छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या उत्तरेकडील टोकाला असलेल्या रेल्वेच्या प्रशासकीय इमारतीला शुक्रवारी आग लागल्यानंतर त्या दिवशी तर प्रवाशांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागली. मात्र ही आग विझून तीन दिवस उलटून गेले, तरीही ही गैरसोय संपलेली नाही. अग्निशमन दल व रेल्वे प्रशासन यांनी ही इमारत काही काळासाठी बंद ठेवल्याने या इमारतीखाली असलेली तिकीट खिडकीही बंद करावी लागली आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना मुख्य इमारतीतील तिकीट खिडक्यांवर जावे लागत आहे.
महात्मा फुले मंडई, मंगलदास मार्केट, जे. जे. कला महाविद्यालय येथून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये येणारे प्रवासी प्रामुख्याने प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या उत्तरेकडील तिकीट खिडकीवरूनच तिकीट खरेदी करतात. या प्रवाशांमध्ये खरेदीसाठी किंवा अन्य कारणांसाठी क्वचित येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने त्यांना तिकीट खरेदी करण्यावाचून पर्याय नसतो. परिणामी, उत्तरेकडील या तिकीट खिडकीवर सातत्याने गर्दी असते. तसेच या खिडकीला लागूनच हार्बर मार्गाचा क्रमांक एकचा प्लॅटफॉर्म असल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांचीही गर्दीही असते.
शुक्रवारी या तिकीट खिडकीवरील इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तब्बल दोन ते अडीच तास झुंजत होते. अखेर संध्याकाळी साडेपाच वाजता लागलेल्या आगीवर साडेसातनंतर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. मात्र त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही इमारत शनिवार व रविवार या दोन दिवशी बंद ठेवण्यात आली होती. या दोनही दिवशी मुंबईत खरेदीला येणाऱ्यांना या इमारतीतील तिकीट खिडकीऐवजी मुख्य इमारतीतील
तिकीट खिडक्यांवर रांग लावावी लागली. त्यामुळे मुख्य इमारतीतील तिकीट खिडक्या रविवारी गजबजलेल्या होत्या. ही तिकीट खिडकी सोमवारी सकाळी उघडेल, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र भिंतींना ओल असल्याने आणि त्यामुळे तिकीट यंत्रणेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने सोमवारी दुपापर्यंत ही खिडकी बंदच होती.