07 August 2020

News Flash

सिडको-रेल्वेतील वादामुळे प्रवासी हैराण

फलाटांवरील छपराची कामेही मंदगतीने खासदारांच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता विमानतळांची स्पर्धा करतील अशी चकाचक आणि ऐसपैस रेल्वे स्थानके उभारून स्वतची पाठ थोपटून घेणाऱ्या सिडकोने नवी मुंबईतील सर्व रेल्वे

| November 20, 2012 11:44 am

फलाटांवरील छपराची कामेही मंदगतीने
खासदारांच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता
विमानतळांची स्पर्धा करतील अशी चकाचक आणि ऐसपैस रेल्वे स्थानके उभारून स्वतची पाठ थोपटून घेणाऱ्या सिडकोने नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांच्या देखभालीकडे सध्या पाठ फिरवल्याने या स्थानकांची दिवसेंदिवस दुरवस्था होऊ लागली आहे. जागोजागी निखळलेले प्लॅस्टर, गळणारे छप्पर, तुटलेल्या टाईल्स यामुळे सुरुवातीला आदर्शवत वाटणाऱ्या रेल्वे स्थानकांची अक्षरश दुर्दशा झाली असून ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनाही रेल्वे तसेच सिडकोच्या अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.
ठाणे-वाशी-पनवेल रेल्वे मार्गावर मोठा गाजावाजा करत १२ डब्यांची लोकल सुरू करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने स्थानकांमध्ये छत उभारणीचे काम मात्र अत्यंत मंदगतीने सुरू ठेवले आहे. या छताच्या उभारणीसाठी सिडकोने रेल्वे प्रशासनाला पैसे दिले आहेत. हार्बर मार्गावर १२ डब्यांची लोकल सुरू करण्यात तांत्रिक अडचणी असल्याने ठाणे-वाशी-बेलापूर या ट्रान्स हार्बर मार्गावर ही लोकल सुरू केली जावी, अशी प्रवाशांची मागणी होती. ही मागणी उचलून धरत वर्षभरापूर्वी रेल्वेने या मार्गावर १२ डब्यांच्या लोकल सुरू केल्या. त्यासाठी स्थानकाच्या रुंदीकरणाची कामेही वेगाने उरकण्यात आली. मात्र, छप्पर टाकण्याची कामे अत्यंत मंदगतीने सुरू असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे-वाशी मार्गावरील ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे अशा सर्व मार्गावर छप्पर उभारणीची कामे अतिशय मंदगतीने सुरू आहेत, अशी तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. या तक्रारींची दखल घेत खासदार संजीव नाईक यांनी मध्यंतरी रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत या स्थानकांची पाहणी केली. यावेळी रेल्वे अभियंत्यांनी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस छप्पर टाकण्याची कामे पूर्ण होतील, असा दावा केला. दरम्यान, ठाणे-वाशी रेल्वे स्थानकांच्या डोक्यावर अपुरे छप्पर असल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे बेलापूर, नेरुळ, जुईनगर, वाशी, सानपाडा अशा स्थानकांची पुरेशा देखभालीअभावी अक्षरश दुरवस्था झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या तुलनेत सिडकोने नवी मुंबईत अतिशय भव्य अशी रेल्वे स्थानके उभारली आहेत. या रेल्वे स्थानकांच्या देखभालीची जबाबदारी रेल्वेने स्वीकारावी, अशी सिडकोची अपेक्षा आहे. मात्र, देखभाल, दुरुस्तीच्या कामावरून सिडको आणि रेल्वे प्रशासनात मतभेद आहेत. या मतभेदांमुळे रेल्वे स्थानकांना अक्षरश गळती लागली आहे. सिडको आणि रेल्वेने मतभेद मिटवून रेल्वे स्थानकांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी  खासदार संजीव नाईक यांनी मध्यंतरी दोन्ही प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना भेटून केली होती. मात्र, खासदारांच्या मागणीलाही ही प्राधिकरणे दाद देत नसल्याचे चित्र आहे.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2012 11:44 am

Web Title: clashes between sidco railway peoples are facing the problemmes
टॅग Railway
Next Stories
1 ठाण्यात रुजतोय सार्वजनिक वाहतुकीचा खासगी मार्ग
2 जंगलाचे रक्षक बनत आहेत ‘भक्षक’!
3 १७ जागांसाठी ८६ उमेदवारांचे अर्ज दाखल
Just Now!
X