कांद्याला हमी भाव जाहीर न झाल्यास केंद्रीय मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. डाळिंबास मिळणाऱ्या अल्प भावाबद्दलही संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.
केंद्र सरकार इजिप्तचा कांदा तीन हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भावाने खरेदी करत असताना जिल्ह्य़ातील बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांचा कांदा अवघा ५०० रुपये क्विंटल या कवडीमोल भावाने विकला जात आहे. मागील वर्षी ७० ते ८० रुपये किलो दर मिळालेल्या डाळिंबाला यंदा केवळ २० रुपये दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. अल्प दरामुळे डाळिंब व कांदा उत्पादनाचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. यास शासनाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. डाळिंब हे कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाते. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा परिसरात डाळिंबाचे क्षेत्र अधिक आहे. उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी आणून जतन केलेल्या डाळिंबाने यंदा शेतकऱ्यांना रडकुंडीला आणले आहे. शासनाचे धोरण आणि निसर्गाची अवकृपा यांची भर पडली. जानेवारी ते मार्च या कालावधीत गारपिटीने बागांचे नुकसान झाले, तर मे-जून महिन्यात तेल्या रोगाने झडप घातली. त्यामुळे ७० टक्केबागा उद्ध्वस्त झाल्या. हाती आलेला माल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. वर्षभरात विविध संकटांना तोंड देताना शेतकऱ्याच्या नाकी नऊ आले. कशाबशा वाचलेल्या डाळिंबाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
कांदा व डाळिंब ही जिल्ह्य़ातील प्रमुख पिके आहेत. शेतकऱ्यांनी महागडय़ा प्रमाणावर खते व कीटकनाशके खरेदी केली; परंतु पिकांना हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. डाळिंबावरील तेल्या रोगाने शेतकरी त्रस्त झाला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाचे दर कोसळले आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कांदा आणि डाळिंब यांना स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे, अन्यथा केंद्रीय मंत्र्यांवर शेतकरी कांदा, डाळिंब फेकतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गोविंद पगार, दीपक पगार, हंसराज वडघुले, बापू जाधव आदींची स्वाक्षरी आहे.