केरळातील साहित्य, सांस्कृतिक जीवनावर कवी ओटापलक्कल नीलाकंगन वेलु कुरूप म्हणजे मल्याळी जनतेचे लाडके ओएनव्ही, यांनी गेली सहा-सात दशके मोठीच छाप पाडली होती. २०० चित्रपटांत ९०० गीते, पद्मश्री, पद्मविभूषण हे नागरी सन्मान, साहित्य अकादमी व ज्ञानपीठ पुरस्कार, तेरा राज्य चित्रपट पुरस्कार यामुळे त्यांची कामगिरी नजरेत भरणारी. तिरुअनंतपुरम मतदारसंघातून १९८९ मध्ये त्यांनी डाव्या आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. तिरुअनंतपुरम शहरात ते राहत होते. त्यांच्या रूपाने मोठा सांस्कृतिक झराच वाहत होता.
‘कुरूप यांचा जन्म कोलममधील छावरा येथे झाला. लहानपणापासून त्यांना साहित्याची आवड होती. १९४६ मध्ये लिहिलेली ‘मुनोट्र’ ही त्यांची पहिली कविता. जो लोकप्रिय कवी किंवा लेखक असतो तो कधीच समीक्षकांच्या पसंतीस उतरलेला नसतो, तसेच त्यांच्याही बाबतीत झाले. त्यांच्या काव्यलेखनावर समीक्षकांनी फार चांगले लिहिले नाही तरी ते लोकप्रिय कवी व गीतकार होते. केरळमधील साहित्यात ते स्वच्छंदतावादी चळवळीचे प्रतिनिधी होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात चंगमपुझा कृष्ण पिल्ले यांनी हा साहित्यप्रवाह आणला. १९४० मध्ये पी. भास्करन, कुरूप व वायलार रामा वर्मा यांनी कम्युनिझम व त्यांच्या राजकीय चळवळीवर आधारित कविता लोकप्रिय केल्या. मराठीत विंदा करंदीकर, वसंत बापट व मंगेश पाडगावकर या त्रयीने जी लोकप्रियता मिळवली होती तीच या तिघांना मल्याळीत होती. कुरूप यांच्या कविता पहिल्या काळात तत्त्वज्ञानाच्या अंगाने जाणाऱ्या होत्या व नंतर त्या जीवनातील निखळ आनंदाकडे वळल्या. ‘निगलेने कम्युनिसटाकी’ या नाटकात त्यांनी दक्षिण केरळात कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रसार केला, वर्गसंघर्ष मांडला. त्यांच्या नाटकांपेक्षा गीते लोकांच्या जास्त स्मरणात आहेत. मल्याळी बोलीभाषेमुळे त्यांच्या गीतांनी जनमानसाची पकड घेतली. दैनंदिन जीवनातील प्रतिमाचित्रण त्यांच्या काव्यातून दिसते; पण त्यांच्या गीतांचे कोंदण लाभल्याने डाव्यांच्या राजकारणाकडे तेथील जनतेने भावनात्मक दृष्टीने पाहिले, परिणामी त्याची टीकात्मक समीक्षाही झाली नाही. वेदनेची छाया हे त्यांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण. त्यांच्या कवितेने १९७० मध्ये काहीशा भ्रमनिरासातून सामाजिक व पर्यावरणाच्या जाणिवा अधोरेखित करताना तत्त्वज्ञानाला जास्त महत्त्व दिले व नंतर १९८० मध्ये ते पुन्हा स्वच्छंदतावादाक डे वळले, त्याच वेळी त्यांनी कालिदासाच्या जीवनावर ‘उजैनी’ हे काव्य लिहिले. आगामी काळात ओएनव्ही हे कवितांपेक्षा गीतांमुळे लोकांच्या मनात राहतील. त्यांची अनेक गाणी देवराजन, दक्षिणामूर्ती, सलील चौधरी, रवी, एम. बी. श्रीनिवासन यांच्या संगीताचा साज घेऊन आली. त्यातून केरळात लोकप्रिय संगीताचा एक भारलेला काळ येऊन गेला, तो आता कायमचा सरला आहे.