भारतातील साचेबंद प्रणाली न रुचल्याने परदेशात जाऊन संशोधन करीत जगन्मान्यता पावलेले प्रा. इंद्रबीर  सिंह यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडे, कारण त्यांनी केलेले हे संशोधन आतापर्यंत भूगर्भशास्त्रातील ज्ञानाला छेद देऊन नवी मांडणी करणारे होते. त्यांच्या निधनाने आपण आंतरराष्ट्रीय कीर्तीचा भूगर्भशास्त्रज्ञ गमावला आहे.

हिमालयाबाबत त्यांनी अनेक वेगळ्या गोष्टी मांडल्या होत्या. जर अशा विद्वानांच्या म्हणण्याची दखल घेतली गेली नाही तर उत्तराखंडसारख्या दुर्घटना घडतात हे आपण पाहिलेच. प्रा. सिंह हे भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे मानद सदस्य होते. त्यांचे शिक्षण लखनऊ विद्यापीठाच्या भूगर्भविज्ञान विभागात झाले. सय्यद अब्बास जफर, सत्य प्रकाश रस्तोगी, अविनाश चंद्रा यांच्यासारख्या भूगर्भशास्त्रज्ञांचे वैज्ञानिक संस्कार घेऊन त्यांनीही संशोधकांची पुढील पिढी घडवण्याचे काम केले. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ डेहराडून येथे ओएनजीसीमध्ये नोकरी केली, पण त्या कामात ते समाधानी नव्हते. त्यामुळे ते पश्चिम जर्मनीतील स्टुटगार्टला गेले. तेथील विद्यापीठातून त्यांनी हार्झ पर्वतराजीवर विद्यावाचस्पती पदवी घेतली. नंतर खनिजतज्ज्ञ व पेट्रोलियमतज्ज्ञ थॉमस बार्थ यांच्यासमवेत त्यांनी नॉर्वेत काम केले. नॉर्वेतील टेलेमार्क पर्वतराजीचा त्यांनी अभ्यास केला, त्यावर शोधनिबंध लिहिले. उत्तर समुद्रातील भरतीच्या लाटांचे जलशास्त्रीय परिणाम अभ्यासले. आर. सी. मिश्रा यांच्या सांगण्यावरून प्रा. सिंह पुन्हा लखनऊ विद्यापीठात आले. नंतर त्यांना प्राध्यापकपद मिळाले. अनेक परदेशी विद्यापीठात ते अभ्यागत प्राध्यापक होते. भारतीय भूगर्भशास्त्रीय संस्थेचा ए. रामराव पुरस्कार त्यांना मिळाला होता, नंतर खाण मंत्रालयाचा जीवनगौरव २०१४ मध्ये मिळाला. २००६ मध्ये ते निवृत्त झाले तरी त्यांनी काम सुरूच ठेवले. भारतीय भूगर्भशास्त्रातील कथित विद्वानांनी जे सिद्धांत पवित्र मानले, ते त्यांनी लीलया मोडून काढले. त्यामुळे हिमालयाचा इतिहास पुन्हा लिहायची वेळ आली. गंगेच्या प्रदेशातील पठारे, भारतात तांदूळ या पिकाचे देशीकरण यावर त्यांनी बरीच नवी माहिती पुढे आणली. काश्मीर खोऱ्यातील कारेवा खडकांचे त्यांनी नवे प्रारूप मांडले. भूजमधील कच्छ, विंध्य खोरे, मध्य भारतातील लॅमेटा खडक यातील नवीन बाबी त्यांनी शोधल्या. इंडियन डेल्टाज- ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया हे पुस्तक  त्यांनी ए. एस. रामस्वामी यांच्यासह लिहिले. ते तेलशोधन कंपन्यांचा प्रमाणग्रंथ मानले जाते.

नेहमी निळी डेनिम, हवाई चप्पल असा साधेपणा त्यांनी बाळगला. नाही म्हणायला त्यांच्याकडे नॅनो मोटार होती!