नाशिकच्या महिला संघाने वर्धा येथे आयोजित ४४ व्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण खा. दत्ता मेघे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भारतीय व्हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष विजय डांगरे, रतन लिगाडे, बाळासाहेब सूर्यवंशी आदी उपस्थित होते. नाशिकने सोलापूरचा २५-१०, २५-७ असा सहज पराभव करत उपउपांत्य फेरी गाठली. या सामन्यात २५-२१, २५-१४ असा अमरावतीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत अकोल्यावर ३-२ अशी मात केली. अंतिम सामन्यात सोनाली बांद्रे, रितीका नायडू या अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या नागपूरकडून पराभव पत्करावा लागला. नागपूरने पहिला सेट २५-१५ असा जिंकल्यानंतर नाशिकने २५-१५ असा दुसरा सेट जिंकला. तिसरा आणि चौथा सेट २५-२३ असे जिंकत नागपूरने विजेतेपद मिळविले.
नाशिककडून स्नेहा पवार-रोकडे, राजेश्री शिंदे, शिवांगी बिडवे, तृप्ती उतेकर, स्नेहा घुगे, प्रणिता बस्ते, दीपिका पाटील, वैशाली शहरकर, मेघा बोरकर, पूजा गडगडेकर, प्रियंका पगार यांनी चांगला खेळ केला. संघाला प्रशिक्षक आनंद खरे यांचे मार्गदर्शन लाभले.