भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेच राहावेत, अशी काँग्रेसची इच्छा आहे. कारण, गुजरात वगळता मोदींना कोणीही ओळखत नाही. याउलट, राहुल गांधी यांचे नाव देशातील तरुणांनी पंतप्रधानपदासाठी समोर केले आहे. त्यामुळे मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी तुलना होऊच शकत नाही, असे मत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सतत पाच दिवस ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मुक्काम केल्यानंतर सिंह यांनी मंगळवारी येथे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.
देशात सध्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मुलायमसिंग यादव व मायावती यांच्यासह भाजप-शिवसेना व इतरही पक्ष काँग्रेसवर कठोर टीका करीत आहेत, मात्र अशाही परिस्थितीत काँग्रेस या निवडणुका जिंकेल, असा विश्वास दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केला. काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे, मात्र भाजपमध्ये नेतृत्वावरून गोंधळ आहे. भाजपने पंतप्रधानपदाची उमेदवारी केवळ नरेंद्र मोदी यांनाच द्यावी, असा काँग्रेचाही आग्रह आहे. मोदी केवळ मीडियाचे हीरो आहेत. सर्वसामान्यांमध्ये त्यांची लोकप्रियता नाही असेही ते म्हणाले.
मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातने प्रगती केली, असा प्रचार केला जात असला तरी ते शंभर टक्के सत्य नाही. शिक्षणात केरळ, औद्योगिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर आहे. केवळ कार्पोरेट क्षेत्रातील लॉबींच्या भरवशावर गुजरातने प्रगती केल्याचा खोटा प्रचार सुरू आहे. मोदींची तुलना करायचीच असेल तर राहुल गांधींशी नाही, शीला दीक्षित व तरुण बोगई या मुख्यमंत्र्यांसोबत करा, असेही ते म्हणाले. काँग्रेस हा अहिंसा, प्रेम, सद्भावना व धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, अशा सर्वधर्म व जातीतील लोकांचा या पक्षात समावेश आहे. याउलट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू दहशतवादी संघटना म्हणून समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसविरुद्ध भ्रष्टाचाराची खोटी मोहीम सुरू केली. रामदेवबाबा, अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम देशपातळीवर राबवण्यात आली, मात्र लोकांनी त्यांना साफ नाकारले आहे. जागतिक पातळीवरील नेता म्हणून स्वत:ला समोर करणारे केजरीवाल आज दिल्लीतील नेताही राहिलेले नाहीत. रामदेवबाबा व अण्णा हजारे यांची परिस्थितीही केजरीवाल यांच्याप्रमाणेच झाली आहे. या देशात काँग्रेसने एक विचार दिला आहे. जगात सर्वत्र आर्थिक मंदी असताना भारताची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे.
सोनिया गांधी यांच्या कठोर नेतृत्वामुळे ही मजल मारता आली. या देशात जोवर गांधी विचारधारा आहे तोवर नरेंद्र मोदी किंवा संघ परिवार सत्तेत येणार नाही. गरिबांचे शोषण आणि कार्पोरेट कंपन्यांची तळी उचलणारे मोदी केवळ पंतप्रधानपदाचे स्वप्न बघू शकतात, पंतप्रधान मात्र होऊ शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणवणाऱ्या भाजपच्या नेत्यांनीच टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याला जन्म दिला. काँग्रेसने सर्व भ्रष्टाचारी मंत्री, आमदार, खासदारांवर कारवाई केली आहे. प्रसंगी भाजपने अशा किती नेत्यांवर कारवाई केली ते आधी सांगावे व नंतरच भ्रष्टाचारावर बोलावे. भ्रष्टाचार उघडकीस आणणारा माहिती अधिकाराचा कायदा काँग्रेसने लागू केला. त्यामुळे अनेक भ्रष्टाचार उघडकीस आले आहेत. लोकपाल देखील काँग्रेसला लागू करायचे आहे, मात्र भाजप, केजरीवाल, रामदेवबाबा व अण्णा हजारे यांना लोकपाल नको आहे. त्यांना केवळ लोकपालाची चर्चा करून वातावरण तापवायचे आहे. महाराष्ट्रातही ठाकरे परिवाराकडून गुंडागर्दी   करून   लोकांचा आवाज दाबण्याचा  प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
संजय दत्त हार्डकोअर क्रिमिनल नसल्याने त्याला शिक्षेतून सूट देण्यात यावी, असे ते म्हणाले. राजनाथसिंग यांनी जाहीर केलेल्या भाजपच्या नव्या कार्यकारिणीत अमित शाहा या गुंडाचा समावेश आहे. यावरूनच भाजपला या देशात शांततामय निवडणुका नको, हे सिद्ध होते, असेही ते म्हणाले. यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार डॉ. उसेंडी, माजी आमदार अविनाश वारजूरकर, राहुल पुगलिया, गजानन गावंडे, महापौर संगीता अमृतकर, अशोक नागापुरे, रामू तिवारी आदी उपस्थित होते.