संपादकीय मंडळाचा अभाव असलेल्या स्थानिक पातळीवरील प्रकाशकांकडून अभ्यासक्रमाची पुस्तके छापून घेण्याचे प्रमाण वाढले असल्यानेच चुकायुक्त पुस्तके प्रकाशित होऊन विद्यार्थी व प्राध्यापकांच्या हातात ती पुस्तके पडतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.कॉम. प्रथम वर्षांच्या इंग्रजी आणि मराठीच्या पुस्तकांमधील शेकडो चुका लक्षात घेऊन पुस्तकांच्या सुधारित आवृत्त्या लवकरच बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले यांनी कळवले आहे.

एखादा स्थानिक पातळीवरील प्रकाशकही चांगल्या पुस्तकांची छपाई करू शकतो. मात्र, बी.कॉम. मराठी व इंग्रजीच्या पुस्तकांमधील शेकडो चुकांनी हा समज खोटा ठरवला आहे. महाल भागातील राघव प्रकाशन आणि वितरक यांनी ही दोन्ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. राष्ट्रीय पुस्तक प्रकाशकांमध्ये हिमालय, दत्तसन, ओरिएन्ट लाँगमन, एस.चाँद इत्यादींना राष्ट्रीय प्रकाशकांचा दर्जा आहे. यापैकी काही प्रकाशक स्थानिक आहेत, हे विशेष. त्यांच्याकडून अभ्यासक्रमाची पाठय़पुस्तके किंवा संदर्भ ग्रंथ प्रकाशित करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण, लेखकांची पातळी त्यांच्या लिखाणावरून दिसून येते. त्यामुळेच सहजासहजी कोणाचेही पुस्तके हे नामवंत प्रकाशक स्वीकारित नाहीत. अशा प्रकाशकांकडे पुस्तकावर संस्कार करणारे संपादकीय मंडळ असल्याने पुस्तकांमध्ये चुका राहण्याची शक्यता धुसर होते. मात्र, बहुतेक स्थानिक प्रकाशकांकडे संपादकीय मंडळाचा अभाव असल्याने चुकांची बजबजपुरी पुस्तकात दिसून येते.
आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एकूण बी.कॉम. प्रथम वर्षांला १२ हजार नियमित विद्यार्थी आहेत. कला व वाणिज्यची महाविद्यालये ३०० वर आहेत. या सर्वाचा विचार केल्यास संबंधित प्रकाशकाने १० हजार पुस्तकांची आवृत्ती प्रत्येक वर्षी काढली तरी ती हातोहात खपण्याची शक्यता जास्त असते. त्या तुलनेत नामवंत प्रकाशने पुस्तकांची कमी आवृत्ती काढतात. यासंदर्भात बोलताना वेस्टर्न बुक डेपोचे मालक विनोद नांगिया यांनी दुय्यम दर्जाची पाठय़पुस्तके बाजारात येत असल्याचे मान्य करून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांकडे लक्ष वेधले. युजीसीच्या निर्देशांनुसार पाठय़पुस्तकात २५ टक्के स्थानिक आणि ७५ टक्के राष्ट्रीय मजकूर असायला हवा. हे करीत असताना स्थानिक प्रकाशकांकडे बरेचदा संपादक, मुद्रित शोधकांचा अभाव असतो आणि ते पूर्णपणे लेखकावर अवलंबून राहतात. त्यामुळेच पुस्तकात चुका राहून जातात. दत्तसन प्रकाशनाने यापूर्वीही नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठाची पाठय़पुस्तके प्रकाशित केली आहेत. अमरावती विद्यापीठासाठी बी.एस्सी.चे परिपूर्ण पुस्तक केवळ ३३ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिल्याने त्याचे ‘गाईड’ सुद्धा बाजारात येऊ शकले नव्हते, याकडे नांगिया यांनी अंगुलीनिर्देश केला.
इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. अनिल ढगे म्हणाले, विद्यापीठातील पुस्तकांच्या गुणवत्तेचा स्तर कमी झाला असून त्यातही हितसंबंध जोपासले जातात, असे ठणकावून सांगितले.

बी.कॉम. इंग्रजी आणि मराठीच्या पुस्तकातील चुकांच्या बातम्यांनी व्यथित झालेले वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले यांनी या दोन्ही पुस्तकांची सुधारित आवृत्तीची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यासंबंधी पार पडलेल्या बैठकीत तसा ठराव झाला असून कुलगुरूंनी त्यास मान्यता दिली आहे. तसेच इंग्रजीच्या पुस्तकाच्या विद्यमान संपादकांना सुधारित आवृत्तीमध्ये काम करण्यास मज्जाव करण्यात आल्याचेही ते म्हणाले.