मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील मोलाचा वेळ वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘डीसी-एसी’ परिवर्तनात ६४ अडथळ्यांची शर्यत असल्याचे समोर आले आहे. कुर्ला ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यानची ६४ ठिकाणे या परिवर्तनासाठी धोकादायक असल्याचे खुद्द रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले. आता या ६४ ठिकाणांबाबत सवलत प्रमाणपत्र रेल्वे बोर्डाने द्यायचे आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुन्हा एकदा चाचण्या होऊन सुरक्षा प्रमाणपत्र दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मध्य रेल्वेवरील विद्युत प्रवाहाचे परिवर्तन तूर्तास तरी लांबणीवरच पडले आहे.
मध्य रेल्वेवर सध्या १५०० व्ॉट एवढय़ा थेट विद्युत प्रवाहावर (डीसी) गाडय़ा धावतात. या गाडय़ांचा वेग ताशी ६० ते ८० किमी एवढाच आहे. मात्र हा विद्युतप्रवाह ‘एसी’ झाल्यावर वेग १०० किमीच्या आसपास जाईल. त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवासाची वेळ कमी होणार आहे. तसेच विजेची बचतही मोठय़ा प्रमाणात अपेक्षित आहे. या डीसी-एसी परिवर्तनाची यशस्वी चाचणीही जानेवारी महिन्यात घेण्यात आली होती. त्यानंतर मध्य रेल्वे या परिवर्तनाबाबत प्रचंड आशादायी आहे.
मात्र, रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांना या चाचणीदरम्यान कुर्ला ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांदरम्यान ६४ ठिकाणे धोकादायक असल्याचे आढळले होते. या ६४ ठिकाणी रेल्वे रूळ आणि ओव्हरहेड वायर यांच्यातील उंची आवश्यकतेपेक्षा कमी आहे. याबाबत आपण मध्य रेल्वेला पत्राद्वारे कळवल्याचे बक्षी यांनी सांगितले. सुरक्षेबाबतचे निकष देशभरात सारखे असतात. मात्र काही विभागांच्या भौगोलिक स्थितीप्रमाणे त्यात बदल होऊ शकतो. मात्र त्यासाठी रेल्वे बोर्डाचे सवलत वा सूट प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यासाठीचा अर्ज आता रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाकडून हे सूट प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त पुन्हा एकदा चाचणी घेतील. या चाचणीनंतरच या मार्गावरील डीसी-एसी परिवर्तनाला सुरक्षा प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ही प्रक्रिया औपचारिक असली, तरी त्यासाठी काही वेळ लागणार आहे. परिणामी हे परिवर्तन तूर्तास लांबणीवरच पडले आहे.