये हराम आहे, पण इस्लामेतरांसाठी त्यांची वेगळी दुकाने आहेत. इस्लामेतर स्त्री-पुरुषांना सार्वजनिक ठिकाणी त्यांचे-त्यांचे पोशाख घालण्याची परवानगी आहे. अर्थात, यात किमान सभ्यता पाळावी अशी सामान्य अपेक्षा आहे. या एकंदर वातावरणाचा परिणाम म्हणून ओमानी समाज हा विविधतेला सामावून घेणारा आणि शांतताप्रिय होत गेला. यथा राजा तथा प्रजा, हे अनुभवास येते.

आजच्या घडीला धोक्यात आलेल्या पर्यावरणाचे आपल्या दैनंदिन जीवनावर प्रत्यक्ष दुष्परिणाम होत आहेत. यावर उपाय कुणी करायचे, कुणी आपले कार्बन फूटिपट्र्स कमी करायचे, या कळीच्या मुद्दय़ांवर जागतिक नेते एकमेकांकडे बोट दाखवत असताना, सुलतानाने मात्र पर्यावरणस्नेही धोरणे फार आधीपासून आखली आहेत. परिणामत: आजही ओमानचे समुद्रकिनारे स्वच्छ, सुंदर आणि नितळ आहेत. या धोरणाचे उत्तम उदाहरण म्हणजे सूर या शहरानजीकच्या किनाऱ्यावर वाढत असलेली ग्रीन सी टर्टल्स या कासवांची वीण. इथे कासवांच्या इतर प्रजाती, समुद्री जीव यांच्यावर संशोधन, अभ्यास केला जातो. त्यामुळेच जगभरातील अभ्यासकांचे, संशोधकांचे आणि पर्यावरणप्रेमींचे हे आवडते ठिकाण झाले आहे. तसेच इथल्या पर्यावरण पर्यटनातून बऱ्यापैकी रियालही देशाच्या तिजोरीत जमा होतात. प्रगतीचा रस्ता नेहमी पर्यावरणाच्या विनाशातून (म्हणजे आत्मविनाशातून) जातो, हेच लोकांच्या गळी उतरवणाऱ्या अडाणी सत्ताधीशांच्या आणि त्यांच्या नफेखोर भांडवलदारांच्या पार्श्वभूमीवर, निसर्गसंवर्धनाचे हे उदाहरण अधिकच उठून दिसते. तसेच आपल्या देशातील क्रूड ऑइल आणि नसर्गिक वायूचे साठे पुढील अध्र्या शतकात संपुष्टात येतील, हे लक्षात घेऊन राजाने पवनऊर्जा आणि सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देऊन, तसे प्लाण्ट्सही सुरू केले आहेत. सौदी किंवा कुवेतसारखे अवाढव्य तेलसाठे ओमानकडे नाहीत; पण जे थोडके आहेत, ते योग्य रीतीने वापरून भविष्यकालीन समस्यांवर आत्तापासून तोडगे काढून त्यांची अंमलबजावणी करण्यास सुलतानाने सुरुवात केली, आणि ओमानसारख्या छोटय़ा देशांपुढे शाश्वत प्रगतीचा आदर्श नमुना ठेवला. या ठिकाणी भूतानच्या राजांचे स्मरण अशाच पर्यावरणस्नेही धोरणांसाठी आणि वागणुकीसाठी झाल्याशिवाय राहत नाही.

अशा या सुलतानाच्या विरोधात कोण कधी गेलेच नाही का? टीका झालीच नाही का? तर हेही झाले. कट्टर सुन्नी गटाच्या काही विघटनवादी समूहांनी राजाविरुद्ध बंड करण्याचे दोनदा प्रयत्न केले. पण त्यांचा बीमोड करण्यात ओमानी यंत्रणेला यश आले. २०११ साली इजिप्तच्या होस्नी मुबारक यांच्याविरोधात जो उठाव झाला, त्याचे पडसाद थोडय़ाफार प्रमाणात बहुतेक शेजारील अरब राष्ट्रांत उमटले. तसे ते ओमानमध्ये मस्कत, सूर, सोहार, सालालाह या महत्त्वाच्या शहरांमध्येही उमटले. विद्यार्थी, तरुणवर्गाने शांततेच्या मार्गाने मोच्रे काढले, धरणे धरले. तेव्हा तितक्याच तातडीने सुलतानाने त्यांच्या मागण्यांवर आपल्या मंत्रिमंडळाशी विचारविनिमय करून त्यातल्या व्यवहार्य मागण्या मान्य करून त्यांची लगोलग अंमलबजावणीही केली. तरुणवर्गाचा सर्वात मोठा रोष परदेशी कामगार, नोकरदार व व्यापारी वर्गावर (विशेषत: भारतीयांवर) होता. ओमानी लोकांना या संधी मिळायला पाहिजेत, अशी मागणी सर्वात जोरदार होती. सुलतानाने त्यांचा आदर राखला. भूमिपुत्रांच्या रोजगाराला प्राधान्य दिले गेले, आणि तेव्हापासून ओमानीकरणाची प्रक्रिया जोमाने सुरू आहे. परंतु अजूनही जिथे परदेशी तंत्र, मनुष्यबळ, ज्ञान लागेल तिथे तडजोड न करता योग्य ते परदेशी मनुष्यबळ आणण्याचे धोरण कायम आहे.

याच उठावात शुरा कौन्सिलच्या सदस्यांच्या अधिकारात आणखी वाढ करावी म्हणजे ते जनतेसाठी आणखी काम करू शकतील, अशी राजकीय मागणी होती. तीही सुलतानाने मान्य केली आणि त्यांना तसे अधिकार दिले. अशा तऱ्हेने राजेशाहीत राजा हा सर्वेसर्वा असताना, हळूहळू लोकशाहीचे बीजारोपण करून आपले लोक राजकीयदृष्टय़ा सक्षम करण्याचे नतिक कर्तव्यही हा सुलतान पार पाडताना दिसतो. सीरियन निर्वासितांना आपल्या देशात प्रत्यक्ष आश्रय न देण्यावरूनही ओमानच्या धोरणावर टीका झाली. परंतु याबाबतीत, सुलतानाची भूमिका ‘मूळ दुखण्यावर इलाज करा,’ अशीच आहे. निर्वासितांना उचलून मदत केली आणि शांततेच्या मार्गाने या  प्रश्नावर तोडगे काढण्यासाठी आजतागायत वर्षांनुवर्षे सुलतानाने आपल्या प्रतिनिधींमार्फत प्रयत्न केले आहेत.

राजेशाही म्हणजे हुकूमशाही, असा एक साधारण समज असतो. बऱ्याच अंशी तो खराही आहे. परंतु ओमानच्या सुलतानाच्या कारकीर्दीवर नजर टाकली, तर राजेशाहीचे काही सकारात्मक पलूही दिसतात. लोकहित पाहणारा शासक आणि त्याची अंमलबजावणी करणारे कार्यक्षम व गतिमान प्रशासन यांचा मेळ घालून एक चांगली व्यवस्था निर्माण व्हावी, वर्तमान सुसह्य़ व्हावे आणि भविष्याबद्दल आशा वाटावी, इतकी माफक अपेक्षा लोकांची असते. सुलतान ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

(लेखिका ओमानची राजधानी मस्कत येथे इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.)

shivkanyashashi@gmail.com