गावागावांत स्मशानभूमीवरून नेहमीच वाद उद्भवतात. स्मशानभूमीची दुरवस्था अनेक ठिकाणी असते. मात्र, झरी येथील प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण कांतराव देशमुख यांनी स्वखर्चातून स्मशानभूमी तर उभारली. त्याची रंगरंगोटी व दुरुस्तीकडेही ते जातीने लक्ष घालतात. हा प्रयोग अन्य गावांसाठी आदर्श ठरू लागला आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीची समस्या सोडविण्यासाठी देशमुख यांनी जमीन विकत घेऊन ९ लाख रुपये खर्च केले.
परभणी तालुक्यातील १७ हजार लोकसंख्या असलेल्या झरी या गावचे सलग २५ वष्रे सरपंचपद भूषविणारे कांतराव देशमुख हे राजकीय क्षेत्रातच नावाजलेले व्यक्तिमत्त्व. या शिवाय शेतीत केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगामुळे ते परिचित आहेत. झरीसारख्या मोठय़ा गावात अंत्यसंस्कारासाठी सोय नव्हती. अडचण लक्षात आल्यानंतर गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दुधना नदीच्या काठावर एक एकर जागा खरेदी करून ती स्मशानभूमीसाठी दान केली. पत्नी गंगाबाई या जिल्हा परिषदेच्या सभापती असताना कांतराव यांनी जिल्हा परिषदेच्या निधीतून संरक्षण िभत व अंत्यसंस्कारासाठी निवाऱ्यासाठी प्रयत्न केले. यासाठी कमी पडलेली तीन लाखांची रक्कम त्यांनी स्वत:च्या खिशातून भरुन हे काम पूर्णत्वास नेले. या स्मशानभूमीला त्यांनी मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठधाम असे नाव दिले आहे. आईच्या स्मरणार्थ उभारलेल्या या स्मशानभूमीचा अलिकडेच पुन्हा रंगरंगोटी केली. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली. मोकळ्या जागेत वड, पिंपळ, कडूिनब अशी झाडे लावली. त्यासाठी कूपनलिकाही घेतली. एकाच वेळी तीन अंत्यसंस्कार होऊ शकतील. स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीवर वृक्ष लागवड, बेटी बचाव, पाणी वाचवा, अंधश्रद्धा, आई-वडिलांची सेवा यासारख्या विषयांचा संदेश दिला आहे. केवळ सुधारणा करून न थांबता त्या सुधारणा टिकाव्यात यासाठी देशमुख नित्यनियमाने पाहणी करतात. त्यांनी केलेला हा उपक्रम इतर गावांनी स्वीकारल्यास निश्चित बदल घडू शकतील, असे देशमुख यांनी सांगितले.