नवी मुंबई विमानतळाला अडसर ठरू पाहणाऱ्या दहा गावांतील भौगोलिक सर्वेक्षण लेझर इॅमॅजिंग डिटेक्शन अँड रेिजग (लीडार) पद्धतीने पूर्ण झाल्यावर आता सिडको रायगड जिल्ह्य़ातील २७० गावांच्या नयना व कर्नाळा अभयारण्याजवळील सहा गावांच्या खोपटा क्षेत्रांचेही लीडार पद्धतीने सर्वेक्षण करणार आहे. त्यासाठी सिडको ६० कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे. या सर्वेक्षणामुळे सिडकोला घरबसल्या या गावांची इत्थंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. या सर्वेक्षणाने अनधिकृत बांधकामांची नेमकी संख्याही स्पष्ट होण्यास मदत मिळणार आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर रायगड जिल्ह्य़ातील पनवेल व उरण या भागात मोठी उलथापालथ झाली आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पबाधितांना सिडकोने वेगळे पॅकेज देऊन त्यांचे चांगले पुनर्वसन करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पात दहा गावांची राहती जमीन जाणार आहे. त्यामुळे त्यांचे भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्व प्रकारे सर्वेक्षण करण्याचे काम सध्या सुरू आहे. या गावांच्या भौगोलिक सर्वेक्षणाची जबाबदारी जेनेसिक इंटरनॅशनल कंपनीवर सोपविण्यात आली असून ती अंतिम टमप्प्यात आहे. ‘नासा’सारख्या जागतिक संशोधन संस्थेने शिफारस केलेली लीडार पद्धत १९७० च्या दशकात विकसित झालेली आहे. सिडकोने नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या दहा गावांचे सर्वेक्षण लीडार पद्धतीने केल्याने या दहा गावांची रचना, तेथील भौगलिक स्थिती कार्यालयात बसून प्राप्त झाली आहे. हीच पद्धत सिडकोच्या दुसऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी वापरली जाणार असून रायगड जिल्ह्य़ातील पेण, पनवेल, उरण, खालापूर आणि ठाण्यातील काही भागांतील २७० गावांना शासनाने नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र (नयना) घोषित केले आहे. या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सिडकोचे आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी स्वेच्छेने जमिनी दिल्यास त्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारीही सिडकोवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे सिडको या नयना क्षेत्राचे प्रथम लीडार पद्धतीने सर्वेक्षण करणार आहे. हे क्षेत्रफळ ६०० किलोमीटर आहे. त्याच वेळी नयना क्षेत्रापूर्वी सिडकोकडे  कर्नाळा अभयारण्याजवळील सहा गावांच्या खोपटा प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सोपविण्यात आले होते. या प्रकल्पाचेही भौगोलिक सर्वेक्षण करण्याचे काम जेनेसिकला देण्यात येणार असून यासाठी सुमारे ६० कोटी खर्च केले जाणार आहेत. घरातील संगणकावर गावांची माहिती या तंत्रज्ञानामुळे प्राप्त होणार असल्याने सिडकोने या तिन्ही मोठय़ा प्रकल्पांचा लीडार पद्धतीने सर्वेक्षण करण्यावर भर दिला आहे.