नगर-मनमाड राज्यमार्गावरील देहेरे येथील टोलवसुली थांबवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आक्रमक आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात या कार्यकर्त्यांनी धरणे धरली, मात्र या दरम्यान अधिका-यांशी त्याची जोरदार खडाजंगी झाली. कार्यकर्त्यांची पोलिसांशीही खडाजंगी झाली.
पक्षाचे शहर सरचिटणीस अभिजित खोसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले. या प्रश्नाबाबत कार्यकारी अभियंता रहाणे यांनीच आज खोसे यांना चर्चेला बोलावले होते. ठोस निर्णय होणार नसेल तर येथेच ठिय्या आंदोलनाचा इशाराही खोसे यांनी दिला होता. या चर्चेदरम्यानच जोरदार खडाजंगी झाल्याने कार्यालयात काही काळ तणाव निर्माण झाला. संतप्त कार्यकर्त्यांनी खुर्च्यांचीही फेकाफेक केली. अखेर अधीक्षकांसमवेत बैठक घेण्याच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
खोसे यांनी सांगितले, की येथील टोलवसुलीबाबतच्या सर्वच गोष्टी संशयास्पद आहेत. रस्त्याची कामे पूर्ण झाली नसतानाच या विकसकाला पूर्णत्वाचा दाखला देऊन टोलवसुली सुरू करण्यात आली. त्यालाही तीन वर्षे झाली तरी ही कामे अजूनही अपूर्णच असून वारंवार मागणी करूनही याबाबत कारवाई झालेली नाही. विकसकाच्या हिताची येथे जपवणूक करण्यात येत असल्याचा आरोपही खोसे यांनी केला. याच कारणावरून येथे कार्यकारी अधिकारी रहाणे व खोसे यांच्यासह कार्यकर्त्यांची जोरदार खडाजंगी झाली. मोठय़ा पोलीस बंदोबस्तामुळे कार्यकर्ते अधिकच संतप्त झाल्याने काही काळ तणाव वाढला होता. कार्यकर्त्यांनी सुमारे दोन तास या कार्यालयात ठिय्या दिला.
कार्यकारी रहाणे यांनीही कार्यकर्त्यांना सडेतोड उत्तरे देण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिकच चिघळण्याची चिन्हे होती. येथील टोलवसुलीस तूर्त स्थगिती देण्याचा प्रस्ताव या कार्यालयाने वरिष्ठांकडे पाठवला असून मंत्रालयातच तो अडला आहे, तेथेच तुम्ही पाठपुरावा करा असा सल्ला त्यांनी दिल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. खोसे यांनी रहाणे यांच्यावरच या वेळी अनेक आक्षेप घेतले. याबाबत अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करूनही प्रश्न न सुटल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा खोसे यांनी दिला.