विनातिकीट प्रवासी आणि सार्वजनिक वाहतूक यांचे नाते अतूट आहे. मुंबईत तर उपनगरीय रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणारे हजारो प्रवासी एका आठवडय़ातच पकडले जातात. मात्र ‘बेस्ट’ उपक्रमाला ठकवणाऱ्या विनातिकीट प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. वाहकांची सतर्कता आणि तिकीट निरीक्षकांनी राबवलेली मोहीम ही या घटत्या संख्येची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी आपल्या ‘गहाळ वस्तू विभागा’मार्फत मुंबईकरांना प्रामाणिकतेचा पुरावा देणाऱ्या ‘बेस्ट’ने या प्रामाणिकपणाचा आणखी एक नमुना समोर ठेवला आहे.
आपल्या तोटय़ातील वाटचालीच्या पाश्र्वभूमीवर ‘बेस्ट’ने विनातिकीट प्रवाशांविरोधात नेहमीच धडक मोहीम चालवली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी लक्षात घेतली असता बेस्टला लुटणाऱ्या फुकटय़ा प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. दोन वर्षांपूर्वी, २०११मध्ये एप्रिल ते जून या कालावधीत ५१ हजार विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले होते. मात्र आता पुढील तीन महिन्यांत म्हणजेच जुलै ते सप्टेंबर दरम्यान ही संख्या २५ हजारांवर आली आहे. या प्रवाशांकडून दोन वर्षांत वसूल केलेल्या दंडाची रक्कम एक कोटी ९० लाख एवढी मोठी आहे.
विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी अनेकदा सराईतपणे हात दाखवून ‘पास’, असे म्हणत निसटण्याचा प्रयत्न करतात. तर गर्दी असलेल्या बसमध्ये चढलेले अनेक प्रवासी दरवाज्याजवळ उभे राहून तिकीट काढल्याशिवायच आपल्या थांब्यावर उतरण्याचा प्रयत्न करतात. काही लोक गर्दीच्या वेळी वाहकाकडून मुद्दामूनच तिकीट घेत नाहीत आणि आपल्या थांब्यावर उतरून जातात. या सर्वच प्रवाशांना पकडून दंड वसूल करण्याचा प्रयत्न तिकीट तपासनीसांच्या माध्यमातून ‘बेस्ट’ करत असते. मात्र प्रत्येक वेळीच ते शक्य होत नाही.

गेल्या दोन वर्षांतील विनातिकीट प्रवासी आणि दंड वसुली
कालावधी    विनातिकीट प्रवासी    दंडाची रक्कम
एप्रिल-जून ११          ५१,९४७    २५,६४,९८३
जुलै-सप्टें ११         ३४,०८४    १६,८९,७८५
ऑक्टो-डिसें ११         ४७,२९०    २३,५०,९५०
जाने-मार्च १२         ४१,४७२    २०,३२,४४८
एप्रिल-जून १२         ३२,४६५    १८,१६,५२३
जुलै-सप्टें १२         २९,२३५    १७,५७,९२८
ऑक्टो-डिसें १२         २८,३३५    १७,१३,१४९
जाने-मार्च १३         २७,४४१    १६,७२,९६१
एप्रिल-जून १३         २२,७३४    १५,६९,९६१
जुलै-सप्टें १३         २५,०५७    १७,५१,५६५
एकूण                         ३,४०,०६०    १,८९,३९,४५३