शारीरिकदृष्टय़ा अपंग, कर्करोगी आणि गर्भवती महिला यांच्यासाठी रेल्वेच्या लोकल गाडय़ांमध्ये राखीव असलेल्या डब्यांत इतर धडधाकट प्रवाशांचाच भरणा होत असल्याने गरजू प्रवाशांना त्रास होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी आता रेल्वे पोलिसांनी कंबर कसली असून अशा प्रवाशांविरोधातील कारवाई तीव्र करण्याचे आदेश रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी दिले आहेत. मात्र या डब्यांतून प्रवास करणाऱ्या धडधाकट प्रवाशांमध्ये पोलिसांची संख्याही लक्षणीय असल्याने प्रश्न चिघळत आहे.मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील प्रत्येक लोकल गाडीत अपंगांसाठी डब्याचा एक कक्ष राखीव ठेवलेला असतो. रेल्वेच्या नियमांनुसार या डब्यातून इतर प्रवाशांनी प्रवास करण्यास बंदी आहे. असे करताना कोणी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाते. मात्र हा नियम धाब्यावर बसवून अशा डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच मोठी असल्याची तक्रार अपंग प्रवासी सातत्याने करत असतात. अनेकदा तर इतर प्रवासी या अपंग प्रवाशांना दम देण्याचे प्रकारही घडले आहेत. लोकलच्या इतर डब्यांतील गर्दी टाळण्यासाठी बऱ्याचदा प्रवासी आणि साध्या वेशातील पोलीसही या अपंगांसाठीच्या डब्याचा आसरा घेतात. अशा वेळी अपंगांच्या डब्यांतील लोकांकडून त्यांना मज्जाव केला गेल्यास बऱ्याचदा भांडणेही होतात. याबाबत रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवली, तरी रेल्वे पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दल यांच्याकडून कोणतेही सहाय्य मिळत नसल्याचा आरोपही केला जातो.
अपंगांच्या डब्यात चढणाऱ्या धडधाकट प्रवाशांवर तिकीट तपासनीस कारवाई करत असले, तरी साध्या वेषातील पोलिसांविरोधात ही कारवाई केली जात नाही. परिणामी अंध-अपंग यांची पोलिसांशी नेहमीच हुज्जत होते. यावर उपाय करण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्तांनी कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे. याअंतर्गत गेल्या काही दिवसांत ३०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकाराबाबत आणखी तक्रारी आल्यास कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचेही डॉ. सिंघल यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2014 रोजी प्रकाशित
अपंगांच्या डब्यात धडधाकटांचीच गर्दी
शारीरिकदृष्टय़ा अपंग, कर्करोगी आणि गर्भवती महिला यांच्यासाठी रेल्वेच्या लोकल गाडय़ांमध्ये राखीव असलेल्या डब्यांत इतर धडधाकट प्रवाशांचाच भरणा होत असल्याने गरजू प्रवाशांना त्रास होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

First published on: 20-09-2014 at 02:57 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Non disabled passengers travelling in disabled coach