कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नगरसेवकांनी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याने सोमवारपासून कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन बुधवारी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी हस्तक्षेप केल्याने मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन वानखडे यांनी दिली.
कर्मचाऱ्यांवर हल्ले व दमदाटी करणाऱ्या कोणाही लोकप्रतिनिधींची गय केली जाणार नाही. प्रसंगी कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण पुरविले जाईल. अशा प्रकारचा हल्ला पुन्हा होणार नाही यासाठी पालिका प्रशासनाला कळविण्यात येईल, असे आश्वासन राणे यांनी कर्मचारी प्रतिनिधींना दिल्यानंतर दोन दिवसांपासून सुरू असलेले काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले, असे वानखडे यांनी सांगितले.
कल्याण पूर्वेत पाणीटंचाई असल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी या भागातील नगरसेवक एमआयडीसी कार्यालयात आले होते. तेथे कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त होऊन नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, सामानाची फेकाफेक केली होती.