एकाला भावाने फसविल्याने बिकट आर्थिक परिस्थितीत अडकलेला, दुसरा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने खचलेला आणि तिसरा कमी पगारात घरखर्च चालवणे कठीण झाल्याने त्रासलेला. यात दारूच्या व्यसनाने पछाडलेले. आर्थिक परिस्थितीत सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याऐवजी खंडणीचा कट रचणारे तीन तरुण. हे वाचल्यावर एखाद्या सिनेमातील पटकथा असावी असे वाटते. मात्र ही पटकथा नसून वास्तव घटना आहे. वाहिन्यांवर दाखविण्यात येणाऱ्या गुन्हेविषयक मालिका पाहून झटपट पैसे मिळविण्यासाठी थेट आमदारालाच खंडणीसाठी धमकावणाऱ्या तीन जणांना पनवेल पोलिसांनी मोठय़ा शिताफीने अटक केली आहे.
समिच बाळकृष्ण नाटेकर (३६, रा.नवीन पनवेल), नीलेश रमेश सोनीस (२६,रा. नवीन पनवेल) आणि स्वप्नील सुरेश अवेरी (३३, रा.शिवडी) अशी या आरोपींची नावे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना या त्रिकुटाने १० एप्रिल रोजी प्रथम अमजद अली या नावाने पोस्टाने पत्र पाठवून तुमच्या शाळा व बंगला येथे आम्ही टाईम बॉम्ब लावलेले आहेत. आम्हाला ७० लाख रुपये शिवडी येथे आणून द्यावेत. अन्यथा आम्ही टाईम बॉम्ब रिमोटने उडवून तुमचे शिक्षक, विद्यार्थी आणि कुटुबींयाना ठार मारू अशी धमकी दिली होती. यानंतर दहा दिवसानंतर आमदारांना फोन करीत एसीपी कार्यालयातून त्यांचा साहाय्यक बोलत आहे. तुम्हाला धमकी देणाऱ्या एका गुडांचे एनकाउंटर झाले आहे. त्याच्या खिशात तुमच्या नावाची चिठ्ठी मिळाली असून तुम्ही मांडवली करण्यासाठी कार्यालयात या असे सांगण्यात आले होते.
या प्रकरणी ठाकूर यांनी पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस आयुक्त के.एल.प्रसाद, परिमंडळ २ चे पोलीस आयुक्त संजय येनपुरे, साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी या गुन्ह्य़ाच्या तपासाची जबाबदारी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती यमगर आणि त्यांच्या पथकावर सोपवली.
या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी प्रथम मुंब्रा येथे छापा टाकला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तपासाच्या दिशेने पुढील कोणाताही धागा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र सराईत गुन्हेगारदेखील मागे काही ना काही पुरवा सोडतो. याच पुराव्याच्या आधारे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचतात. या युक्तीप्रमाणे पनवेलमधील अनेक गुन्हे उघडकीस आणणारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती यमगर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना या आरोपीपर्यंत पोहचण्याचा एक धागा हाती लागला. याच धागाच्या साह्य़ाने प्रथम त्यांनी नवीन पनवेलमध्ये राहणारा नीलेश सोनीस याला ताब्यात घेतले.
नीलेश याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने या गुन्ह्य़ाची कबुली दिली. यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सचिन आणि स्वप्नील याला अटक करण्यात आली. अवघ्या २४ तासांत तिन्ही आरोपींना जेरबंद करण्यास या पथकाला यश आले.   सचिन नाटेकर हा डीजे मास्टर तर नीलेश हा यूपीएससी परीक्षेसाठी तयारी करीत होता. स्वप्नील अवेरी हा एका प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला होता.
तिघेही जिवलग मित्र. सचिन याच्या भावाने शिवडी येथील के.के.मोदी चाळीतील वडिलोपार्जित घराची ४० लाखाला विक्री करून त्याला पनवेलमध्ये नवीन घर घेण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे त्याने पनवेलमधील उसर्ली गावात एक घर बुक केले होते. यासाठी सुरवातीला त्याला भावाने ४ लाख रुपये दिले होते.
यानंतर पुढील हप्ता भरण्यासाठी त्याने भावाकडे पैसे मागितले असता, तो टाळाटाळ करू लागल्याने सचिन अडचणीत सापडला होता. नीलेश याला परीक्षेची तयारी करण्यासाठी पैशांची गरज होती. अल्पशा पगारामुळे स्वप्नीलदेखील वैतागला होता. या सर्व अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी हा खंडणीचा कट रचला. निवडणुका सुरू असल्याने खंडणी मागण्यासाठी या तिघांनी ठाकूर यांचे नाव निश्चित केल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती यमगर यांनी सांगितले.
नीलेश याच्यावर आमदारांना पत्र पाठविण्याची आणि फोन करण्याची जबाबदारी दिली होती. धमकी देण्यासाठी सचिन याच्या मोबाइलचा वापर करण्यात आला होता. शिवडीत खंडणीची रक्कम स्वीकारण्याचे काम स्वप्नील याच्यावर सोपविण्यात आले होते. आरोपींनी खंडणीचा कट हा एका गुन्हेविषयक मालिकेच्या आधारे बनवला असल्याचे यमगर यांनी सांगितले. मात्र मालिकेच्या आधारे खंडणीचा कट रचणारे हे तिघे आरोपी हे विसरले की, याच मालिकेत शेवटच्या भागात पोलीस आरोपींना जेरबंद करतात. या तिघांविरोधात खंडणी, जिवे मारण्याची धमकी देणे आदीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!