News Flash

मुंबईतील मतदारसंघांचा लेखाजोखा..

मुंबईची शान असलेला कुलाबा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. पूर्वी काँग्रेसचे मर्झबान पात्रावाला यांचे, तर आता अ‍ॅनी शेखर यांचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. सलग

| September 30, 2014 06:36 am

कुलाबा विधानसभा :
पाण्याची चणचण अन् जुन्या इमारतींचा प्रश्न
मुंबईची शान असलेला कुलाबा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. पूर्वी काँग्रेसचे मर्झबान पात्रावाला यांचे, तर आता अ‍ॅनी शेखर यांचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. सलग तीन निवडणुकांमध्ये अ‍ॅनी शेखर येथून विजयी होत आल्या आहेत. या मतदारसंघात कफ परेड, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट आदी परिसर येतो. उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीवासीय अशी संमिश्र लोकवस्ती येथे आहे. ‘म्हाडा’चे सर्वात जुने आणि प्रचंड मोठे संक्रमण शिबीरही याच मतदारसंघात आहे. मुंबईतील धोकादायक ठरलेल्या इमारतींमधील रहिवासी या संक्रमण शिबिराच्या आश्रयाला आहेत. अस्वच्छता, गुन्हेगारी, पाण्याची चणचण अशा अनेक नागरी समस्यांनी येथील रहिवासी त्रस्त आहेत. मूळ इमारत उभी राहात नसल्याने या मंडळींच्या नशिबी वर्षांनुवर्षे संक्रमण शिबिरात खितपत पडणे आले आहे. झोपडपट्टीवासीयांना खूश करण्यासाठी राजकारण्यांनी सार्वजनिक शौचालये आणि अन्य काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे या सुविधाही अपुऱ्या पडत आहेत. आजही या परिसरात कमी दाबाच्या पाणीपुरवठय़ामुळे रहिवासी त्रस्त आहेत. मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्नही ऐरणीवर आहे. या परिसरात मोठय़ा संख्येने असलेल्या कार्यालयांत कर्मचाऱ्यांचा प्रचंड राबता असतो. तसेच वाहनांची वर्दळही प्रचंड असते. परिणामी, येथे वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली आहे. गेल्या काही वर्षांपासून खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना त्रस्त आहेत.
या मतदारसंघातून काँग्रेसने पुन्हा एकदा अ‍ॅनी शेखर यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने राज के. पुरोहित, शिवसेनेने दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, मनसेने अरविंद गावडे, तर राष्ट्रवादीने बशीर पटेल यांना रिंगणात उतरविले आहे. गेल्या वेळी शिवसेनेची अख्खी फौज राज के. पुरोहित यांच्या पाठीशी असतानाही मनसेमुळे झालेल्या मतविभाजनामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता शिवसेनेच्या पांडुरंग सकपाळ यांचे आव्हान त्यांच्या पुढे आहे. परिणामी, पुन्हा एकदा पुरोहित यांच्या पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या पाच वर्षांत कुलाब्यात शिवसेनेने बांधणी केली आहे. त्यातच अ‍ॅनी शेखर यांच्या पुत्राची तरणतलाव बांधण्याची योजना वादग्रस्त ठरल्याने काँग्रेसविरोधी वातावरणात भर पडली आहे. याचा फायदा शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ यांना मिळू शकतो.

कायमस्वरूपी सदनिका देण्यात यश
पूर्वी मलबार हिल जलाशयामध्ये दररोज २२० दशलक्ष पाणी उपलब्ध होत होते. मात्र सातत्याने पाठपुरावा करून रोज २४० दशलक्ष लिटर पाणी जलाशयात आणण्यात यश आले. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. कुलाबा संक्रमण शिबिरातील काही रहिवाशांना तेथेच नव्या इमारतीमध्ये कायमस्वरूपी सदनिका देण्यात यश मिळाले आहे. टप्प्याटप्प्याने या रहिवाशांचा प्रश्न सोडविण्यात येईल. चाळी आणि झोपडपट्टय़ांमधील मुलांसाठी आठ अभ्यासिका, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, उद्यानांचा विकास, मच्छीमार नगरचे सुशोभीकरण अशी अनेक कामे गेल्या पाच वर्षांत केली आहेत.
विद्यमान आमदार अ‍ॅनी शेखर

अ‍ॅनी शेखर पाच वर्षांमध्ये  दिसल्याच नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे काँग्रेसचा विजय झाला. मात्र अ‍ॅनी शेखर गेल्या पाच वर्षांमध्ये कुणाला दिसल्याच नाहीत. या भागातील चाळकरी, झोपडपट्टीवासीयांसाठी त्यांनी काहीच केले नाही. या मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी त्यांनी विधानसभेत तोंडही उघडले नाही. त्यांनी आमदार निधी कुठे आणि कसा खर्च केला हे त्यांना आणि त्यांच्या पुत्राशिवाय कुणालाच माहीत नाही. सीआरझेडमुळे या भागातील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. पाणी, स्वच्छता असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. परंतु ते सोडविण्यात त्या अपयशी ठरल्या आहेत. याबाबत त्यांना मतदारांना जाब द्यावाच लागेल.
  भाजप उमेदवार राज के. पुरोहित.

मुंबादेवी मतदारसंघ :
जुन्या इमारतींचा सापळा!
मुंबादेवी मतदारसंघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र फेररचनेत या मतदारसंघाचा विस्तार झाला आणि डोंगरी, सॅण्डहर्स्ट रोड, भोईवाडा आदी मुस्लीमबहुल परिसर या मतदारसंघात समाविष्ट झाला. त्यानंतर येथील राजकीय समीकरणेच बदलली. बदलती परिस्थिती लक्षात घेऊन भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेच्या झोळीत टाकून दिला आणि काँग्रेसच्या अमीन पटेल यांनी तिथे विजय मिळवला. दाटीवाटीने उभ्या असलेल्या जुन्या इमारती हा येथील कळीचा मुद्दा. या इमारतींमध्ये हजारो रहिवासी जीव मुठीत घेऊन राहात आहेत. त्यातच काही परिसरामध्ये दूषित आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठय़ामुळे रहिवासी त्रस्त आहेत. जुन्या इमारतींमधील घरगल्ल्या कचऱ्याचे आगर बनल्या असून त्यामुळे आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत असतात. अनेक पदपथ फेरीवाल्यांनी अडविल्यामुळे पादचाऱ्यांना चालणेच मुश्कील झाले आहे. बाजारपेठांमुळे होणारी वर्दळ आणि अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. ‘आपला बालेकिल्ला’ म्हणून मिरविणाऱ्या भाजपला अथवा भाजपला मात देणाऱ्या काँग्रेसलाही हा प्रश्न सोडविता आलेला नाही.
या मुस्लीमबहुल मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा एकदा अमीन पटेल यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरविले आहे. मुस्लीम मतांची संख्या लक्षात घेऊन मनसेनेही इम्तीयाज अमीन यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने हुफेझा इलेक्ट्रिकवाला यांना, भाजपने अतुल शहा यांना आणि शिवसेनेने नगरसेविका युगंधरा साळेकर यांना तिकीट दिले आहे. अतुल शहा कसलेले नेते आहेत. तर युगंधरा साळेकर प्रथमच नगरसेविका होऊन महापालिकेत गेल्या असल्या तरी त्या आपल्या विभागात घराघरांत पोहोचल्या आहेत. भेंडीबाजारमधील पुनर्वसनाच्या योजनेत बसलेली खीळ हा कळीचा मुद्दा असून लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला त्याचा फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत येथील मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय मोठय़ा संख्येने अवलंबिला होता. आताही तशीच परिस्थिती आहे.

जुन्या इमारतींच्या विकास निधीत दुप्पट वाढ
मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी ‘म्हाडा’ निधी १०० कोटींचा होता. पाठपुरावा करून हा निधी २०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात यश मिळविले. तसेच या भागातील सुमारे ४०० इमारतींची दुरुस्ती करून घेतली. कुंभारवाडा, कामाठीपुरा आणि खेतवाडीतील दूषित पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेशी पाठपुरावा करून दुर्गादेवी उद्यानात भूमिगत जलाशय बांधून घेतला. डोंगरीमध्ये आयटीआय कॉलेजसाठी मंजुरी मिळविली असून काम सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी ई-लायब्ररी, संगणक केंद्र, अभ्यासिकांची उभारणी करण्यात आली आहे.
काँग्रेस आमदार अमीन पटेल,

‘एकही नवीन इमारत नाही’
या मतदारसंघातील ५० ते ६० इमारती पुनर्विकासाच्या निमित्ताने जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. परंतु नव्या इमारतीची एक वीटही चढविण्यात आलेली नाही. आता विकासकाने रहिवाशांना भाडेही देणे बंद केले आहे. त्यामुळे रहिवासी त्रस्त आहेत. हा प्रश्न सोडविण्याबाबत आमदाराने असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे ‘विकासकधार्जिणे आमदार’ म्हणून त्यांची ओळख बनली आहे. सरकारी योजना मतदारांपर्यंत पोहोचविण्यात अमीन पटेल अपयशी ठरले आहेत.
 शिवसेना नगरसेविका युगंधरा साळेकर,

मलबार हिल :
जुन्या इमारती, कचरा, खड्डे..!
काँग्रेसची मक्तेदारी असलेल्या मलबार हिल मतदारसंघात फेररचनेनंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला ऑपेरा हाऊस मतदारसंघ विलीन झाला आणि मलबार हिलची समीकरणे बदलून गेली. स्थानिक पातळीवरील शिवसेनेतील अंतर्गत वादाचा फायदा भाजपने घेतला आणि हा मतदारसंघ भाजपच्या पदरात पडला. मागील तीन निवडणुका भाजपचे मंगलप्रसाद लोढा या मतदारसंघातून विजयी होत आले आहेत. मोडकळीस आलेल्या इमारती, कचऱ्याचे साम्राज्य असलेल्या घरगल्ल्या आणि कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा हे या मतदारसंघातील मुख्य प्रश्न. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांची समस्या भेडसावू लागली आहे. अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा, कचरा, खड्डे आदी समस्या महापालिकेशी निगडित असल्या तरी त्यांच्या सोडवणुकीसाठी आमदारांनीही प्रयत्न करणे अपेक्षित होते. तसे न झाल्यामुळे या परिसरात नाराजी आहे. या मतदारसंघाला समुद्रकिनारा लाभला आहे. सीआरझेडमुळे किनाऱ्यापासून १०० मीटर हद्दीतील जुन्या मोडकळीस आलेल्या चाळींचा पुनर्विकास रखडला आहे. काही विकासकांनी मोठय़ा संख्येने इमारती ताब्यात घेतल्या आहेत, पण पुनर्विकासाची वीटही तेथे उभी केलेली नाही. पुनर्विकासाच्या नावाखाली घरे रिकामी करून देणाऱ्या रहिवाशांची परवड होत आहे.
भाजपने विद्यामान आमदार मंगलप्रभात लोढा यांनाच पुन्हा या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. पूर्वी शिवसेनेच्या मदतीने बक्कळ मताधिक्याने लोढा विजयी होत. परंतु या वेळी शिवसेनेचे कडवे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. शिवसेनेने बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांना, तर मनसेने राजन शिरोडकर यांना रिंगणात उतरविले आहे. तर काँग्रेसने महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांना, तर राष्ट्रवादीने नरेंद्र राणे यांना उमेदवारी दिली आहे.
मलबार हिल परिसरातील उच्चभ्रू वस्तीमधील मते मिळविण्यात सुशीबेन शहा यशस्वी झाल्यास लोढा यांच्यावर नामुष्की ओढविण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा गिरगाव, ग्रॅन्ट रोड परिसर याच मतदारसंघात मोडतो.
त्यामुळे भाजपची मतांची रसद तुटण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये गुजराथी मतांचे विभाजन झाल्यास शिवसेनेचे अरविंद दुधवडकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकेल. मात्र वैद्यकीय तपासणी, तीर्थक्षेत्राचा लाभ, स्पर्धाच्या निमित्ताने बक्षिसांची खैरात करीत घराघरांत पोहोचलेले लोढा सहजासहजी पराभव पत्करणार नाहीत, हेही तितकेच खरे.

भरपूर काही केले!
राज्य सरकारने सहकारी साखर संस्थांतील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सहकारी संस्थांना जाचक नियम लागू केले होते. गृहनिर्माण संस्था त्या नियमांतर्गत आल्या होत्या. गृहनिर्माण संस्थांना या क्लिष्ट प्रक्रियेतून मुक्त करण्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा केला. शेतीला चालना देण्यासाठी आणि पशु संवर्धनासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करून पशू कल्याण मंडळाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. मुंबईमधील मंदिरे ताब्यात घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. धोबीघाट मंदिर, महालक्ष्मी मंदिर, सारस्वत कॉलनी, नीरज सोसायटी इत्यादी इमारतींची दुरुस्ती. हँगिंग गार्डन व ब्रीच कॅन्डी येथे सौर व एलईडी दिवे कार्यान्वित केले, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्याची उभारणी, मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आदी कामे केली.
आमदार मंगलप्रभात लोढा

आमदारांनी केले काय?
मलबार हिलमधील आमदार व्यवसायाने विकासक आहेत. त्यांनी गेल्या २० वर्षांत अनेक टोलेजंग इमारती बांधल्या. या इमारतींमधील रहिवाशांसाठी जलतरणतलाव, उद्याने, व्यायामशाळा बांधल्या. पण आपल्या सर्वसामान्य रहिवाशांसाठी किती उद्याने विकसित केली, किती तरणतलाव अथवा व्यायामशाळा बांधल्या, हे त्यांनी सांगावे. प्रत्येक निवडणुकीत विकासाची फक्त घोषणा त्यांनी दिली. पण केवळ स्वत:चा विकास केला. सीआरझेडमुळे मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आहे. रस्ते, पाणी, कचऱ्याच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. मग यांनी केले काय?
   काँग्रेस नेत्या सुशीबेन शाह,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 6:36 am

Web Title: overview of mumbais vidhan sabha constituency
Next Stories
1 निवडणुकीसाठी मुंबईत ‘१४ कलमी’ बंदोबस्त
2 फाटाफुटीनंतर आता बंडाची साथ!
3 महिलांनाही हृदयविकाराचा वाढता धोका!
Just Now!
X