वाढत्या गर्दीमुळे मिळेल त्या डब्यात शिरून आपला मुक्काम गाठण्याच्या प्रवाशांच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे ठाणेपल्याडच्या स्थानकांमध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणीमधील भेद संपुष्टात येऊ लागला आहे. त्यामुळे जिकिरीचा उपनगरी रेल्वे प्रवास काही प्रमाणात का होईना सुसह्य़ व्हावा म्हणून द्वितीय श्रेणीपेक्षा कैक पट अधिक पैसे मोजून प्रथम दर्जाचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना गाडीत शिरणेही मुश्कील होऊ लागले आहे. द्वितीय श्रेणी प्रवाशांच्या या वाढत्या अतिक्रमणाविरोधात प्रथम श्रेणीच्या प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यात रेल्वे प्रशासनाने आता प्रथम श्रेणीची दरवाढ कायम ठेवल्याने हा ‘वर्ग’संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार दररोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या ४० लाख प्रवाशांपैकी दहा टक्के म्हणजे चार लाख प्रवासी प्रथम वर्गाने प्रवास करतात.
पिकअवरमध्ये मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी हा सध्या चिंतेचा विषय आहे. मुंबई शहरात उपनगरी रेल्वे सेवेसोबत आता बेस्टबरोबरच मोनो तसेच मेट्रोचे पर्याय उपलब्ध आहेत. ठाणेपलीकडच्या प्रवाशांना मात्र वाहतुकीसाठी रेल्वे हाच एकमेव पर्याय आहे. त्यातही ठाणे-पनवेल उपनगरी सेवेचा भार ठाणे स्थानकावर आहे. त्यामुळेच गर्दीच्या बाबतीत ठाणे आणि डोंबिवली स्थानकांनी दादरला मागे टाकले आहे. सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ांमध्ये डोंबिवली स्थानकात अनेक प्रवाशांना शिरताच येत नाही. संध्याकाळी परतीच्या प्रवासात हीच परिस्थिती ठाणे स्थानकात असते. गर्दीचे हे चक्रव्यूह भेदण्यासाठी ठाणे-कर्जत/ कसारा मार्गावर शटल सेवा हा उत्तम मार्ग असला तरी अजूनही पिकअवरमध्ये पुरेशा गाडय़ा ठाण्याहून सुटत नाहीत. चार वर्षांपूर्वी ठाणे शटलच्या ३४ फेऱ्या सुरू करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली होती, मात्र सध्या संध्याकाळी गर्दीच्या वेळी पाच ते नऊदरम्यान ठाण्याहून अवघ्या पाचच गाडय़ा सुटतात. त्यामुळे अनेक द्वितीय दर्जाचा पास असणारे प्रवासी गाडी चुकू नये म्हणून नाइलाजाने प्रथम वर्गात शिरण्याचा पर्याय स्वीकारू लागले आहेत. त्यातील काही प्रवासी डोंबिवली अथवा कल्याण स्थानकात उतरून पुढील प्रवास द्वितीय श्रेणीच्या डब्यातून करतात. मात्र त्यांच्या वाढत्या संचारामुळे प्रथम वर्गाला द्वितीय वर्गाची अवकळा आली आहे. विशेष म्हणजे प्रथम वर्गाचा पास असूनही या वाढत्या घुसखोरीमुळे अनेक प्रवाशांना गाडीत शिरणे मुश्कील होऊ लागले आहे.
चौपट दंड आकारावा
मध्य रेल्वेकडे तिकीट तपासनीसांची कमकरता आहे. गर्दीच्या वेळी टी.सी. कधीच डब्यात नसतात. त्यामुळेही हे प्रकार वाढीस लागल्याची माहिती डोंबिवली प्रवासी संघटनेचे मनोज मेहता यांनी दिली. प्रथम श्रेणीतून अवैध रीतीने प्रवास करणाऱ्यांकडून चौपट दंड आकारावा, अशी मागणीही त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2014 रोजी प्रकाशित
उपनगरी रेल्वे प्रवासात ‘वर्ग’संघर्ष
वाढत्या गर्दीमुळे मिळेल त्या डब्यात शिरून आपला मुक्काम गाठण्याच्या प्रवाशांच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे ठाणेपल्याडच्या स्थानकांमध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणीमधील भेद संपुष्टात येऊ लागला आहे.
First published on: 27-06-2014 at 06:34 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First class pass holders having problem in suburban railway journey