जव्हार, मोखाडा आणि वाडा या तीन तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमधून सातवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप आठवीसाठी प्रवेश मिळालेला नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा निर्वाळा शासनाचा कायदा देत असला तरी जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात परिस्थिती विपरीत आहे.
ठाणे जिल्ह्य़ात जिल्हा परिषदेने कुठेही आठवीचे वर्ग सुरू न केल्याने व माध्यमिक शाळांची संख्याही अत्यल्प असल्याने येथील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. शासकीय आश्रमशाळांमध्ये तुकडी पद्धत नाही. त्यामुळे एकेका वर्गात शंभर ते सव्वाशे विद्यार्थी बसत आहेत. त्यामुळे सरकारी आश्रमशाळांनीही विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंद केले आहे. त्यामुळे जव्हार, मोखाडा व वाडा या तालुक्यांच्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या अदिवासी विद्यार्थ्यांना सरकारी आश्रमशाळेत प्रवेश न मिळाल्याने या तिन्ही तालुक्यांमधील पाचशेहून अधिक विद्यार्थी आठ ते दहा किलोमीटर अंतर पायी चालत विविध ठिकाणच्या माध्यमिक शाळांमध्ये जात आहेत.