उत्तम पाऊस पडूनही पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी कल्याण, डोंबिवली या दोन्ही शहरांमधील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कल्याण पूर्व, डोंबिवली पश्चिमेतील अनेक भागांत पाणीपुरवठा योग्य स्वरूपात होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. काही ठिकाणी नव्या वसाहतींना जादा पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे जुन्या रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे शहरात पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे.  गेल्या तीन वर्षांपासून कल्याण आणि डोंबिवली अशा दोन्ही शहरांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे हे चित्र निर्माण झाल्याचा बचाव प्रशासनामार्फत केला जात होता. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. उत्तम पावसामुळे बारवी धरणात पाण्याचा उत्तम साठा आहे. तरीही शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे. कल्याण पूर्व भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. विद्यमान महापौर कल्याण पूर्वेतील आहेत. महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी यांची पाणीपुरवठा विभागावर पकड नाही, अशी टीका वेगवेगळ्या सभांमधून सातत्याने होत आहे. पाणीपुरवठा विभाग बिल्डरांच्या मोठय़ा वसाहतींना पाण्याची जोडणी देतो. यासाठी योग्य ते नियोजन केले जात नाही, अशी टीका सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.  नागरिकांना पाणी नसताना भगवती बिल्डरला आठ इंची पाण्याचा नळ जोडण्या कशा मंजूर केल्या आहेत, असे प्रश्न नगरसेवक मोहन उगले, नरेंद्र गुप्ते यांनी सभेत उपस्थित केले. कल्याण पूर्व भागातील पाणीटंचाईच्या विषयावर नगरसेवक शरद पावशे, अनंत गायकवाड यांनी सभा तहकुबी मांडली होती. नेतिवली टेकडी ते डोंबिवली दरम्यान नवीन पाणीपुरवठय़ाच्या जलवाहिन्या जागोजागी फुटल्या आहेत. ही कामे अतिशय निकृष्ट झाली आहेत. खंबाळपाडा येथील अनधिकृत मार्बलनगरी तोडायला लागू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाला २५ लाख भरून जलवाहिनी अन्य भागातून फिरवून घेतली. रामचंद्र जलकुंभ येथे चाचणी करताना अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. त्यांची भरपाई कोण देणार असे यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान पाणीटंचाईच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी यावेळी दिले.