औरंगाबाद महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत व्हावे, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे करण्यात आली.
थोरात औरंगाबाद दौऱ्यावर आले असता सुभेदारी विश्रामगृहावर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. शिष्टमंडळात आमदार डॉ. कल्याण काळे, राजकुमार जाधव, डॉ. पवन डोंगरे, महिला शहराध्यक्षा विमल मापारी, रेखा काळे आदींचा समावेश होता. निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या समांतर योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. योजनेसाठी एस.पी.एम.एल कंपनीअंतर्गत औरंगाबाद वॉटर युटिलिटी सव्र्हिसेसबरोबर केलेला करार त्वरित रद्द करावा. योजनेचा खर्च दहापटीने वाढला आहे. तसेच योजना अजून सुरू झाली नसतानाही योजनेला पुरस्कार मिळाल्याचे सांगण्यात येते. हा पुरस्कार घेण्यासाठी महापौर अमेरिकेत जातात, ही निषेधार्ह गोष्ट आहे.