पालिका सभागृहात काँग्रेसने घातलेला अभूतपूर्व गोंधळ आणि सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यात अपयशी ठरणाऱ्या महापौर याचा फटका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांना बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पक्षाच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात तृष्णा विश्वासराव अपयशी ठरत असल्याने त्यांची सभागृह नेतेपदावरून उचलबांगडी करण्याचा विचार ‘मातोश्री’ने सुरू केला आहे. सभागृह नेतेपद यशस्वीरीत्या कोण हाताळू शकेल याची चाचपणी ‘मातोश्री’ने शिवसेनेच्या नगरसेवकांकडेच सुरू केली आहे.
सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना स्वपक्षाच्या नगरसेवकांच्या मदतीने प्रत्युत्तर देण्याची, विरोधकांनी महापौरांवर भडिमार करताच तो परतवून लावण्याची मुख्य जबाबदारी सभागृह नेत्यांवर असते. तसेच विरोधी पक्षाच्या गटनेत्यांबरोबर वेळोवेळी बोलणी करून सभागृहाचे कामकाज सुरळीत चालेल याचीही काळजी सभागृह नेत्याने घ्यावयाची असते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आक्रमक झालेल्या काँग्रेस नगरसेवकांनी पालिका सभागृहात धुमाकूळ घातला आहे. शिवसेनेला ‘चोर’ म्हणण्यापर्यंत काँग्रेसची मजल गेली आहे. परंतु सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव या काँग्रेसला चोख प्रत्युत्तर देण्यात सपशेल अपयशी ठरल्या आहेत.
सभागृह नेत्यांच्या अपयशामुळेच पालिका सभागृहातील गोंधळ आटोक्यात येऊ शकलेला नाही. त्यामुळे तृष्णा विश्वासराव यांच्यावर ‘मातोश्री’ प्रचंड नाराज झाली आहे. पालिका निवडणुकीत ५० टक्के महिलांना आरक्षण मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर तृष्णा विश्वासराव यांना सभागृह नेतेपदी नियुक्त करण्यात आले होते. मात्र स्वपक्षाच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात आणि विरोधकांना प्रत्युत्तर देण्यात त्या अपयशी ठरल्या आहेत. परिणामी सभागृह नेतेपदासाठी सक्षम अशा नगरसेवकाचा शोध सुरू झाला आहे. काही नगरसेवकांनी ‘मातोश्री’ला रमाकांत रहाटे यांचे नाव सुचविले आहे. मात्र सभागृहातील परिस्थिती हाताळण्यात आणि नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात यशस्वी ठरेल अशा अन्य एखाद्या सक्षम आणि अनुभवी नगरसेवकाची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्याच्या विचारात ‘मातोश्री’ आहे. त्यामुळे नजीकच्या काळात तृष्णा विश्वासराव यांना सभागृह नेतेपदावरून दूर व्हावे लागणार अशी चिन्हे आहेत.