नवी मुंबई पालिकेच्या पॅनल पद्धतीने निवडणुका

लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या रणधुमाळीनंतर सहा महिन्यांनंतर राज्यातील दोन प्रमुख महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद व नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका नवीन वर्षांतील एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ात होणार आहेत.

लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या रणधुमाळीनंतर सहा महिन्यांनंतर राज्यातील दोन प्रमुख महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद व नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका नवीन वर्षांतील एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ात होणार आहेत. नवी मुंबई पालिकेने विद्यमान लोकसंख्येवर आधारित शहरात एकूण १११ प्रभागांची रचना केली आहे. राज्यात सत्तारूढ होणाऱ्या भाजपा सरकारने सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत बदल न केल्यास या निवडणुका पॅनल पद्धतीने होणार असून सर्व प्रमुख पक्ष तयारीला लागले आहेत. यावेळी नवी मुंबई पालिकेत केवळ एक नगरसेवक असलेला भाजपा लक्षवेधी ठरणार आहे. सध्या पालिकेत एकूण ८९ नगरसेवक आहेत. पॅनल पद्धतीमुळे १११ प्रभागांची संख्या ५५ होणार आहे.
नवी मुंबई पालिकेत सध्या राष्ट्रवादी-५४ काँग्रेस-१३ शिवसेना-१७ भाजपा-१ आणि अपक्ष-४ असे एकूण ८९ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. एप्रिल २०१० रोजी झालेली मागील निवडणूक ही प्रभााग निहाय झाली होती, पण आता शासन निर्णयानुसार ती पॅनल पद्धतीने होणार आहे. मागील पाचदहा वर्षांत नवी मुंबई पालिकेची लोकसंख्या वाढली असून मतदार संख्या सात लाख ८० हजार झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईत विधानसभेच्या दोन जागा तयार झालेल्या आहेत. नवी मुंबई पालिकेची पंचवार्षिक मुदत आठ मे रोजी संपत असून त्यापूर्वी २० ते २५ दिवस अगोदर पालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता पालिकेच्या निवडणुकीला केवळ सहा महिने शिल्लक राहिले असून येत्या पंधरा दिवसांत पालिकेची प्रभाग रचना निवडणूक आयोगाद्वारे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविण्यात आल्याची माहिती आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली. दोन प्रभागांचे एक पॅनल होणार असल्याने पॅनलच्या दृष्टीने ५५ प्रभाग तयार होणार असून शिल्लक एक प्रभागासाठी तीन प्रभागांचे एक पॅनल तयार करण्यात आले आहे. नवी मुंबई पालिकेच्या शेजारी भविष्यात येणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी यांसारख्या प्रकल्पामुळे नवी मुंबई आता आपल्या ताब्यात राहावी यासाठी सर्व पक्ष आत्तापासूनच तयारीला लागले आहेत. यात गेली १५ वर्षे पालिकेत साधे खाते खोलू न शकलेल्या भाजपाची महत्त्वाकांक्षा वाढली असून मंदा म्हात्रे यांच्या रूपात त्याचा बेलापूर मधून एक आमदार निवडून आला आहे. त्यामुळे या पक्षाने सर्वात अगोदर पालिका निवडणुकीच्या तयारीला हात घातला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडय़ाळाची टिकटिक नवी मुंबईत आता मंद झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांच्या हातून चार महिन्यांपूर्वी लोकसभा आणि आता विधानसभा गेल्याने ते किती तग धरतात ते येणारा काळ ठरविणार आहे. शिवसेनेलाही दोन्ही विधानसभा हातून गेल्याने आता पालिकेवर भगवा फडकविण्याच्या आशा निर्माण झाली आहे. शिवसेनेचे दोन ‘विजय’ जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि विजय नाहटा त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत. त्यासाठी राज्यातील नसलेली भाजपा बरोबर युती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे झालेले अध:पतन सर्वानी पाहिले असून या पक्षातील नगरसेवक पक्ष टिकविण्याऐवजी स्वत: कसे टिकणार आहोत याची काळजी घेणार आहेत. त्यासाठी त्यांचा कोणत्याही पक्षाबरोबर समझोता करण्याची तयारी आहे. मनसेच्या एकूण सुमार कामगिरीमुळे पक्षप्रमुख राज ठाकरे या निवडणुकीतही मागील निवडणुकीप्रमाणे उमेदवार उभे करण्याचे धारिष्ट करणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Panel method for navi mumbai palika election

ताज्या बातम्या