उड्डाण रद्द केल्याचे न कळविल्याबद्दल ‘किंगफिशर एअरलाइन्स’ कंपनीला एका कुटुंबाला नव्याने काढाव्या लागलेल्या तिकिटाच्या खर्चासह नुकसानभरपाई म्हणून एकूण ३७ हजार रुपये देण्याचे आदेश मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक वाद निवारण मंचाने दिले आहेत.
 कांजुरमार्ग येथील रहिवासी रायसुरी खान यांनी याप्रकरणी १२ जून २०१२ रोजी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, ९ नोव्हेंबर २०११ रोजी खान यांनी दिल्ली-श्रीनगर हवाई प्रवासाची पाच तिकिटे ‘किंगफिशर एअरलाइन्स’कडून आरक्षित केली होती. २१ एप्रिल २०१२ चीही तिकिटे होती. त्याचे २२,६७० रुपयेही त्यांनी कंपनीकडे जमा केले होते. या मार्गावरील कंपनीची सगळी उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती मार्च २०१२ मध्ये खान यांना कुठूनतरी मिळाली. त्यामुळे शहानिशेसाठी त्यांनी २१ मार्च २०१२ रोजी कंपनीला संपर्क साधून चौकशी केला असता त्यांनी बुक केलेली तिकिटेही रद्द झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. श्रीनगर येथे जाण्याची योजना खूप महिने आधीच आखल्याने आणि त्यानुसार विमानाची तिकिटे, राहण्याची सोय आदींचीही व्यवस्था करण्यात आल्याने शेवटच्या क्षणी योजना रद्द करणे खान यांच्या कुटुंबियांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी तातडीने नव्याने तिकिटे काढली. त्यासाठी त्यांना ५२,३७५ रुपये खर्च आला. म्हणजेच त्यांना नव्याने तिकीट काढण्यासाठी २९,७०५ रुपये अतिरिक्त खर्च सहन करावा लागला. कंपनीविरोधात खान यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत ग्राहक मंचाने कंपनीला अनेकदा नोटीस बजावली. परंतु त्यावर काहीच उत्तर न दिल्याने व मंचासमोरील सुनावणीसाठी कुणी हजरही न झाल्याने परिणामी  कागदपत्रांच्या आधारे मंचाने त्यांच्या बाजूने एकतर्फी निर्णय देत  झालेल्या तिकीट खर्चासह नुकसान भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले.