आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खूश करण्यासाठी सर्वच पक्षांच्या आमदार, नगरसेवकांनी नागरी कामांच्या उद्घाटनाचा बार उडवून देण्यास सुरुवात केली असून नवी मुंबईत दोन पालिका रुग्णालयांतील बाह्य़ रुग्ण कक्षाची सुरुवात केल्यानंतर या आठवडय़ात ठाणे-बेलापूर मार्गाला समांतर असणारा पाच किलोमीटरच्या अंर्तगत रस्त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. गुरुवारी झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीच्या वेळी या मार्गावर टाकण्यात आलेले दगड दूर करून वाहनचालकांनी या मार्गाचे एक प्रकारे उद्घाटन करून टाकले आहे. याशिवाय शेकडो नागरी कामांच्या उद्घाटनाचा धूमधडका उडविला जाणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता या महिन्याअखेपर्यंत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील अनेक आमदारांच्या निधीतील रखडलेल्या कामांचा मुहूर्त किंवा उद्घाटन करण्याचा कार्यक्रम सध्या युद्धपातळीवर सुरू असून त्याला नवी मुंबई अपवाद नाही. नवी मुंबई पालिका राष्ट्रवादीच्या हातात असून येथील एक आमदार व मंत्री गणेश नाईक यांची सर्व मदार ही या कामांवर आहे. त्यामुळे पालिकेची नागरी कामे ही नाईकांच्या खात्यावर जमा केली जात असल्याने हा महिना उद्घाटनांचा महिना म्हणून ओळखला जाणार आहे. सोमवारी नेरुळमधील नवीन रुग्णालयातील ओपीडीचे उद्घाटन झाल्यानंतर येत्या दोन दिवसांत बेलापूर व ऐरोली येथील ओपीडी सुरू केल्या जाणार आहेत. त्यानंतर ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीला उपाययोजना म्हणून तयार करण्यात आलेला पाच किलोमीटर लांबीचा व रु. २९ कोटी खर्चाचा सव्‍‌र्हिस रस्ता १५ ऑगस्ट रोजी सुरू  करण्यात येणार आहे.
त्यानंतर बेलापूर येथील दिल्ली पब्लिक स्कूलसमोरील रस्त्याचे लोकार्पण केले जाणार असून बेलापूरमधील नगरसेविका स्वाती गुरखे यांच्या प्रभागातील मॅन्गो उद्यानाचे नूतनीकरण हाती घेतले जाणार आहे. गतवर्षी पालिकेच्या गणेशोत्सव स्पर्धेतील पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सोमवारी दुपारी वाशीतील भावे नाटय़गृहात आटोपून घेण्यात आला. नगरसेवकांच्या प्रभागातील कामे ही तेथील आमदारांना प्रचारात कामी येणार असल्याने या नगरसेवकांचा आग्रहदेखील जास्त आहे. यात त्यांचं चांगभले होत असल्याने सध्या आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांना नागरी कामाच्या फाइल्सना मंजुरी देण्याशिवाय दुसरे काम राहिलेले नाही. त्यामुळे येत्या वीस दिवसांत नवी मुंबईत उद्घाटनांचे शतक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.