चित्रपट, ग्रंथ आणि इतर कलामाध्यमांमध्ये कलाकार आणि कलाकृती यांची जेवढी लक्षात राहणारी छाप पडते, तेवढी कलेचे मर्म शोधत याच्या भल्याबुऱ्याची चिकित्सा करणारा समीक्षक हा घटक कायम अलक्षित राहतो. अवघी शंभर-सव्वाशे वर्षे वयोमान असलेले सिनेमा हे माध्यम असो वा या शतकभरात प्रयोग आणि नवकल्पनांनी बहरलेली ग्रंथ आणि चित्रकला हे माध्यम असो, समीक्षकाच्या कृतीची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही. चित्रसमीक्षकांच्या पंथामध्ये ‘शिकागो सन टाइम्स’मध्ये पाच दशकांहून अधिक काळ पाचशे ते हजार शब्दांत सिनेमाचा वकुब दाखवून देणारे रॉजर एबर्ट किंवा ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकात काही हजार शब्दांचे सिनेविच्छेदन करणाऱ्या पॉलीन केल यांना खरे सिनेआस्वादक म्हणता येईल. आत्मविश्लेषणाऐवजी चित्रपटाची गोष्ट दृश्यामागोमाग दृश्य आणून लेखावर लेख पाडणाऱ्या तथाकथित चित्रपट समीक्षकांमुळे आपल्याकडची सिनेसाक्षरता साठोत्तरी काळापासून खुंटलेली राहिली. इतर कलामाध्यमांबाबतही अपवाद वगळता हीच अवस्था राहिल्यामुळे आपल्याला ब्रिटनमधील जॉन बर्जर यांचे कलासमीक्षेतील स्थान माहिती नसते. पॉल थेरो यांच्या प्रवास लेखनाच्या जातकुळीची कल्पना नसते. नोरा एफ्रॉन यांचे स्त्रीवादाच्या पारंपरिक भूमिकेपलीकडे लिहिले गेलेले निबंध कुणी सांगितल्याशिवाय कळत नाहीत. म्हणूनच पाच दशकांहून अधिक काळ समीक्षेला मुद्रित माध्यमासह दूरचित्रवाणी व रेडिओवरून सारखेच वलय निर्माण करून देणाऱ्या क्लाइव्ह जेम्स या जन्माने ऑस्ट्रेलियायी व कर्माने ब्रिटिश असलेल्या अवलियाच्या मृत्यूमुळे त्यांच्याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. साहित्याची- म्हणजेच ग्रंथ आणि लेखकांवरील समीक्षा ही खुमासदार आणि भाषिक कळांच्या जाणकारीने समृद्ध असली, तर ती सरधोपट आणि वेळ मारून नेणाऱ्या परीक्षणांपेक्षा वेगळी ठरू शकते, हे क्लाइव्ह यांनी दाखवून दिले. व्हिव्हियन लिओपोल्ड जेम्स हे पाळण्यातले नाव त्यांनी टाकल्याचे कारण त्या नावाच्या नायिकेने हॉलीवूड गाजविल्यानंतर ते फक्त मुलीचेच असू शकते हा प्रवाद त्यांच्या भवताली मांडला जाऊ लागला होता. त्यामुळे एका आवडत्या सिनेमातील व्यक्तिरेखेचे नाव त्यांनी धारण केले. दुसऱ्या महायुद्धात लढणाऱ्या सैनिकाच्या पोटी जन्मलेल्या क्लाइव्ह यांची जडणघडण ऑस्ट्रेलियामध्ये झाली. १९७२ साली ‘ऑब्झव्र्हर’ वृत्तपत्रात ‘टेलिव्हिजन क्रिटिक’ म्हणून रुजू झालेल्या क्लाइव्ह यांनी सर्वार्थाने दर्शकांच्या मनातील नस पकडणारी समीक्षा लिहिली. हा काळ रॉजर एबर्ट यांची सिनेसमीक्षा जगभरात लोकप्रिय होणारा होता. जॉन बर्जर यांच्या कलासमीक्षेला याच दरम्यान धार आली होती आणि ‘जीक्यू’-‘एस्क्वायर’-‘रोलिंग स्टोन’ नियतकालिकांमधून धाडसी पत्रकारिता आणि व्यक्तिनिष्ठ रिपोर्ताजांची मालिकाच सुरू झाली होती. या काळात साहित्य चिकित्सा करणारे क्लाइव्ह यांचे लेख सातत्याने ‘अटलांटिक’ मासिक, ‘न्यू यॉर्क बुक रिव्ह्य़ू’, ‘टाइम्स लिटररी सप्लीमेंट’ या चोखंदळ नियतकालिकांतून गाजत होते. ग्रंथ, चित्रपट, पॉप संगीत, प्रवास यांसह कित्येक क्षेत्रांमधील आवडीला त्यांनी लेखनात गुंफले. ब्रिटिश टीव्हीवर कथाबाह्य़ मालिकांची रचना आखून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. रेडिओवर ग्रंथप्रेमाचा प्रसार करणाऱ्या या समीक्षकाचा टीव्हीवर ‘सॅटरडे नाइट क्लाइव्ह’ हा टीव्ही शो १९८९ पासून सातत्याने चर्चेत राहिला. एकाच वेळी कविता आणि कादंबऱ्या लिहून समीक्षकाची भूमिकाही सारख्याच ताकदीने वठवत, वर भवतालातील राजकीय-सामाजिक घटक चपखल विनोदातून सार्वजनिक व्यवहारात मांडण्याची ताकद क्लाइव्ह जेम्स यांच्यात होती.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2019 रोजी प्रकाशित
क्लाइव्ह जेम्स
ब्रिटिश टीव्हीवर कथाबाह्य़ मालिकांची रचना आखून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 07-12-2019 at 04:20 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian critic broadcaster and writer clive james profile zws