लातूर फेस्टिव्हल अंतर्गत महिलांच्या चालण्याच्या स्पध्रेत सर्व वयोगटातील महिलांनी मोठा सहभाग नोंदवला. श्यामल चंद्रकांत राठोड यांनी ११ हजार रुपयांचे पहिले, तर राजकन्या नानासाहेब मुळे यांनी ७ हजार ५०० रुपयांचे दुसरे बक्षीस मिळविले. ११ विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन या वेळी सन्मानित करण्यात आले.
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना वैशाली देशमुख यांनी गांधी चौकात स्पध्रेची सुरुवात केली. गांधी चौक ते राजीव गांधी चौक असे साडेतीन किलोमीटर अंतर त्यांनी पायी पूर्ण केले. महापौर स्मिता खानापुरे, डॉ. ज्योत्स्ना कुकडे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सरिता मंत्री, डॉ. स्नेहल देशमुख, अॅड. शुभदा रेड्डी, मीरा कुलकर्णी, खाजबानू अन्सारी आदी या वेळी सहभागी झाल्या.
आज सांस्कृतिक मेजवानी
लातूर फेस्टिव्हलचे उद्या (शनिवारी) विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ७ वाजता नाना-नानी पार्कवर रूपक कुलकर्णी यांचे बासरीवादन, सायंकाळी साडेपाच वाजता रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ, रात्री ८ वाजता भरव ते भरवी हा दत्तप्रसाद रानडे व विजय कपूर यांचा कार्यक्रम, दयानंद सभागृहात गायन स्पध्रेची अंतिम फेरी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत होईल. सायंकाळी ६ ते रात्री १० ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रम, बाजार समिती सभागृहात सायंकाळी प्रपोजल हे आदिती सारंगधर यांचे व्यावसायिक नाटक पाहता येईल. पीव्हीआर चित्रपट प्रांगणातील शब्दोत्सवात नितीन आरेकर, डॉ. शेषेराव मोहिते, अविनाश सप्रे, प्रवीण बांदेकर हे श्री. ना. पेंडसे, भालचंद्र नेमाडे, अरुण साधू, भाऊ पाध्ये यांच्या कादंबरीवर ‘त्यांचं जग’ या सत्रात आपले मत मांडतील. दुपारच्या सत्रात ‘मी आणि माझे लेखन’ यात डॉ. रवी बापट यांची प्रकट मुलाखत वर्षां माळवदे घेतील. सायंकाळच्या सत्रात कथांमधील स्त्री-पुरुष संबंध यावरील चर्चासत्रात संजय जोशी, संदीप कदम, मुकुंद कुळे हे मििलद बोकील, मेघना पेठे व निरजा यांच्या साहित्यकृतीवर चर्चा करतील. क्रीडासंकुल येथे सायंकाळी ७ वाजता झी मराठीवरील कलाकारांचा उत्सव २०१४ हा कार्यक्रम पाहायला मिळेल. दयानंद प्रांगणात एरोमॉडेिलगचे प्रात्यक्षिक सकाळी १० वाजता होणार आहे.