ग्रीकांनी सर्वप्रथम पृथ्वी सपाट नसून गोलाकार आहे, असे सांगितले तेव्हा त्या काळात रूढ समजांना जो धक्का बसला, तशाच स्वरूपाचे धक्के पुंज भौतिकीत काही वैज्ञानिकांच्या संशोधनातून बसले. या वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे डेव्हीड थॉलस. त्यांच्या संशोधनातून पुंज भौतिकीतील संशोधन दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आला. त्यांना ऑक्टोबर २०१६ मध्ये नोबेल मिळाले, त्या वेळी ते संशोधन सोप्या भाषेत समजावून देणे अवघड गेले होते. सैद्धांतिक संशोधनातून त्यांनी द्रव्याच्या स्थानशास्त्रीय अवस्था दाखवण्याचा प्रयत्न केला.

थॉलस यांचे संशोधन हे पुंज भौतिकी व पुंज यांत्रिकी या दोन शाखांशी निगडित होते. द्रव्याचे स्वरूप उलगडण्यासाठी त्यांनी भौतिकशास्त्र, गणित व स्थानशास्त्र यांचा वापर केला. त्यातून पुंज संगणन व इलेक्ट्रॉनिक्स यातील पूर्वीचे अनेक समज खोटे ठरले. अगदी कमी तपमानाला अतिवाहक व चुंबकीय पटले कशी गुणधर्म बदलतात, हे त्यांनी दाखवून दिले होते. थॉलस यांना २०१६ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल मायकेल कोस्टरलित्झ, डंकन हाल्डेन यांच्यासमवेत मिळाले होते. थॉलस यांनी न्यू यॉर्कचे कॉर्नेल विद्यापीठ, कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठ, सियाटलचे वॉशिंग्टन विद्यापीठ येथे संशोधन केले.

डेव्हीड डेम्स थॉलस यांचा जन्म बिअर्सडेन येथे झाला. नंतर ते वडिलांबरोबर केम्ब्रिजला आले. वयाच्या चौथ्या वर्षी डेव्हीड १ ते १००० पर्यंत आकडे मोठय़ाने म्हणत असे, तेव्हा आई-वडील स्तिमित होऊन जात. मित्रांबरोबर बुद्धिबळ खेळण्यात तो रमत असे. कुठलाही पट किंवा सोंगटय़ा न घेता केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर हा खेळ चालत असे. युद्धकाळात डेव्हॉन येथे काही शिक्षण घेतल्यानंतर ते हॅम्पशायरमधील विंचेस्टर कॉलेज येथे शिकले.  निसर्ग विज्ञानाच्या अभ्यासासाठी केम्ब्रिज विद्यापीठात आले व नंतर कॉर्नेल विद्यापीठात त्यांचे पुढचे शिक्षण झाले. कालांतराने ते ब्रिटनला परत आले व चर्चिल कॉलेजमध्ये अध्यापन करू लागले. नंतर बर्मिगहॅम विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक बनले. १९७३ मध्ये कोस्टरलित्झ-थॉलस स्थित्यंतर सिद्धांत प्रसिद्ध झाला. त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवत असताना क्वांटीझ्ड हॉल कंडक्टन्स इन टू डायमेन्शनल पिरिऑडिक पोटेन्शियल हा शोधनिबंध लिहिला होता. पण तो सगळ्यांच्याच डोक्यावरून गेला. हे सगळे संशोधन नंतर नोबेल समितीपुढे आले, तेव्हा त्याचा सन्मान करण्यावाचून गत्यंतर नव्हते. त्यांनी क्वांटम मेकॅनिक्स ऑफ मेनी बॉडी सिस्टीम्स, टोपोलॉडिकल क्वांटम नंबर्स इन नॉन रिलेटिव्हिस्टिक फिजिक्स ही पुस्तके लिहिली. डॉ. थॉलस यांची ओळख ही केवळ नोबेल विजेते ही नव्हती, ते रॉयल सोसायटी, अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स, अमेरिकन फिजिकल सोसायटी यांचे फेलो होते. दुर्दैव असे, की जेव्हा त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले, तेव्हा त्यांना विसराळूपणा जडला होता. तरीही जेव्हा त्यांना ही बातमी सांगण्यात आली, तेव्हा ते आनंदित झाले. त्यांच्या निधनाने विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे.