सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत नांदेडचे कार्य उत्तम आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या योजनांची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
काँग्रेसच्या वचनपूर्ती जनजागरण यात्रेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. युवक काँग्रेसचे नेते आमदार राजीव सातव, प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, पालकमंत्री डी. पी. सावंत, खासदार भास्करराव खतगावकर उपस्थित होते. नवा मोंढा मदान परिसरात आयोजित सभेत मुख्यमंत्री चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातल्या प्रलंबित प्रश्नी येत्या आठवडय़ात बठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशा शब्दांत नांदेडकरांना आश्वस्त केले. जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेमुळे नांदेडचा चेहरा बदलला. अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात वेगवेगळे प्रकल्प उत्तमरीत्या राबविण्यात आले. नांदेडच्या विकासात खंड पडणार नाही. लेंडी प्रकल्प, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत, मुन्नेरवारलू समाजाचे प्रश्न, कृषिपंपाची वीज आदींबाबत येत्या आठवडय़ात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
केंद्रात व राज्यात काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागरण यात्रा काढण्यात आली आहे. लोकोपयोगी योजना राज्यात राबवल्या जात आहेत. आगामी काळ निवडणुकांचा आहे. काँग्रेसने केलेल्या वचनपूर्तीची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पालकमंत्री सावंत यांचीही भाषणे झाली. अशोक चव्हाण यांनी निवडणुका समोर ठेवून विरोधक समाजात द्वेष निर्माण करीत असल्याचा आरोप केला. शंकरराव चव्हाण यांच्यापासून जिल्ह्यातल्या जनतेने काँग्रेसला साथ दिली. काँग्रेसच्या विचारांची बांधिलकी येथे कायम आहे. जिल्ह्यातच नव्हे, तर मराठवाडय़ात काँग्रेसपुढे वेळोवेळी आव्हाने निर्माण झाली. परंतु त्यांचा समर्थ सामना करण्याची ताकद कार्यकर्त्यांनी दिली. भविष्यातही कार्यकर्त्यांनी सतर्क राहून जनतेची कामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले. आमदार अमर राजूरकर यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीवर या वेळी जोरदार हल्ला चढवला. मराठवाडय़ातील रस्त्यांच्या दुरवस्थेला बांधकाम मंत्रीच जबाबदार आहेत, असे अप्रत्यक्ष सांगताना त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करण्याची विनंती केली. नांदेड-लातूर, औरंगाबाद-नांदेड रस्त्यांच्या कामांसाठी निधी देण्याची मागणी केली.
दहा कोटी ७५ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या अत्याधुनिक नियोजन भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. कमी खर्चात व अत्याधुनिक सोयी-सुविधांनी उभारलेली इमारत बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अशाच प्रकारचे नियोजन भवन राज्यात ठिकठिकाणी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही इमारतीचे कौतुक करून नांदेडच्या वेगवेगळ्या प्रकल्पांनी राज्यांना प्रेरणा दिल्याचे सांगितले.
आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माधवराव पवार, सुरेश देशमुख, वसंत चव्हाण व रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महापौर अब्दुल सत्तार, अमिता चव्हाण यांची उपस्थिती होती.
वक्तव्य आणि सूचक विधानही!
नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने घवघवीत यश मिळविले आहे. आता अशोक चव्हाण यांच्यावरच पक्षाच्या यशाची जबाबदारी असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. दरम्यान, आघाडी धर्माचे पालन झाले नाही तर लोह्यात घडले ते राज्यातही घडू शकते, असे सूचक विधान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने केले.