केवळ महाराष्ट्र व देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय कामगार चळवळ व उद्योगजगतातील स्थित्यंतराचे साक्षेपी अभ्यासक म्हणून प्रा. रमेशचंद्र दत्तात्रय जोशी यांचे नाव आदराने घेतले जाते. कामगार व्यवस्थापनाशी संबंधित अध्यापनात सहा दशकांहून अधिक काळ कार्यरत असताना उद्योगक्षेत्र, कामगार चळवळ आणि अर्थकारण यांतील बदलांचा अभ्यास करून ‘कामगार सक्षमीकरण’ व गुणवत्ता वाढीचा नवा दृष्टिकोन त्यांनी मांडला. परळ येथील ‘मुंबई इन्स्टिटय़ूट ऑफ लेबर स्टडीज’ येथे कामगार व्यवस्थापनाशी संबंधित अध्यापनात उमेदीचा काळ घालवणारे प्रा. रमेशचंद्र दत्तात्रय जोशी यांचे मेंदूच्या कर्करोगाने अलीकडेच लीलावती रुग्णालयात निधन झाले. गेली सात वर्षे कर्करोगाशी झुंजत त्यांनी अध्यापन व ग्रंथलेखन सुरूच ठेवले होते. ‘एम्प्लॉई वेलबीइंग इन द ट्वेन्टीफर्स्ट सेंचुरी’ आणि ‘ट्रेड युनियन्स इन इंडिया: न्यू एज, न्यू परस्पेक्टिव्ह २०१९’ या दोन अभ्यासपूर्ण गं्रथांत स्वातंत्र्योत्तर काळातील औद्योगिक बदल, कामगार चळवळीतील क्षेत्रातील नेतृत्व आणि कामगार कल्याणाचे सखोल विवेचन केले आहे. अनेक नामांकित कामगार नेते चळवळीच्या दिशेबाबत चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे येत असत.

मृदू स्वभावाचे जोशी हे वक्तशीर व शिस्तपालनासाठी विद्यार्थीवर्गात परिचित होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबई विद्यापीठातही ‘कामगार संघटना’ या विषयातील पदविका तसेच ‘मास्टर्स इन लेबर स्टडीज’सारखे अभ्यासक्रम सुरू झाले. औद्योगिक विश्वाने डिजिटल युगात प्रवेश करण्यास सुरुवात केल्यानंतर यातील कामगार क्षेत्राचे स्थान हा त्यांचा अभ्यासाचा खास विषय राहिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारताच्या वतीने सादर केलेल्या कामगारविषयक शोधनिबंधांतून कामगारांसाठी आवश्यक असलेल्या वेतनश्रेणीचे गठन करण्यात हातभार लागला होता. इंग्लंडसह अन्य युरोपीय देश, अमेरिका तसेच ऑस्ट्रेलिया आदी ठिकाणच्या परिषदांत त्यांनी व्याख्याने दिली वा शोधनिबंधवाचन केले. भारतातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांत व्यवस्थापनातील व्यक्तींसाठी ‘इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स’ व ‘पर्सोनल मॅनेजमेंट’ या विषयावर अनेक व्याख्याने त्यांनी दिली. याशिवाय फार्मा इकॉनॉमिक्स व इंडस्ट्री इकॉनॉमिक्स हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते. कामगार संघटना तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी त्यांनी नेतृत्व प्रशिक्षण अभ्यासक्रमही तयार केला होता.

अध्यापनाच्या क्षेत्रात सक्रिय होण्याआधी त्यांनी विविध कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जबाबदारीची पदे भूषविली. ‘ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोडय़ुसर्स ऑफ इंडिया’ (ओपीपीआय)चे ते सरचिटणीस होते. कामगार कल्याणातून कामगारांची व उद्योगजगताची सांगड घातल्यास भारताची औद्योगिक प्रगती वेगाने होईल, असा त्यांचा ठाम विश्वास होता.