काल सोमवारी दुपारी शहरात दहिटणे येथील शिवारात दोन अल्पवयीन मुलांसह तरुणाचा निर्घृण खून करून मृतदेह टाकून दिल्याच्या घटनेचा मंगळवारी दुसऱ्या दिवशी तपास लागला नाही. दरम्यान, मृतदेहांची न्यायवैद्यक तपासणी मंगळवारी दुपारी करण्यात आली. यात हे हत्याकांड नेमके केव्हा झाले, याचा अहवाल सायंकाळी उशिरापर्यंत आला नाही.
काल सोमवारी दुपारी दहिटणे शिवारात एका शेतात दोन अल्पवयीन मुले व एका तरुणाचा निर्घृण खून करून मृतदेह टाकल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली होती. मृतांची ओळख अद्याप पटली नाही. त्यामुळे या हत्याकांडाचे गूढ उकलले जाऊ शकले नाही. मारेकरी कोण, हत्याकांडाचे निश्चित कारण काय, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हय़ासह शेजारच्या उस्मानाबाद, लातूर, तसेच कर्नाटकातील गुलबर्गा, बिदर आदी भागांतील पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला असता त्यातून कोणताही सुगावा लागला नाही.
दरम्यान, आढळून आलेले तिन्ही मृतदेह एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता गृहीत धरून जोडभावी पेठ पोलिसांनी या मृतांबरोबर घरातील महिला किंवा अन्य कोणाचा मृतदेह सापडतो काय, याचाही शोध घेतला. त्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. परंतु चौथा मृतदेह कोठेही सापडला नाही. हत्याकांडाचे भीषण स्वरूप लक्षात घेता सदर तिन्ही मृत हे बहुधा पारधी समाजातील असण्याची शक्यता विचारात घेऊनही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.