सिडकोची अतिक्रमण हटावची मोहीम दिखाव्यापुरतीच आहे. दोन महिन्यांनंतर सिडकोने कळंबोली आणि खांदा कॉलनी येथे कारवाई केली. परंतु ही कारवाई शहरातील काही मुख्य रस्त्यांशेजारील पदपथावर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर सकाळी काही तासांसाठीच होते. कारवाईच्या काही तासांनंतरच फेरीवाले पदपथावरील आपला हक्क सांगत आपले धंदे पुन्हा थाटतात.  
खांदा कॉलनीमध्ये शुक्रवारी सकाळी सिडकोने सेक्टर ८, ९ येथील मार्गावरील फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे केले. मात्र या पदपथांनी काही तासांसाठीच मोकळा श्वास घेतला.
कळंबोली येथे गेल्या आठवडय़ामध्ये याच पथकाने अशीच जोरदार कारवाई केली. परंतु सिडकोच्या पथकाची पाठ फिरल्यानंतर पुन्हा फेरीवाल्यांनी वसाहतींमध्ये आपले राज्य वसवले. खारघरमध्ये अशाच फेरीवाल्यांच्या संबंधातून पोलिसांना लाच घेताना पकडले. त्यामुळे फेरीवाले आणि पोलीस यांच्यातील हितसंबंध उजेडात आले.
सिडकोचे बांधकाम नियंत्रण पथक शहरात कधी येणार याची पूर्णत: माहिती फेरीवाल्यांना होते. हा नेहमीच सुरू असणारा खेळखंडोबा आहे. अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारल्यास ते पोलिसांनाच याची माहिती असते, असे बोलून उत्तर देणे टाळतात. याबाबत पोलिसांना विचारल्यास सिडकोने बंदोबस्त मागितल्यावर आम्ही बंदोबस्त देतो, अशी जबानी दिली जाते.
कळंबोली, खांदा कॉलनीप्रमाणे हे अतिक्रमणाचे ग्रहण खारघर, कामोठे व नवीन पनवेल वसाहतीला लागले आहे. सिडकोचा अतिक्रमण हटाव विभाग आपल्याजवळील अल्प कामगारांचे कारण पुढे करून या गंभीर प्रश्नी कायम स्वरूपातील तोडगा शोधण्यास तयार नाही.