दिवाळी म्हणजे खरेदी.. कपडय़ांची, फराळाच्या सामानाची, फटाक्यांची, विजेच्या तोरणांची, फुलांची.. दिवाळीचा हाच मूड सध्या बाजारात दिसत आहे. फराळ आणि कपडय़ांच्या खरेदीसोबतच घरसजावटीसाठीही सल हाताने खर्च केला जात आहे. त्यामुळे मुंबईच्या दक्षिण टोकाच्या क्रॉफर्ड मार्केटपासून पार उत्तरेच्या मालाड, बोरीवलीपर्यंत सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठाही सजल्या आहेत.
दिवाळीत नवीन कपडे, फराळ, फटाके यासोबतच महत्त्वाची ठरते ती सजावट. नातेवाईक, मित्रमत्रिणी याच काळात घरी येत असल्याने घराच्या सजावटीसाठी नवनवीन कल्पना लढवल्या जातात. या सर्व कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विक्रीचा नफा मिळवण्यासाठी मुंबईतील सर्वच बाजारपेठांमध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. विजेची तोरणे ही प्रकाशाच्या या सणात खासच महत्त्वाची. गेल्या काही वर्षांत चिनी माळांनी बाजार काबीज केला आहे. त्यात दोन वर्षांपासून टय़ूबलाइट माळा हीट ठरल्या आहेत. सध्या आठ टय़ूबलाइटच्या माळांसाठी ४०० ते ५०० रुपयेचा भाव क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुरू आहेत. ऑप्टिकल फायबरच्या नाजुक माळांनाही मागणी आहे, मात्र त्यांचा काहीच भरवसा नाही, असे विक्रेतेच खाजगीत सांगतात. पारंपरिक पद्धतीच्या मोठय़ा दिव्यांच्या माळांची आठवण करून देणाऱ्या मात्र आकाराने लहान पांढऱ्या बल्बच्या माळाही यंदा लोकप्रिय झाल्या आहेत. या सर्व माळांची किंमत त्यांच्या लांबीनुसार १०० ते २५० रुपयांच्या घरात आहे. याशिवाय पणत्यांच्या आकारातील बल्बची सजावटही भाव खाऊन आहे.
विजेच्या माळांसोबत फुलांची सजावटही गेल्या काही वर्षांत आवर्जून केली जाते. खरे तर गणपतीच्या मखरात ठेवण्यासाठी कृत्रिम फुलांना मागणी असे. मात्र आता इंटिरिअर डेकोरेशनबाबत दक्ष झालेल्या मुंबईकरांमध्ये वर्षभर या फुलांची मागणी असते. दिवाळीत ही मागणी कैक पटींनी वाढते इतकेच. खऱ्या फुलांप्रमाणेच भासणाऱ्या फुलांच्या माळा, तोरणे यांनी दारे, िभती सजवण्यास प्राधान्य दिले जाते. त्याचपद्धतीने प्रत्येकाला परवडणाऱ्या किंमतीत दादर, मालाड येथील बाजारपेठेत फुलांच्या माळा उपलब्ध आहेत. अगदी १०० रुपयांपासून साध्या फुलांपासून अडीच हजार रुपये किंमतीच्या कुंडी व फुलांसकटची कृत्रिम झाडेही दिवाळीच्या निमित्ताने घरसजावटीसाठी घेतली जात आहेत. रांगोळी हेदेखील दिवाळीचे आणखी एक वैशिष्टय़. सोप्या, सुटसुटीत प्लास्टिकवरील रांगोळ्यांना मागणी असली तरी पारंपरिक रांगोळी आवर्जून काढण्याकडेही अनेकांचा कल असतो. या रांगोळ्या पटकन काढण्यासाठी चाळणी, गोल कडी, रांगोळी भरायच्या पेन्सिल अशी अनेक उपकरणे बाजारातून मोठय़ा प्रमाणात विकली जात आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2014 रोजी प्रकाशित
बाजारपेठाही सजावटीच्या सामानाने सजल्या
दिवाळी म्हणजे खरेदी.. कपडय़ांची, फराळाच्या सामानाची, फटाक्यांची, विजेच्या तोरणांची, फुलांची.. दिवाळीचा हाच मूड सध्या बाजारात दिसत आहे. फराळ आणि कपडय़ांच्या खरेदीसोबतच घरसजावटीसाठीही सल हाताने खर्च केला जात आहे.
First published on: 22-10-2014 at 07:11 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market ready for diwali celebration