श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून ५ नोव्हेंबर रोजी भारताच्या मंगळ यानाने मंगळ ग्रहाच्या दिशेने प्रवास सुरू केला. भारतासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा सन्मान ठाण्यातील ‘साने ब्रदर्स’ या लघुउद्योगाला मिळाला आहे. सुमारे दोन कोटी रुपये किमतीच्या या यंत्रनिर्मितीसाठी लागणारी अचूकता बहुराष्ट्रीय कंपन्यांना साधता येत नसताना सानेबंधू उद्योगाने मात्र ही कामगिरी अत्यंत चोखपणे बजावात या उपक्रमामध्ये आपले योगदान नोंदवले आहे. मंगळ यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या प्रतिनिधींनी साने ब्रदर्सच्या या सहभागाबद्दल कौतुक केले.
शहापूर तालुक्यातील आसनगावमध्ये राहणाऱ्या सुरेश साने यांचे वडील सुतारकाम करायचे. बैलगाडय़ा बनवण्यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा हातखंडा होता. बालपणीच वडिलांचा मृत्यू झाल्याने सुरेश साने यांना या पारंपरिक व्यवसायाची ओळख नीटशी होऊ शकली नाही. परंतु शिक्षण घेत चांगल्या व्यवसायाचा प्रयत्न मात्र सुरूच होता. १९६२ साली मॅट्रिक परीक्षा पास झालेल्या साने यांनी बॉम्बे टेलिफोनमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी सुरू केली. पण त्याचबरोबर तांत्रिक शिक्षण मात्र पूर्ण केले. त्याच्याच आधारे १९७७ मध्ये सुरेश साने यांनी त्यांचे भाऊ दत्तात्रय आणि मधुकर यांच्या मदतीने ‘साने ब्रदर्स’ची निर्मिती केली. सुरुवातीच्या काळात पॅटर्न मेकिंग त्यानंतर डाय मेकिंगचा व्यवसाय सुरू झाला. शहापुरातून या उद्योगाने १९८३ मध्ये ठाण्यामध्ये व्यवसाय विस्तार केला. या लघुउद्योगाला २००९ पासून इस्रोच्या मोहिमांमध्ये विविध इंजिन्सचा पुरवठा करण्याचे काम मिळाले. याच काळात साने ब्रदर्सने शशिकांत केणे यांच्या मदतीने नव्या तंत्रज्ञानाची कास धरली. दत्तात्रय साने यांचा मुलगा गणेश याने शहापूरमध्ये नव्या युनिटची सुरुवात करत त्याच्या या बदलांना हातभार लावला. सर्वात प्रथम या उद्योगाने ‘ब्रम्होस एरोस्पेस थिरुवअनंतपुरम लिमिटेड’ या कंपनीला ट्रिपल इंजेक्टर बनवण्याचे काम करून दिले होते. त्याचबरोबर ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’, ‘गोदरेज बॉइस’ या  संशोधन संस्थांना साने ब्रदर्स फ्रिक्शन रिंग पुरवत आहेत. इस्रोच्या ‘लिक्वीड प्रपोर्शन सिस्टम सेंटर’मधून मंगळयान मोहिमेसाठी लागणाऱ्या विविध सुटय़ा भागांची मागणी नोंदवण्यात आली. सहा वर्षांपासून अचूक योग्यतेचे फ्रिक्शन रिंग आणि कॅच केसी हे पार्ट मिळत नसल्याने त्याची मागणी ‘साने ब्रदर्स’ यांच्याकडे करण्यात आली होती. काम सुरू असताना इस्रोचे डॉ. वेंकटकृष्णन यांनी देखील या लघुउद्योगाला भेट देत त्या पार्टस्च्या निर्मितीची तपासणीदेखील केली. साने ब्रदर्सच्या चमूने केवळ दीड महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले. त्यांच्या या कार्याबद्दल ‘थिरुवनंतपुरममधील सोसायटी ऑफ एअरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअर्स’ संस्थेने या लघुउद्योगाचा सन्मान केला. या उपक्रमात काम करणारी बहुसंख्य माणसे वयाची साठी पार केलेली आहेत असे वैशिष्टय़देखील या लघुउद्योगाचे आहे.  भारतामध्ये इस्रोसारख्या अत्यंत प्रगत संशोधन संस्थेसाठी काम करणे हे प्रत्येक उद्योजकासाठी अत्यंत अभिमानाची अशीच गोष्ट असते. त्यामुळे अनेक कंपन्या मोठय़ा प्रयासाने इस्रोच्या नव्या तंत्रज्ञांना हवी असणारी साधने पुरवण्यासाठी इच्छुक असतात. मात्र सर्वाना इस्रोच्या अचूकता, वेळेचे बंधन राखत नॅनो स्थरावरील काम चोखपणे करणे अवश्यक असते. मात्र या कसोटय़ांवर आपली योग्यता सिद्ध करणे अनेक मोठय़ा कंपन्यांना जिकिरीचे जात असताना साने ब्रदर्सच्या अनेक तंत्रज्ञांच्या टिमने हे आव्हान यशस्वीपणे पेलले. त्यासाठी सहकारी शशिकांत केणे, ए.के.देवतळे आणि डी.डी.मुगदल यांचे देखील योगदान महत्त्वाचे होते. शशिकांत केणी यांचा बीआरसीमध्ये काम केल्याचा अनुभव या उद्योगात उपयुक्त ठरत असल्याचे साने यांनी सांगितले.