आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत ‘मला काय त्याचे’ अशी सरधोपट भूमिका न घेता काहीजण पाय रोवून उभे राहतात. परिस्थितीला टक्कर देतात आणि व्यवस्था बदलायला भाग पाडतात. कारण त्यांना माहीत असतं.. केल्याने होत आहे रे.. असे काही शिलेदार आणि त्यांच्या लढय़ांविषयी..

‘पादचारी प्रथम’चे प्रशांत इनामदार गेली अनेक वर्षे पुण्यातील पादचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वीरीत्या काम करत आहेत. प्रत्येक प्रश्नावर आंदोलन करावे लागते असे नाही. आंदोलने न करताही प्रश्न सोडवता येतात हे दाखवून देणाऱ्या एका वेगळ्या कार्यकर्त्यांची ओळख..

रस्त्यावरील वाहतुकीमध्ये पादचारी हा एक महत्त्वाचा घटक आहे, हेच कोणतीही यंत्रणा मानायला तयार नसते. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करताना सर्वाधिक दुर्लक्षित राहतात ते पादचारी. मुळात हा घटक सर्वाकडूनच दुर्लक्षित राहतो. त्यामुळे त्याचे प्रश्न वगैरे सुटणे तर दूरच आणि अशा दुर्लक्षित घटकाला काही प्रतिष्ठा मिळणे तर त्याहूनही दूर; पण अशा या दुर्लक्षित घटकाकडे व्यवस्थेचे लक्ष वळवण्याचा आणि पादचाऱ्यांनाही प्रतिष्ठा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो पुण्यातील पेडेस्ट्रिशियन फर्स्ट (पादचारी प्रथम) या नागरी गटाने. वाहतुकीसह शहराशी संबंधित अनेक प्रश्नांवर गेली वीस-बावीस वर्षे पुण्यात सातत्याने काम करत असलेले प्रशांत इनामदार यांनी स्थापन केलेला हा नागरी गट. पादचाऱ्यांच्या प्रश्नांवर गेली आठ वर्षे इनामदार यांनी चिकाटीने केलेल्या कामाला चांगले यश आले आहे आणि त्यांच्याच पुढाकाराने पुणे महापालिकेचे खास पादचाऱ्यांसाठीचे धोरणही नुकतेच तयार झाले आहे.

प्रशांत इनामदार हे पुणेकर. महाराष्ट्र मंडळमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर फग्र्युसनमध्ये त्यांचे महाविद्यालयात शिक्षण झाले आणि पुढे ते इलेक्ट्रिकल इंजिनीयर झाले. प्रोजेक्ट डिझाईन कन्सल्टन्सी हा त्यांचा व्यवसाय. हा व्यवसाय करत असतानाच पुण्यातील वाहतूक सुधारणेसंबंधीच्या अनेक मुद्दय़ांवर त्यांचे काम सुरू झाले ते वीस-बावीस वर्षांपूर्वी. नागरी सुविधांचे प्रश्न असोत वा वाहतुकीचे प्रश्न असोत, त्यावर जगभर भरपूर उपाय आहेत; पण त्यातले अल्प खर्चातील उपाय कोणते आणि त्यातील कोणते उपाय आपल्याकडे अमलात आणणे शक्य आहे याचा विचार करायचा, त्यावर अभ्यास करायचा, स्वत:हून आराखडे बनवायचे, संबंधित अधिकाऱ्यांना भेटायचे, संवाद साधायचा आणि छोटय़ा छोटय़ा उपायांमधून प्रश्न सोडवायचे हा इनामदार यांच्या कामाचा शिरस्ता. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची चिकाटी आणि तळमळ. सर्वच काम स्वयंसेवी तत्त्वावर केले जात असल्यामुळे वेळ आणि पैसा याकडे न पाहता प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत राहणे ही इनामदार यांची वृत्ती. एखादी संस्था स्थापन केली, की मग संस्थेच्या कामकाजात कार्यकर्ते अडकतात. म्हणून पादचाऱ्यांचे प्रश्न सोडवणारा नागरिकांचा समूह असे ‘पादचारी प्रथम’ या उपक्रमाचे स्वरूप इनामदार यांनी निश्चित केले आहे.

शहरांमधील वाहतुकीचे नियोजन वाहनकेंद्रित असते. त्याऐवजी ते पादचारीकेंद्रित झाले तर फक्त पादचाऱ्यांचेच प्रश्न सुटतात असे नाही, तर त्यामुळे वाहतुकीचेही प्रश्न सुटतात आणि रस्त्यावरील किंवा एखाद्या चौकातील वाहतूक सुरळीत होण्यासदेखील या धोरणामुळे मदत होते हे ‘पादचारी प्रथम’ या गटाने पुण्यातील अनेक मोठय़ा चौकांमधील वाहतूक सुधारणेचे आराखडे तयार करताना दाखवून दिले आहे. एखाद्या भागातील  पादचाऱ्यांचे प्रश्न नेमके काय आहेत हे त्या भागातील नागरिकांनी फोन करून किंवा ई-मेलच्या माध्यमातून सांगितले तरी त्यावरील उपाययोजना इनामदार त्यांना फोनवरूनच कळवू शकतात आणि विशेष म्हणजे हे उपाय त्या त्या ठिकाणी लागूदेखील पडतात. इनामदार म्हणतात की, नागरिकांची अशी धारणा असते की, आमचे प्रश्न आम्ही कोणाला तरी सांगणार आणि मग त्यांनी ते प्रशासनाने किंवा एखाद्या संस्थेने सोडवावेत. अशा वेळी तुम्ही एक पत्र द्या, असे सांगितले तरी नागरिक नाही म्हणतात. त्याऐवजी मी नागरिकांना सांगतो की, तुम्हीच एकत्र या, विचार करा, आम्ही उपाय सुचवतो आणि प्रशासनाबरोबर संवाद साधून आपण प्रश्न सोडवू. हा पर्याय अनेक भागांत उपयोगी पडला आहे आणि त्यामुळे बदल घडू शकतो, प्रश्न सुटू शकतात, असा विश्वासही नागरिकांना मिळाला आहे.

एखाद्या चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या उपाययोजना ‘पादचारी प्रथम’कडून सुचवल्या जातात त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे यावरदेखील कार्यकर्ते लक्ष ठेवतात. त्याचा खूप चांगला उपयोग होतो. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी, अभियंते, वाहतूक पोलीस यांच्याबरोबरच जो ठेकेदार प्रत्यक्ष काम करत असतो त्याच्याकडील अभियंते, त्याचे पर्यवेक्षक, त्याचे कामगार अशा सर्वाना विश्वासात घेऊन नक्की काय काम होणे अपेक्षित आहे, ते का करायचे आहे आणि त्याचा उपयोग काय होणार आहे, हे सर्वाना समजावून सांगण्याचे काम इनामदार करतात. त्याचा परिणाम असा होतो की, कामाचे महत्त्व संबंधित प्रत्येक घटकाच्या लक्षात येते. ‘‘या पद्धतीमुळे आजवर आम्ही काही ना काही चांगले काम करू शकलो. यंत्रणेवर टीका करणे किंवा संघर्ष करणे, भांडत राहणे यापेक्षाही आहे त्या परिस्थितीचा विचार करून त्यात काय बदल घडवता येईल याचा विचार आम्ही प्रामुख्याने करतो. त्यामुळे सर्वाचे सहकार्य मिळते आणि प्रश्न मार्गी लागू शकतात,’’ असा अनुभव इनामदार सांगतात.

‘पादचारी प्रथम’चे महत्त्व पुण्यात जसे महापालिकेने ओळखले आहे तसे ते वाहतूक पोलिसांनीदेखील ओळखले आहे. त्यामुळेच महापालिका तर या गटाचे वेळोवेळी साहाय्य घेतेच तसेच साहाय्य वाहतूक पोलीसदेखील घेतात. वेगवेगळ्या मुद्दय़ांवर वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देण्याचे कामही इनामदार गेली काही वर्षे करत आहेत. मुळात वाहतुकीचा विचार करताना सर्वाधिक प्राधान्य पादचाऱ्यांना दिले गेले पाहिजे. नंतर सायकल चालवणाऱ्यांना, त्यानंतर पीएमपीला म्हणजे सार्वजनिक वाहतुकीला, त्यानंतर रिक्षांना आणि नंतर खासगी वाहनांना, असे तत्त्व इनामदार वेळोवेळी मांडतात. यात प्राधान्यक्रमाने काम केले पाहिजे हा त्यांचा आग्रहाचा विषय आणि ते तो चिकाटीने अनेक मंचांवर हा विषय सातत्याने मांडतात. हा विचार सर्वच यंत्रणांना मान्यदेखील होतो आणि त्यामुळे रिक्षाचालकांचा रिक्षातळाच्या जागांचा प्रश्न असो किंवा पीएमपीसाठीच्या थांब्यांचा प्रश्न असो इनामदार यांचे मत आवर्जून घेतले जाते. आपल्या शहरासाठी चांगले काय करता येईल याचा विचार करायचा आणि त्यात आपण स्वत: सहभागी व्हायचे अशा पद्धतीने त्यांचे काम सुरू असते. म्हणूनच पादचारी प्रथम या गटात कोणीही केव्हाही सहभागी होऊ शकतो. त्यासाठी सदस्यता किंवा काही वर्गणी, संस्थेची कार्यकारिणी असा काही प्रकार नाही. स्वयंसेवी वृत्तीच्या या कामात कोणतीही औपचारिकता मुद्दामच ठेवण्यात आलेली नाही.

पुणे महापालिकेने प्रथमच ‘पादचारी सुरक्षितता धोरण’ तयार केले असून गेल्या महिन्यात त्याला मंजुरी देण्यात आली. पादचाऱ्यांच्या आनंददायी प्रवासाला या धोरणात सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील विविध विकासकामे कशा पद्धतीने करायची, योजना कशा राबवायच्या आदींसाठी महापालिकेची वेगवेगळी धोरणे होती. त्यानुसार ती कामे होत होती; पण पादचारी हा विषय असा होता की, त्यासंबंधी काही ठोस नियमावली वा धोरण नव्हते. त्यामुळे पदपथ बांधणे, पादचारी पूल बांधणे, पादचारी मार्ग तयार करणे आदींसारखी अनेक कामे शहरात होत होती; पण ती एकसारखी होत नव्हती. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय आपापल्या पद्धतीने निर्णय घेत होते आणि काम करत होते. जे योग्य वाटेल त्या पद्धतीने कामे केली जात होती. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी काही एक विशिष्ट धोरण असावे, अशी मागणी इनामदार यांनी लावून धरली होती आणि या मागणीचे महत्त्व लक्षात घेऊन धोरण तयार करण्यात आले. त्यासाठीच्या समितीमध्येही इनामदार यांनी सदस्य म्हणून काम केले आणि धोरणाचा मसुदा तयार करून देण्यात त्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली.

‘‘नागरिक हा आमच्या कामातला मुख्य दुवा आहे. या नागरिकासाठी आमूलाग्र बदल झाले पाहिजेत, परिवर्तन झाले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली जात असली तरी ते शक्य नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीत आपल्याला काय करता येईल याचा विचार मी करतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतो,’’ असे इनामदार सांगतात. बदल घडवायचा तर प्रत्येक वेळी आंदोलने करावी लागतात असे काही नाही. मुळात सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरणे शक्य होत नाही. त्यामुळे लोकसहभाग वाढवून लोकांना क्रियाशील करून काही ना काही करता येते असा त्यांचा अनुभव आहे. आपल्याकडे विविध कामे करण्यासाठी अनेक यंत्रणा काम करत असतात; पण त्यांच्यात समन्वय नसतो. म्हणून सर्व यंत्रणांना एकत्र आणणारा दुवा महत्त्वाचा असतो. असा दुवा होण्याचे काम इनामदार गेली अनेक वर्षे करत आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या कामातून ‘पादचारी प्रथम’ हा संदेशही सातत्याने पोहोचत आहे.
विनायक करमरकर – response.lokprabha@expressindia.com