ठाणे, मुंबईसारख्या महानगरात ऐन पावसाळय़ात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी व वित्त हानी होण्याच्या खळबळजनक घटना घडत असल्याच्या पाश्र्वभूमीवर कराड नगरपालिकेने केलेल्या पाहणीमध्ये शहरात ४७ इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात आकाराने सर्वात मोठय़ा असलेल्या शनिवार पेठेत सर्वाधिक १४ धोकादायक इमारती असून, सर्वात कमी धोकादायक इमारतींची संख्या मंगळवार पेठेत आहे. तर रविवार पेठेत एक इमारत धोकादायक नोंद झाली आहे.
पावसाळय़ाच्या पाश्र्वभूमीवर संभाव्य अतिवृष्टी व पुरस्थिती गांभीर्याने घेऊन आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून कराड पालिका हद्दीतील धोकादायक इमारतीबाबत पालिका प्रशासनाने पाहणी अहवाल तयार केला आहे. या सव्र्हेतून ४७ इमारती धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मिळकतदारांना नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यात इमारतीचा धोकादायक भाग तत्काळ उतरवून घ्यावा, धोकादायक भाग दुरूस्त करून घेण्यायोग्य असेल तर तो दुरूस्त करून घ्यावा आपल्या धोकादायक मिळकतीच्या अनुषंगाने अपघात घडल्यास त्यास सदर मिळकतदार सर्वस्वी जबाबदार राहील अशा सक्त ताकीद देणाऱ्या या नोटीसा आहेत. त्या सर्व ४७ मिळकतदारांना बजावण्यात आल्याची माहिती नगरअभियंता एम. एच. पाटील यांनी दिली आहे. कराडमध्ये सर्वात मोठी पेठ अशी ओळख असणाऱ्या शनिवार पेठेत सर्वाधिक १४ इमारती धोकादायक आहेत.  शुक्रवार पेठेत १३, सोमवार पेठेत ६, मंगळवार पेठेत ३ , बुधवार पेठेत ५, गुरूवार पेठेत ६ इमारती धोकादायक आहेत. या इमारतींमध्ये कोणीही वास्तव्य करू नये अशी सूचना नगरपालिका प्रशासनाने संबंधितांना केली आहे.