अगदी सुशिक्षितांमध्येही अंधश्रद्धा, गैरसमज आणि अनास्था असल्याने नेत्रदान, देहदान आणि किडनीदान मोहिमांना फार यश आलेले नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी रविवारी अंबरनाथ येथे केले. येथील द एज्युकेशन संस्थेच्या वतीने त्यांना भाऊसाहेब परांजपे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा दधीची पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये रोख, शाळ, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. लहाने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते आपला सन्मान झाला हे आपले भाग्य आहे. डॉ. अनिल काकोडकर हे पद्मविभूषण असून त्यांचे कार्य पाहिल्यास ते भारतरत्न आहेत अशा शब्दांत लहाने यांनी त्यांचा गौरव केला. देशात सुमारे २२ लाख डोळ्यांची गरज असताना जेमतेम तीस हजार नेत्रदान होते. विशेष म्हणजे श्रीलंकासारख्या देशामध्ये मोठय़ा प्रमाणात नेत्रदान होत असताना रामाचा देश म्हणून गौरव केला जात असलेल्या आपल्या देशात नेत्रदान कमी का, असा प्रश्न लहाने यांनी उपस्थित केला. नेत्रदानाच्या चळवळीस व्यापक रूप देण्याची गरज असून महात्मा गांधी विद्यालयासारख्या संस्थांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेण्याची गरज आहे, असे लहाने म्हणाले.
शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. मात्र त्यात सुधारणा करण्यामध्ये सरकारी यंत्रणा कमी पडत असल्याने चांगल्या शिक्षण संस्थांनी पुढकार घ्यायला हवा, असे मत डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. डॉ. लहानेंसारख्या महान व्यक्ती समाजासमोर आणून त्यांचा सन्मान केल्याने पुढच्या पिढीला त्यांच्या कार्याचा परिचय होण्याबरोबरच प्रेरणाही मिळू शकते. खेडय़ापाडय़ांत अद्ययावत तंत्र व यंत्रे पोहोचली पाहिजेत.
उपचारांसाठी ग्रामीण भागातील जनतेला शहरावर अवलंबून राहता कामा नये यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे काकोडकर म्हणाले. यावेळी आमदार रामनाथ मोते, डॉ. वैदेही दप्तरदार, डॉ. हरीश लापसिया आदी मान्यवर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2014 रोजी प्रकाशित
अंधश्रद्धा आणि गैरसमजामुळे अवयवदान चळवळ पिछाडीवर
अगदी सुशिक्षितांमध्येही अंधश्रद्धा, गैरसमज आणि अनास्था असल्याने नेत्रदान, देहदान आणि किडनीदान मोहिमांना फार यश आलेले नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी रविवारी अंबरनाथ येथे केले. येथील द एज्युकेशन संस्थेच्या वतीने त्यांना भाऊसाहेब परांजपे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा दधीची पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
First published on: 22-10-2014 at 07:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti superstition movement