ई-मीटरसाठी २५ टक्के रक्कम देणार

रिक्षाचालकांना ई-मीटर बसविण्यासाठी २५ टक्के रक्कम देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष कटिबद्ध आहेत, असा निर्वाळा शुक्रवारी कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी रिक्षाचालकांशी बोलताना दिला.

रिक्षाचालकांना ई-मीटर बसविण्यासाठी २५ टक्के रक्कम देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष कटिबद्ध आहेत, असा निर्वाळा शुक्रवारी कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी रिक्षाचालकांशी बोलताना दिला. रिक्षाचालकांचे हजारभर अर्ज आले तरी आमचा हिस्सा अदा केला जाईल. त्यामध्ये बदल होणार नाही. ज्या कंपनीचे मीटर आहे त्या नावाने २५ टक्के रकमेचा धनादेश दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.    कोल्हापूर शहरातील रिक्षांना ई-मीटरची सक्ती करण्यात आली होती. या विरोधात मार्च महिन्यामध्ये तीनआसनी रिक्षाचालकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. दहा दिवस रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
ई-मीटरसाठी सर्वपक्षीयांनी अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तीनआसनी वाहतूक कल्याण समितीकडे १७ लाख ७० हजार रुपये जमा झाले होते. त्यातून ५०० रिक्षांना मीटर देण्यात आले होते. समितीच्या नावे बँकेमध्ये ६ लाख ७७ हजार रुपये जमा आहेत. आणखी तीन ते चार लाख रुपये या आठवडय़ात जमा होणार आहेत.    
आंदोलनाची सांगता होताना काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी रिक्षांना ई-मीटर बसविण्यासाठी अर्थसाहाय्य देण्याचे मान्य केले होते. तथापि ही रक्कम कल्याण समितीकडे जमा झाली आहे, अशी समजूत रिक्षाचालकांची झाली होती. त्यावरून ते समितीचे निमंत्रक बाबा इंदुलकर व सहकाऱ्यांकडे सतत विचारणा करत होते. त्यामुळे वस्तुस्थिती नेमकी स्पष्ट व्हावी यासाठी शुक्रवारी रिक्षाचालक मुश्रीफ व पाटील या दोन मंत्र्यांना भेटले. या चर्चेवेळी दोन्ही मंत्र्यांनी रिक्षाचालकांना मदत करण्याचे मान्य केले. त्यासाठी पक्ष कार्यालयामध्ये अर्जाद्वारे मागणी करावी, असेही त्यांनी सूचित केले. या चर्चेत बाबा इंदुलकर, राजू जाधव, मोहन बागडे, रमेश पोवार, विष्णू पोवार, सुनील खेडेकर, जाफर मुजावर, वसंत पाटील आदींसह रिक्षाचालक सहभागी झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 25 will pay for e meter of rickshaw

ताज्या बातम्या