दुष्काळी भागातील माण खटावचा पाणी प्रश्न पूर्णपणे सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगतानाच पावसाने साठलेल्या बंधाऱ्यातील पाण्याचे मोल ओळखून त्याचा वापर काटकसरीने करण्याचा सल्ला माणदेशी जनतेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला .
माणदेशी महोत्सवाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जयकुमार गोरे, डॉ. विश्वजित कदम, आंनदराव पाटील आदी उपस्थित हाते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महोत्सवाचे अध्यक्ष अरुण गोरे होते.
अत्यंत महत्त्वाकांक्षी असा विकेंद्रित पाणीसाठय़ाचा साखळी सिमेंट बंधाऱ्यांचा प्रकल्प दुष्काळात राबविला. त्यासाठी सुरुवातीला दहा कोटी निधी देण्यात आला. त्यानंतर माणसाठी दहा कोटी व खटावसाठी दहा कोटी निधी देण्यात आला. आठ-दहा दिवसांच्या परतीच्या पावसाने जमा झालेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे अवाहन श्री. चव्हाण यांनी केले. यावेळी दुष्काळात चागले काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी रामास्वामी एन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ रामास्वामी एन यांनी दुष्काळनिवारणाच्या कामात मोठे योगदान दिल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मागेल त्या गावाला चारा छावण्या व टॅकरचा पुरवठा तसेच मागणीनुसार रोजगार हमीची कामे उपलब्ध करून दिली. टँकर व चारा छावण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी बठका घेऊन दुष्काळी तालुक्यातील गावांना तसेच चारा छावण्यांना भेटी, दुष्काळग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला. त्यांनी घेतलेल्या परिश्रमातून साखळी सिमेंट बंधाऱ्यांची कामे उत्कृष्टरीत्या झाली, पण काही ठिकाणी पाणी अडविण्यासाठी सिमेंट बंधाऱ्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
 माण खटाव साठी जिहे कटापूर उरमोडी टेंभू या योजनांना जास्तीत जास्त निधी देऊन त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या योजनांमुळे पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवून दुष्काळावर मात करता येईल.
सत्काराला उत्तर देताना जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन म्हणाले अडीच वर्षांच्या कालावधीत मी दुष्काळ निवारणासाठीच जास्त वेळ दिला. दुष्काळाच्या काळात आव्हान म्हणून काम केले. या काळात सर्व प्रशासकीय यत्रणांनी टीमवर्क म्हणून काम करून या कामात मला मोलाची मदत केली म्हणूनच हे आव्हान पेलू शकलो.
यावेळी आदर्श माता म्हणून पार्वती पोळ यांना गौरविण्यात आले, तर उद्योजक अनिल पिसे, सामाजिक क्षेत्रात शांतीगिरी महाराज, कला क्षेत्रात हेमांगी कवी, आदर्श शेतकरी धेडीबा मोरे व क्रीडा क्षेत्रात प्रभाकर पाठक यांना माण गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.